अजय वाळिंबे

केएनआर कन्स्ट्रक्शन लि.

(बीएसई कोड – ५३२९४२)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २१२/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. २४२/८६

केएनआर कन्स्ट्रक्शन्स ही कंपनी १९९५ मध्ये स्थापन झालेली असली तरीही तिची खरी सुरुवात कंपनीचे प्रवर्तक के नरसिंह रेड्डी यांच्या भागीदारी व्यवसायातून १९७९ मध्ये झाली. म्हणजे जवळपास ४० वर्षांचा अनुभव या कंपनीच्या पाठीशी आहे. सुरुवातीला केवळ स्थापत्य आणि बांधकामाची कंत्राटे घेणारी ही कंपनी २००८ सालच्या प्रारंभिक भागविक्री – ‘आयपीओ’नंतर मोठी कंत्राटे घेऊ लागली. गेल्या वीस वर्षांत भारतातील १२ राज्यांमध्ये तिने कामे केली असून सुमारे ५,८८८ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले आहेत. सध्या कंपनी रस्ते बांधणी, महामार्ग टोल प्रोजेक्ट्स तसेच धरणे, पाटबंधारे आणि पाण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. या खेरीज कंपनी ईपीसी प्रकल्पदेखील हाती घेते. आजच्या घडीला कंपनीकडे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी)’ तत्त्वावरील २० प्रकल्प असून त्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) १५ प्रकल्प तसेच एक ईपीसी प्रकल्प असे मिळून सुमारे २० अब्ज रुपयांच्या कंत्राटांवर तिची कामे सुरू आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षांतदेखील कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीने कर्जाचा भार कमी केला असून पायाभूत क्षेत्रातील या कंपनीचे डेट इक्विटी गुणोत्तर केवळ ०.१३ टक्के आहे. कंपनीने नुकताच १:१ प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप केले आहे.

कोविड कालावधीत म्हणजेच सप्टेंबर, पाठोपाठ डिसेंबर २०२० अखेर संपलेल्या तिमाहीतही कंपनीने समाधानकारक कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या तिमाहीच्या उलाढालीत डिसेंबर २०१९च्या तुलनेत कंपनीने २३ टक्के वाढ नोंदवून ती ६८६.२७ कोटी रुपयांवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ७७.२० टक्के वाढ होऊन तो ७७.५८ कोटी रुपयांवर गेला आहे. आगामी कालावधी केएनआरसाठी आशादायी, प्रगतिकारक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. यंदाच्या अर्थसंकल्पांत पायाभूत सुविधा तसेच रस्ते बांधणीसाठी मोठी तरतूद केली गेली असून पायाभूत सुविधांच्या नियोजनांनुसार राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण अजून तीन वर्षे तरी गतिमानतेने चालू राहील अशी आशा आहे. कंपनीच्या आतापर्यंतच्या  कामगिरीचा आलेख, अनुभव आणि क्षमता पाहता आगामी काळात कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल यांत शंकाच नाही. अल्प कर्ज असलेल्या या कंपनीतील मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

बाजार भांडवल :

रु. ५,९५४ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. २८.१२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ५५.०३

परदेशी गुंतवणूकदार  १.५३

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ३४.२८

इतर/ जनता    ९.१६

संक्षिप्त विवरण

* शेअर गट : स्मॉल कॅप

* प्रवर्तक   : के. नरसिंह रेड्डी

* व्यवसाय क्षेत्र  :  रस्ते/ बांधकाम

* पुस्तकी मूल्य : रु. ६२.८

* दर्शनी मूल्य   : रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश : २५%

शेअर शिफारसीचे निकष

* प्रति समभाग उत्पन्न : रु. १३.७

*  पी/ई गुणोत्तर : १९.४

*  समग्र पी/ई गुणोत्तर :  १२

*  डेट इक्विटी गुणोत्तर :  ०.१३

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :  ३.५४

* रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : १९.७

*  बीटा : ०.५५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.