17 December 2017

News Flash

गुंतवणूकदारांना यंदा ‘भागविक्री’तून वाढीव बोनस!

विद्यमान २०१७  साल हे  भागविक्रीच्या माध्यमातून निधी उभारणीचे विक्रमी वर्ष राहिले आहे.

व्यापार प्रतिनिधी | Updated: October 9, 2017 5:32 AM

विद्यमान २०१७  साल हे  भागविक्रीच्या माध्यमातून निधी उभारणीचे विक्रमी वर्ष राहिले आहे. आजवर एकंदर २४ कंपन्यांनी भांडवली बाजारातून अभूतपूर्व असे २१,५६० कोटी रुपयांचे भांडवल उभे केले. तर आजपासून सुरू होणाऱ्या आठवडय़ात ‘जीआयसी री’च्या महा भागविक्रीची त्यात भर पडणार आहे. लोकांच्या जिविताला आणि मालमत्तांना संरक्षण देणाऱ्या विमा कंपन्यांना विम्याचे संरक्षण देणारी म्हणजे पुनर्विमा (रिइन्शुरन्स) क्षेत्रातील भारतातील एकमेव कंपनी ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जीआयसी री)’ने प्रारंभिक भागविक्रीच्या माध्यमातून भांडवली बाजाराच्या इतिहासातील दुसरी मोठी निधी उभारणी प्रस्तावित केली आहे. ११ ते १३ ऑक्टोबर २०१७ दरम्यान सुरू राहणाऱ्या या भागविक्रीतून ११,३७० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभारले जाणार आहेत. यापूर्वी २०१० सालात कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने भागविक्रीच्या माध्यमातून सर्वाधिक १५,२०० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.

जीआयसी री ही भारतातील एकमेव, तर आशियातील तिसरी मोठी आणि जगातील १२ वी मोठी पुनर्विमा क्षेत्रातील कंपनी आहे. सामान्य व जीवन विमा कंपन्यांना विम्याचे संरक्षण पुरविणाऱ्या या कंपनीचा भारतातील ३८,८०० कोटी रुपयांच्या पुनर्विमा बाजारपेठेत ६० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. अनेक विदेशी कंपन्या या क्षेत्रात आधीपासून कार्यरत आहेत आणि आता त्यांना थेट भारतातून कार्यान्वयनाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असली, तरी या बाजारपेठेतील उपलब्ध संधी पाहता त्यातून आपल्या कंपनीच्या व्यवसायाला कोणताही धोका संभवत नाही.

भारतातील विमा व्यवसायाचा विचार केल्यास भारतात विमा नियमन प्राधिकरणाकडे ५३ नोंदणीकृत विमा कंपन्या असून यापैकी २४ कंपन्या जीवन विमा व्यवसायात तर उर्वरित २९ कंपन्या सर्वसाधारण विमा व्यवसायातील आहेत. जीवन विमा व्यवसायातील भारतातील जीवन विम्याची बाजारपेठ जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ असून भारतात सुरू असलेल्या जीवन विमा पॉलिसीची संख्या ३ कोटी ६० लाख असून एलआयसी ही जगात सर्वाधिक संख्येने विमा पॉलिसी विकणारी कंपनी आहे. सर्वसाधारण विमा व्यवसायातील या २९ कंपन्यांपैकी सहा कंपन्या सरकारी मालकीच्या आहेत.

अलिकडेच आयसीआयसीआय लॉम्बार्ड जनरल इन्शुरन्स आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स या  खासगी विमा कंपन्यांच्या समभागांचे बाजारात पदार्पण झाले. त्या पूर्वी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या रूपाने विमा क्षेत्रातील पहिल्या कंपनीचे आपल्या भांडवली बाजारात पाऊल पडले. येत्या काळात एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ आणि न्यू इंडिया अश्युरन्स या विमा क्षेत्रातील आणखी दोन बडय़ा कंपन्या भांडवली बाजारात येऊन गुंतवणूकदारांना आजमावणार आहेत. विमाच नव्हे तर अन्य क्षेत्रातील अनेक बडय़ा कंपन्या प्रारंभिक भागविक्री घेऊन येत आहेत.

चालू वर्षांत भागविक्रीपश्चात सूचिबद्ध झालेल्या २२ कंपन्यांपैकी १५ कंपन्यांना गुंतवणूकदारांना भरभरून लाभ दिला आहे. २२ कंपन्यांचा एकूण सरासरी परतावा ४० टक्क्य़ांच्या घरात जाणारा आहे. तर त्यातील १० कंपन्या अशा आहेत, ज्यांनी ५० टक्के ते ३०० टक्क्य़ांपर्यंत परताव्याचे माप गुंतवणूकदारांच्या पदरी टाकले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या बडय़ा भागविक्री हंगामासाठी गुंतवणूकदारांनी पुरेशी रोकडतरलता राखणे श्रेयस्कर ठरेल. दिवाळीत पगारदारांच्या हाती बोनस पडेल की नाही सांगता येणार नाही, परंतु आगामी चांगल्या भागविक्रीतील गुंतवणुकीतून  ताबडतोबीने नाही तरी पुढल्या काळात मोठा बोनस मिळविण्याची संधी प्रत्येकाने साधायलाच हवी.

arthmanas@expressindia.com

First Published on October 9, 2017 5:28 am

Web Title: investor get profit from stock market