|| अजय वाळिंबे

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड  (बीएसई कोड – ५३२७१४)

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड ही आरपीजी समूहाची एक प्रमुख कंपनी असून ती आंतरराष्ट्रीय स्तरातील अभियांत्रिकी, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन (ईपीसी) व्यवसायातील मोठी कंपनी आहे. पॉवर ट्रान्समिशन व वितरण, केबल्स, रेल्वे, सिव्हिल, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोलर इ. अनेक व्यवसायात कंपनी कार्यरत आहे. कंपनीने आफ्रिका, अमेरिका, मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियामधील जवळपास १०० देशांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास केला आहे.

मार्च २०१९ अखेर समाप्त आर्थिक वर्षांकरिता कंपनीने १०,११७.८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४९७.४९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो १६ टक्क्य़ांनी अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपनी अतिशय नियोजनपूर्वक आपले विस्तारीकरण करताना दिसत आहे. आतापर्यंत कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये पॉवर ग्रिडचा समावेश होता तसेच उलाढालीतही प्रमुख वाटा पॉवर ग्रिडचाच होता. मात्र गेल्या दोन वर्षांत कंपनीने आपला व्यवसाय विस्तारताना पॉवर ग्रिडचा हिस्सा ३० टक्क्य़ांवरून ७ टक्क्य़ांवर आणला आहे. कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये आता रेल्वे (२६ टक्के) तसेच राज्य विद्युत मंडळांचा हिस्सा वाढला आहे. तसेच कंपनीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील, प्रामुख्याने सार्क समूहातील राष्ट्रांशी व्यवहार वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीने आपला कर्जभार देखील कमी करून डेट इक्विटी गुणोत्तर ०.६ वर आणले आहे. कंपनीला नुकत्याच १,३२३ कोटी रुपयांच्या नव्या ऑर्डर मिळाल्या असून एकूण ऑर्डर बुक २०,३०७ कोटी रुपयांचे झाले आहे.

उत्तम अनुभवी प्रवर्तक, भरीव ऑर्डर बुक आणि देशांतर्गत पायाभूत सुविधांवर असलेला भर यामुळे केईसी आकर्षक खरेदी ठरू शकते. सध्याच्या अनिश्चित वातावरणात केलेली ही खरेदी दोन वर्षांच्या कालावधीत २५-३५ टक्के परतावा देऊ शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.