अजय वाळिंबे

अगेल्या वर्षी मार्च महिन्यात १५६ रुपयांना सुचविलेल्या या शेअरने पोर्टफोलियोच्या वाचक गुंतवणूकदारांचा फायदाच करून दिला आहे. लवकरच अर्थसंकल्प सादर होईल. अर्थमंत्र्यांनी सूचित केल्यानुसार यंदाचा अर्थसंकल्प न भूतो न भविष्यती असणार आहे. परंतु शेअर बाजारच्या मनात काय असेल ते सांगता येत नाही आणि म्हणूनच अशा वेळी शेअर बाजारातही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधायला हवा.

सुमारे ११० वर्षांपूर्वी इम्पिरियल टोबॅको कंपनी या नावाने स्थापन झालेली आयटीसी ही देशातील एक अग्रगण्य एफएमसीजी मार्केटर आहे. सुरुवातीला केवळ तंबाखू आणि सिगारेट उत्पादनात असलेली आयटीसी आज पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग उद्योगासह कृषी-अन्नप्रक्रिया, हॉटेल्स, बिस्किट्स, रेडी टू इट, साबण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन तसेच तयार कपडे अशा अनेकविध क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी असून तिची भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून देखील ओळख आहे. कंपनीच्या उत्पादनाची निर्यात जगातील ६० देशांना होते. आयटीसीची संपूर्ण मालकीची उपकंपनी आयटीसी इन्फोटेक ही एक विशेष जागतिक डिजिटल सोल्युशन्स प्रदाता आहे. कंपनी लवकरच डेअरी उत्पादनात देखील पदार्पण करणार आहे. कंपनीमध्ये सुमारे २६,००० कर्मचारी कार्यरत आहेत.

गेल्या दशकात आयटीसीच्या नवीन कंझ्युमर गुड्स बिझनेसजने जागतिक स्तरावरील भारतीय ब्रँडचा एक उत्तम पोर्टफोलिओ स्थापित केला आहे. आशीर्वाद, सनफिस्ट, यिप्पी!, बिंगो!, बी नॅचरल, आयटीसी मास्टर शेफ, फॅबेल, सनबिन, फियामा, एंगेज, विव्हेल, सॅव्हलॉन, क्लासमेट, पेपरक्राफ्ट, मंगलदीप इ. अनेकविध ब्रँड्सने अल्पवधीतच आयटीसीला मोठय़ा एफएमसीजी कंपनीचे स्थान मिळवून दिले आहे. विल्स, गोल्ड फ्लेक आणि ५५५ हे सिगरेट उत्पादनातील तिचे प्रमुख ब्रँड आहेत.

कोविडकाळात देखील कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. सप्टेंबर २०२० साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत दोन टक्के वाढ साध्य करून १३,१४८ कोटी रुपयांवर नेली आहे तर निव्वळ नफ्यात १८ टक्के घट होऊन तो ३,३६८ कोटी रुपयांवर आला आहे. मंदीच्या वातावरणातही कामगिरी सरस असली तरीही करोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या आर्थिक वर्षांत थोडा नकारात्मक परिणाम होऊ  शकतो. मात्र टाळेबंदीपश्चात एफएमसीजीसारख्या क्षेत्रात तेजी अपेक्षित आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांच्या तुलनेत १३ महत्त्वाच्या व्यवसायात गुंतलेली, २५ प्रसिद्ध ब्रँड असलेली आणि अनेक दर्जेदार उत्पादने देणारी आयटीसीसारखी कंपनी गुंतवणूक सुरक्षित ठेवून तुमच्या पोर्टफोलियोला भक्कम आधार देईल. आयटीसीने आपल्या गुंतवणूकदारांना कायमच भरभरून दिले आहे. आगामी कालावधीत देखील कंपनी आपल्या भागधारकांना खूश ठेवेल यांत शंका नाही.

आयटीसी लिमिटेड

(बीएसई कोड – ५००८७५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २१०.६५

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.२४३/१३५

भरणा झालेले भागभांडवल : रु. १२३०.५० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक —

परदेशी गुंतवणूकदार      १२.९६

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ४३.५४

इतर/ जनता     ४३.५०

संक्षिप्त विवरण

* शेअर गट     : लार्ज कॅप

* प्रवर्तक       : —

* व्यवसाय क्षेत्र  : सिगारेट/ एफएमसीजी

* पुस्तकी मूल्य : रु. ४८

* दर्शनी मूल्य   : रु. १/-

* लाभांश       : १०१५%

शेअर शिफारसीचे निकष

* प्रति समभाग उत्पन्न:      रु. ११.१५

* पी/ई गुणोत्तर :    १८.४

* समग्र पी/ई गुणोत्तर :      १५

* डेट इक्विटी गुणोत्तर :      ००

* इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ३२६

* रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ३२.६

*  बीटा :     ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.