वसंत कुलकर्णी

नकारात्मक घटना ज्या ज्या वेळी बाजारावर अल्प काळासाठी परिणाम करतात त्या त्या वेळी समभाग खरेदी करण्याची संधी असते..

‘‘या व्यवसायात ५० वर्षे काढूनही बाजारात वेळ साधून सातत्याने यशस्वी  झालेली व्यक्ती माझ्या परिचयाची नाही.’’

–  जॉन सी. बॉगल

जॉन क्लिफ्टन बॉगल जे व्हॅनगार्ड समूहाचे संस्थापक होते. व्हॅनगार्ड समूह हा जगातील सर्वातमोठा इंडेक्स फंड आहे. त्यांच्या परिचित वर्तुळात ते जॅक बॉगल म्हणूनच ओळखले जात. बाजारात वेळ साधणे हे अतिशय कठीण काम असल्याचे वेळोवेळी सांगितले. अशा वेळी काही तथाकथित मार्केट पंडित, मंदी येणार असल्याने सध्या गुंतवणूक करू नका असा सल्ला देताना आढळतात. जॅक बॉगलनासुद्धा जमले नाही ते या मार्केट पंडितांना जमेल असा यांचा दावा आहे.

जॅक बॉगल यांची अशी विचारसरणी आहे की, ‘‘बाजारातील सर्व घसरण तात्पुरती आहे आणि अखेरीस बाजार समभागांना त्यांचे योग्य ते मूल्यांकन देईल. सर्व घसरण मागे पडण्याची संधी बाजारात येत असते. म्हणून जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा समभाग खरेदी करण्याची नियोजनबद्ध प्रक्रिया करणे आवश्यक आहे. हे मान्य करता नजीकच्या काळातील बाजाराच्या वाटचालीबद्दल मी भाष्य न करणे पसंत करून बाजाराच्या नजीकच्या वाटचालीचा अंदाज लावण्यास मी सक्षम नाही.’’ जॅक बॉगल यांचे हे विचार एकदा का पटले की, अमक्या फंडात सुरू असलेली गुंतवणूक खराब कामगिरी करीत आहे म्हणून ‘मी एसआयपी बंद करू का?’ हा प्रश्न फिजूल आहे.  नकारात्मक घटना  ज्या ज्या वेळी बाजारावर अल्प काळासाठी परिणाम करतात त्या त्या वेळी समभाग खरेदी करण्याची संधी असते.

गुंतवणुकीची संधी कुठे असा प्रश्न फंड व्यवस्थापकांना विचारला तर स्मॉल कॅपच्या परिघातील समभागांच्या किमतीतील तीव्र घसरणीमुळे स्मॉल कॅपकडे पुन्हा नव्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. स्मॉल कॅप समभागांच्या नफा-नुकसानीचे गुणोत्तर नफ्याच्या बाजूचे असल्याने नजीकच्या काळात स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक फायद्याची असेल, असे उत्तर मिळते.

स्मॉल-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी स्मॉल-कॅप फंडाची निवड करण्याचे निकष निश्चित असतात.

* फंड परतावा

* गुंतवणुकीशी संबंधित जोखीम

* समभागांच्या किमतीत वाढ होण्याची क्षमता (पोर्टफोलिओ)

* गुंतवणुकीतील वैविध्य लाभ

या निकषांवर पुढील महिन्यात वर्षपूर्ती करणारा ‘बीओआय अ‍ॅक्सा स्मॉलकॅप फंड’ असाच लक्षवेधी फंड ठरला आहे. हा फंड कमीत कमी पाच वर्षांच्या एसआयपी कालावधीसह उच्च-जोखीमांक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. अजय खंडेलवाल हे १९ डिसेंबर २०१८ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड ‘सेबी’च्या म्युच्युअल फंड प्रमाणीकरणानंतर अस्तित्वात आलेला फंड असल्याने, फंडाच्या गुंतवणुकीत ६५ टक्के स्मॉलकॅप आणि ३५ टक्के लार्ज आणि मिड कॅप धाटणीचे समभाग आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत समभागांची निवड करताना निधी व्यवस्थापक संख्यात्मक आणि गुणात्मक विश्लेषण करतात. एकूण पोर्टफोलीओ पैकी ६६ टक्के समभाग गुंतवणूक असलेल्या कंपन्या, मागील किमान चार तिमाही उत्सर्जनात १५ टक्के वृद्धी राखणाऱ्या आहेत. या कंपन्यांच्या ताळेबंदात मर्यादित कर्ज घेतल्याचे दिसते. तसेच जिनसांच्या किंमतींमुळे नफ्यावर विपरीत परिणाम होणाऱ्या आणि व्यापारचक्राशी निगडित असलेल्या कंपन्या वगळल्याचा सकारात्मक परिणाम फंडाच्या कामगिरीत दिसून आला आहे. बहुतेक स्मॉल कॅप फंडाच्या गुंतवणुकीत रसायन उद्योगातील कंपन्यांचा आघाडीच्या गुंतवणुकीत समावेश आहे तसा ‘बीओआय अ‍ॅक्सा स्मॉलकॅप फंडा’च्या गुंतवणुकीत तिसऱ्या क्रमांकावर रसायन क्षेत्र असून एकूण गुंतवणुकीच्या ११.४४ टक्के गुंतवणूक रसायन क्षेत्रातील नवीन फ्लोरिन सुदर्शन केमिकल्स, गॅलेक्सी सरफॅक्टंट, अतुल लिमिटेड, सोलर इंडस्ट्रीज या कंपन्यांतून केली आहे. सर्वाधिक २५ टक्के गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा उद्योगात केली आहे. गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा उद्योगातील गुंतवणूक केलेल्या कंपन्या मिड कॅप आणि लार्ज कॅप प्रकारात मोडणाऱ्या आहेत. त्या खालोखाल औद्योगिक वापराच्या वस्तू ज्या मध्ये ग्राइंडवेल नॉर्टन, टिमकेन इंडिया, एनआरबी बेअिरग्ज या सारख्या कंपन्यांतून गुंतवणूक केली आहे. वैयक्तिक वापराच्या ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगातील, रिलॅक्सो फूटवेअर, ला ओपाला, व्हीआयपी इंडस्ट्रीज यांसारख्या त्या त्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांतून गुंतवणूक केली आहे. ‘बीओआय अ‍ॅक्सा स्मॉल कॅप फंड’ अल्प मुदतीत दीर्घकालीन वृद्धीदर असलेल्या गुंतवणुकीच्या संधींचा आढावा घेतो. स्मॉलकॅप गुंतवणूकीतून मिळणारा नफा मुख्यत्वे उद्योग क्षेत्रांऐवजी अचूक समभाग निवडीवर ठरत असतो. फंडाच्या कामगिरीच्या घसरणीला किंवा सुधारणेला एखादे उद्योग क्षेत्र कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ या फंडाच्या गुंतवणुकीत वाहन क्षेत्रातील समभाग नाहीत. परंतु वाहन पूरक उत्पादनांच्या कंपन्यांतून ३.८७ टक्के गुंतवणूक आहे. तसेच भांडवली वस्तूंच्या उत्पादक कंपन्यांतून गुंतवणूक नाही. पण या उद्योगात वापरल्या जाणाऱ्या बेअिरग्ज, अ‍ॅब्रेसिव्ह, रिफ्रॅक्टरीज निर्मात्या कंपन्या आहेत. सीमेंट उद्योगात गुंतवणूक नाही, पण सिमेंटचा वापर होणाऱ्या कंपन्यांतून गुंतवणूक केली आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत पुरेसे वैविध्य आहे. सर्वाधिक ३.४४ टक्के गुंतवणूक आयसीआयसीआय बँकेत आहे. मागील वर्षभरात फंडाचा मानदंड असलेल्या ‘निफ्टी स्मॉल कॅप १०० टीआरआय इंडेक्स’ मध्ये १० टक्के घारण झाली, पण फंडाच्या एनएव्हीत त्यापेक्षा कमी घसरण झाली आहे. फंडाच्या एनएव्हीने ४ जूनला १०.७७ चा कमाल स्तर गाठला आणि त्या नंतर ५ ऑगस्टला ९.२७ ची किमान पातळी गाठली. वर्षभरात एक हजार रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदरांना ४.४५ टक्के परतावा मिळाला असून १२ हजाराच्या गुंतवणुकीचे १५ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १२,१९४ रुपये झाले आहेत. निफ्टीच्या तुलनेत स्मॉल कॅप निर्देशांकाचे किमतीचे उत्सर्जनाशी असलेला अधिमूल्य दोन वर्षांपूर्वी ७० टक्के होते. वर्ष-दीड वर्षांतील घसरणीमुळे निफ्टीचे अधिमूल्य पुन्हा वाढले आहे. सध्या स्मॉल कॅप निर्देशांकापेक्षा निफ्टीचे मूल्यांकन १५ टक्के अधिक आहे. त्यामुळे ताज्या मूल्यांकनांतील फरकामुळे स्मॉल-कॅप वर्तुळात गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याची क्षमता आहे. अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट, आयआरसीटीसी सारखे १० ते १४ हजार कोटी बाजारभांडवल असणारे दर्जेदार स्मॉलकॅप नव्याने उदयाला येत असल्याने आता स्मॉल कॅप निधी व्यवस्थापकांना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होत आहेत. परंतु स्मॉल कॅप वर्तुळ हे ‘हाय रिस्क, हाय रिटर्न प्रकारात मोडणारे असल्याने प्रसंगी तोटा सहन करण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदार या फंडाचा गुंतवणुकीसाठी विचार करू शकतात.

shreeyachebaba@gmail.com