25 February 2021

News Flash

फंडाचा ‘फंडा’.. : जोखिमांकाचे महत्त्व

कोणत्याही दोन व्यक्ती तंतोतंत त्याच पद्धतीने विचार करत नाहीत.

|| भालचंद्र जोशी

बाजारातील घसरणीने कित्येक तथाकथित ‘धैर्यवान’ गुंतवणूकदारांनी भीतीने बाजारातून पळ काढला. तर दुसरीकडे सध्यासारख्या निर्देशांकांच्या उच्चांकी परिस्थितीत बाजारात जास्त पैसे गुंतवणूक करण्याची इच्छा उफाळून येणारेही आहेत. दोन्ही प्रसंगातील या प्रतिक्रिया टोकाच्याच. कष्टाने कमावलेला आपला पैसा हा आपल्या गुंतवणूक ध्येयाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत मालमत्तांमध्ये विभागलेला राहील हे सुनिश्चित केले जायला हवे. ‘जोखिमांका’द्वारे याचीच खातरजमा केली जाते.

सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे ५२ हजारांच्या आणि १५ हजारांचा टप्पा ओलांडला. निर्देशांक जेव्हा जेव्हा नवीन उच्चांक गाठतात तेव्हा बाजारात नव्याने गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा बळावते. अनेक वर्षे बँक आणि म्युच्युअल फंडाशी संबंधित असल्याने शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ काय, असा प्रश्न मला कायम विचारला जातो. २०००, २००८, २०१२, २०१५, आणि आताचे मागील काही महिने हा प्रश्न विचारणाऱ्यांची भर पडत आहे. या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिसापेक्ष बदलू शकेल. या बदलामागे मला माहीत असलेली कारणे म्हणजे त्या व्यक्तीची गुंतवणुकीतील जोखीम स्वीकारण्याची क्षमता व त्याच्याकडे उपलब्ध असलेला निधी यांना मी  प्रामुख्याने विचार घेईन. गुंतवणूकदाराने त्याच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेतून जाणे आवश्यक असते. जोखीम सहिष्णुता म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या मालमत्तेतील अस्थिरता स्वीकारण्यास आर्थिक आणि भावनिकदृष्टय़ा किती सक्षम आहे हे तपासणे. एखादी व्यक्ती अधिक परतावा मिळविण्याचा प्रयत्न करताना गुंतवणुकीचे किती मूल्य गमावण्यास तयार आहे याची मानसशाष्टद्धr(२२९ीय पद्धतीने केलेली ही चाचणी होय. एखाद्या व्यक्तीची मानसिकता एखादी नोकरी स्वीकारण्यापूर्वी ‘साइकोमेट्रिक टेस्टिंग’ पद्धतीने चाचपली जाते. याच पद्धतीने गुंतवणुकीतील चढ-उतार अनुभवण्यास गुंतवणूकदार किती सक्षम आहे, हे जाणून घेण्यासाठी गुंतवणूक सल्लागार या चाचणीचा अवलंब करतात. संभाव्य गुंतवणूकदार व्यक्तीची जोखीम सहनशीलता यातून निश्चित केली जाते.

कोणत्याही दोन व्यक्ती तंतोतंत त्याच पद्धतीने विचार करत नाहीत. याच प्रमाणे गुंतवणूक साधनांची निवड करताना एखाद्याचे आर्थिक वर्तन हे त्यांची मानसिकता, भूतकाळातील अनुभव, सद्य परिस्थिती आणि भविष्यातील वित्तीय ध्येय यावर मुख्यत: ठरत असते. विशिष्ट मालमत्ता वर्ग निवडताना आपण घेत असलेल्या जोखमीबद्दल आपल्या मनात शंका नसेल तर बाजारातील घसरणीप्रसंगी आपण विचलित होणार नाही. बाजारात अस्थिरता आणि जोखीम यांच्यात सरळसंबंध आहे. एखाद्या मालमत्तेतील जितकी अस्थिरता अधिक तितका त्या मालमत्तेतील गुंतवणुकीतून परतावा अधिक. त्या मालमत्ता वर्गात असलेल्या अस्थिरतेमुळे आपण अस्वस्थ असल्यास एक तर आपण मालमत्ता विभागामध्ये बदल करू किंवा गुंतवणूक सल्लागार, निधी व्यवस्थापक यांना दोष देत बसू. हे टाळण्यासाठी जोखिमांकाशी तादात्म्य पावणारे मालमत्ता विभाजन करणे अतिशय आवश्यक असते.

एखाद्या वैयक्तिक गुंतवणूकदाराची जोखीम सहिष्णुता चाचणी प्रक्रियेत त्याला त्याच्या स्वत: बरोबर कुटुंबाच्या सदस्यांची सध्याची आर्थिक स्थिती, गुंतवणूक ध्येय, ध्येयपूर्ती यासाठी उपलब्ध कालावधी, आर्थिक उद्दिष्टे, सध्याचे उत्पन्न स्त्रोत, आर्थिकदृष्टय़ा अवलंबून असलेल्या कुटुंबीयांची संख्या तसेच दरमहा त्यांच्या उत्पन्नाचे प्रमाण त्याला अपेक्षित असलेला परताव्याचा दर, आणीबाणीसाठी केलेली तरतूद या व अन्य प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. बहुपर्यायी प्रश्नांची आर्थिक सल्लागार एक संक्षिप्त प्रश्नावली तयार करतात. ज्यात संभाव्य गुंतवणूकदाराने उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडणे अपेक्षित आहे.

आपल्या जोखिमांकावर दोन भिन्न घटक परिणाम करतात. प्रथम, आपली जोखीम सहिष्णुता आपल्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्टय़ांसह आपल्या भविष्यातील गुंतवणुकीच्या वर्तनावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल स्वत:शी संबंधित प्रश्न असतात. तर आपली जोखीम सहनशीलता, आपल्या वर्तमान जीवनातील प्रश्नांच्या उत्तरावर ठरते. उदाहरणार्थ, आपले वय, अवलंबितांची संख्या, मासिक उत्पन्न आणि आपत्कालीन निधीची तरतूद इत्यादी गोष्टींवर आपली जोखीम सहनशीलता निश्चित केली जाते. थोडक्यात पहिल्या प्रकारात काल्पनिक परिस्थितीवर प्रश्न तर दुसऱ्या भागात वास्तवावर आधारित प्रश्न असतात. आपली जोखीम सहिष्णुता या दोन घटकांवर ठरत असते.  व्याजदर कपात, अर्थसंकल्पात आयकरात केलेली वाढ, एखाद्या उद्योगाला फायदा होईल अशा आर्थिक सुधारणेला दिलेली मंजुरी यांसारख्या बाजारावर आणि तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम करणाऱ्या प्रसंगांवर आपली प्रतिक्रिया काय असेल हे आपल्याला माहीत नसते. बाजारातील घसरणीने कित्येक तथाकथित ‘धैर्यवान’ गुंतवणूकदारांची त्यांच्या समभाग गुंतवणुकीत टिकून राहण्याची क्षमता संपून जाते. किंवा सध्या सारख्या निर्देशांकांच्या उच्चांकी परिस्थितीत बाजारात जास्त पैसे गुंतवणूक करण्याची इच्छा उफाळून येते. या भावनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जोखिमांकानुसार केलेले मालमत्ता विभाजन वित्तीय ध्येये साध्य करण्यास सहाय्य करते.

आपला जोखिमांक हे सुनिश्चित करतो की आपले मालमत्ता विभाजन (‘उच्च जोखीम’ आणि ‘अल्प जोखीम’) आपल्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असेल. आपल्या कष्टाने कमावलेला पैसा आपल्या गुंतवणूक ध्येयाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत मालमत्तांमध्ये विभागला जाईल. बाजाराच्या घसरणीत घाबरून विक्री करणे व अतिलोभात गुंतवणूक करणे या दोन्ही गोष्टी कटाक्षाने टाळता येईल. बाजार अस्थिरतेचा आपल्या दीर्घकालीन वित्तीय ध्येयांवर परिणाम होऊन द्यायचा नसेल तर आपले मालमत्ता विभाजन जोखिमांकाला अनुसरून होणे अत्यंत गरजेचे आहे. ‘सेबी’ने यासाठी म्युच्युअल फंडांचा प्रसार करणाऱ्या पत्रकावर गुंतवणुकीशी संबंधित जोखीम ठळकपणे असणे सक्तीचे केले आहे. सहा भागांत विभागलेले अर्धवर्तुळ सहा प्रकारच्या जोखीम सहिष्णुतेचे प्रतिनिधित्व करते. आपली जोखीम सहिष्णुता आणि फंडांची जोखीम यांचा मेळ साधणे आवश्यक असते.

आपला जोखिमांक परिस्थितीजन्य कारणांनी बदलू शकतो. नोकरी बदलणे, आपल्यावर अवलंबून असलेल्यांमध्ये वाढ किंवा घट होणे आणि जोडीदाराचा मृत्यू या सर्व गोष्टी आपल्या जोखीम साहिष्णुतेवर परिणाम करतात. आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थितीत बदल झाल्यास जोखिमांकाचे पुनरावलोकन करणे गरजेचे असते. वरील सर्व गोष्टी विचारात घेऊन गुंतवणूकदाराने आपले आर्थिक नियोजन केल्यास त्याला आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे निश्चितपणे शक्य आहे. ‘टायमिंग द मार्केट’ यापेक्षा ‘टाइम इन द मार्केट’ हे गुंतवणुकीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सध्याच्या बाजार स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी

bhalchandra.joshi@whiteoakindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 12:04 am

Web Title: investor risks due to market downturn akp 94
Next Stories
1 विमा.. विनासायास : विमाराशी निवडीचे गणितही गरजेचे!
2 बाजाराचा तंत्र-कल : बाजाराने खरेच उच्चांक साधला काय?
3 रपेट बाजाराची : विक्रीवाल्यांचा जोर
Just Now!
X