13 July 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : बहुविध व्यवसाय, सशक्त नाममुद्रा

कुठलाही जास्त विचार न करता सुरक्षित गुंतवणूक करण्यासारखे काही जे मोजक्या कंपन्यांचे शेअर्स आहेत त्यात आयटीसीसारखी कंपनी मोडते.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

कुठलाही जास्त विचार न करता सुरक्षित गुंतवणूक करण्यासारखे काही जे मोजक्या कंपन्यांचे शेअर्स आहेत त्यात आयटीसीसारखी कंपनी मोडते. गेली कैक वर्षे या कंपनीने गुंतवणूकदारांना भरभरून दिले आहे.

वर्ष १९१० मध्ये स्थापन झालेली आयटीसी लिमिटेड ही एक बहुविध व्यवसाय विस्तार असलेली कंपनी आहे ज्यात खाद्यपदार्थ, पर्सनल केअर, सिगारेट आणि सिगार, वस्त्रोद्योग, शिक्षण व स्टेशनरी उत्पादने, धूप स्टिक वगैरे विविध वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. या एफएमसीजी कंपनीचा विस्तार अनेक क्षेत्रांत असून त्यात हॉटेल्स, पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग, अ‍ॅग्री बिझिनेस आणि इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी आदींचा समावेश होतो. इम्पिरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या नावाने २४ ऑगस्ट १९१० रोजी कंपनीची स्थापना झाली. कंपनीच्या मालकीचे क्रमाक्रमाने भारतीयीकरण केल्यामुळे कंपनीचे नाव १९७० मध्ये इंडियन टोबॅको कंपनी लिमिटेड आणि नंतर आयटीसी लिमिटेड करण्यात आले.

आयटीसी ही भारतातील आघाडीची खासगी क्षेत्रातील एक बलाढय़ एफएमसीजी कंपनी आहे तसेच अग्रगण्य एफएमसीजी मार्केटरही आहे. बाजारातील जवळपास १०.८ अब्ज डॉलर्सची एकूण विक्री मूल्य असलेल्या या कंपनीची भारतातील सर्वात मूल्यवान व्यावसायिक संस्था म्हणून ओळख आहे. फॉच्र्युन इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार आयटीसीला भारताची सर्वाधिक प्रशंसनीय कंपनी म्हणून स्थान देण्यात आले आहे.

सुरुवातीला केवळ सिगारेट उत्पादनात ओळख असलेल्या या कंपनीने गेल्या दशकात नवीन कंझ्युमर गुड्स व्यवसायाने जागतिक स्तरावरील भारतीय ब्रँडचा एक उत्तम पोर्टफोलिओ स्थापित केला आहे. गोल्ड फ्लेक आणि विल्स या मुख्य ब्रॅण्ड व्यतिरिक्त आशीर्वाद, सनफीस्ट, यिप्पी!, बिंगो, बी नॅचरल, आयटीसी मास्टर शेफ, फॅबेल, सनबिन, फियामा, एंगेज, विव्हेल, सॅव्हलॉन, क्लासमेट, पेपरक्राफ्ट, मंगलदीप आणि इतरांसह आयटीसीच्या जागतिक स्तरावरील एफएमसीजी ब्रॅण्ड्सने ग्राहकांना आकर्षति केले आहे.

आपल्या भागधारकांना सातत्याने लाभांश आणि बोनस शेअर्सने समृद्ध करणारी ही कंपनी आर्थिक कामगिरीवरदेखील कायम आघाडीवर राहिली आहे. सप्टेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ११,७५०.१६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४,०२३.१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ३६ टक्क्यांनी अधिक आहे. सध्या सर्वच स्तरावर मंदीसदृश वातावरण असताना कंपनीने उत्तम आर्थिक कामगिरी करून दाखवली आहे. खऱ्या अर्थाने एक बलाढय़ एफएमसीजी कंपनी असलेल्या आयटीसीकडून आगामी कलावधीतदेखील सरस कामगिरीची अपेक्षा आहे. कायम पोर्टफोलियोमध्ये ठेवण्यासारखा असलेला हा ब्ल्यूचिप कंपनीचा शेअर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून कधीही खरेदी करायला हरकत नाही.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

आयटीसी लिमिटेड

शुक्रवारचा बंद भाव : रु. २५०.६५

(बीएसई कोड – ५००८७५)

लार्ज कॅप समभाग

व्यवसाय :  सिगारेट/एफएमसीजी

बाजारभांडवल:  रु. ३०८,००० कोटी

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक:     रु.  ३१०/२३४

भागभांडवल:  रु. १२२८.८५  कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    —

परदेशी गुंतवणूकदार  १५.६४

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ४२.४७

इतर/ जनता    ४१.८९

पुस्तकी मूल्य : रु. ४७.६०

दर्शनी मूल्य :   रु. १/-

लाभांश :  ५७५%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. ११.३५

पी/ई गुणोत्तर : २२.१८

समग्र पी/ई गुणोत्तर :    २५

डेट इक्विटी गुणोत्तर :    ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४६१.२२

रिटर्न ऑन कॅपिटल : ३४.६२

बीटा :    ०.८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 4:11 am

Web Title: itc shares stock market abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : आमचं खरंच ठरलंय!
2 नावात काय? : प्रादेशिक समग्र आर्थिक भागीदारी (आरसेप)
3 कर बोध : तोटा आणि प्राप्तिकर कायदा
Just Now!
X