|| अजय वाळिंबे

कजारिया सिरॅमिक्स ही ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी  भारतातील आघाडीची व सर्वात मोठी सिरॅमिक्स कंपनी आहे. कंपनीने टाइल्स, गॅ्रनाइट आणि मार्बलमधील विविध उत्पादने बाजारात आणतानाच आपली उत्पादन क्षमता १० लाख चौरस मीटरवरून ६८ लाख चौरस मीटपर्यंत वाढविली आहे. कंपनीचे देशात सात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून पैकी तीन गुजरात, दोन राजस्थानमध्ये, तर उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशात प्रत्येकी एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प विस्तार कंपनीने विजयवाडा येथील वेंनार सिरॅमिक्स, तर मोरबी येथील जॅकस वीट्रीफाइड आणि कासा सिरॅमिक्स या कंपन्या ताब्यात घेऊन केला आहे. उत्पादनातील विविधता, आकर्षक डिझाइन तसेच गुणवत्ता यामुळे कजारियाची उत्पादने भारतासह जगभरात प्रसिद्ध आहेत. युरोपसहित सुमारे ३५ देशांत उत्पादने निर्यात करणाऱ्या या कंपनीने कजारिया आणि रिकॉल हे ब्रँड सातासमुद्रापलीकडे प्रसिद्ध केले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागलेले इंधन (गॅस) यामुळे गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने शेअर बाजारात तसेच आर्थिक आघाडीवर फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. डिसेंबर २०१८ अखेर समाप्त तिमाहीत कंपनीने ७००.२ कोटींच्या उलाढालीवर ६५.५८ कोटी रुपये नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १० टक्क्यांनी अधिक आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून स्थिरावलेल्या कच्च्या तेलाच्या किमती तसेच गॅसच्या किमतीत झालेली घट कंपनीच्या पथ्यावर पडेल. कंपनीने आपल्या उत्पादनांच्या विक्री किमतीतदेखील एक-दोन टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने, राजस्थानमधील मौलताना येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता ६.५० एमएसएमवरून १२.१० एमएसएमपर्यन्त वाढवायला मंजुरी दिली आहे. या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत कजारिया कायम आघाडीवर असल्याने आगामी कालावधीत कंपनीच्या उलाढालीत किमान १०-१५ टक्के वाढ होईल. त्यामुळेच येत्या आर्थिक वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरीच्या अपेक्षा आहेत. सध्याच्या अशाश्वत बाजारात हा शेअर तुम्हाला ५००-५२५ च्या दरम्यान मिळाला तर मध्यम कालावधीत उत्तम परतावा देऊ शकेल.