20 January 2021

News Flash

‘दीघरेद्देशी गुंतवणूक नियोजन बदलण्याची आवश्यकता नाही’

आभासालाच वास्तव समजायला शिकविणारे हे वर्ष होते.

कैलाश कुलकर्णी

एकीकडे, प्रतिबंधक लशी जरी आल्या असल्या तरी, करोनाशी संलग्न अनिश्चिततेने पाठलाग सुरूच ठेवला आहे. तर दुसरीकडे या अस्थितरतेत, भांडवली बाजार निर्देशांकांची विक्रमी उच्चांकांच्या दिशेने स्थिरपणे दौड सुरू आहे. अशा स्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे, याचे एल अँड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजममेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कुलकर्णी यांचे हे दिशादर्शन..

* सरलेले वर्ष सर्वाधिक अस्थिरतेचे वर्ष होते. तुम्ही या सरलेल्या वर्षांकडे कसे पाहता?

– सरलेल्या वर्षांने राव आणि रंक दोघेही नियतीच्या लेखी समान असतात हे पुन्हा अधोरेखित केले. एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळते तेव्हा ती आपत्ती गरीब आणि श्रीमंत असा भेद करीत नाही. अनेकांनी त्यांचे रोजगार गमावले. अनेक कुटुंबांनी घरातील कर्ते गमावले. फरक होता तो हा आघात सहन करण्याच्या क्षमतेचा. एखाद्या श्रीमंताला या आपत्तीचा फटका कमी तर गरिबावर याचा अधिक परिणाम झाला असेल. करोनाने माणसांच्या जीवनशैली बदलल्या. विशिष्ट वयोगट किंवा सामाजिक स्तरापुरते मर्यादित असलेल्या ‘ऑनलाइन’ व्यवहारांनी जग व्यापले. भेटीगाठी आभासी पद्धतीने होऊ लागल्या. थोडक्यात आभासालाच वास्तव समजायला शिकविणारे हे वर्ष होते.

* करोना महामारीपासून गुंतवणूकदारांनी काय शिकावे असे तुम्हाला वाटते?

– बाजारात वेळ साधणे हे कठीण असते याचा वस्तुनिष्ठ पाठ देणारे हे वर्ष होते. वर्ष २०२०ची सुरुवात निर्देशांकांनी नवीन शिखरे गाठून केली. मार्च महिन्यात महामारीची चाहूल लागली आणि टाळेबंदी जाहीर झाली. निर्देशांकांनी शिखरावरून ३० टक्के घसरण अवघ्या काही दिवसांत नोंदविली. आणि वर्षअखेरीस पुन्हा नवीन उच्चांकी झेप नोंदविली. ज्यांनी मागील जानेवारीत आपला निधी समभाग गुंतवणुकीतून रोखे गुंतवणुकीकडे वळविला त्यांनी स्वत:चीच पाठ नक्कीच थोपटली असेल. परंतु बाजार खाली जाईल या अपेक्षेने रोखे गुंतवणुकीत वळविलेला निधी समभागसंलग्न फंडांमध्येही संक्रमित झाला असेल. एकूणात, बाजारात वेळ साधता येत नाही हे गुंतवणूकदारांनी या काळात अनुभवले असण्याची शक्यता आहे.

आर्थिक शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले. तथापि मिळते म्हणून घेतलेले कर्ज अशा परिस्थितीत किती तापदायक ठरू शकते याचा अनुभव काही कर्जदारांना आला असेल. आवश्यक आहे त्यापेक्षा थोडे कमी कर्ज घेणे नेहमीच चांगले. साहजिकच अतिरिक्त कर्जभार टाळण्याचा धडा करोना महामारीने शिकविला.

* टाळेबंदीपश्चात भांडवली बाजाराचे निर्देशांक नवीन शिखरांना स्पर्श करताना दिसत असून मालमत्तेचा विस्तार होत असला तरी गुंतवणूकदारांकडून निधी काढला जात आहे. काय सांगाल?

– मालमत्ता विभाजन हाच संपत्ती निर्मितीतील यशाचा पाया आहे. दीर्घ काळ सुरू असलेल्या ‘एसआयपी’ चांगला परतावा देत नव्हत्या. सर्वव्यापी तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांना  मागील तुलनेत चांगला परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदार पैसे काढून घेताना दिसत आहेत.

* अशावेळी नेमके गुंतवणूकदारांनी काय करावे?

समभागांशी निगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी असते. आपल्या सर्वच वित्तीय ध्येयांची पूर्तता एका वर्षांत होत नसते. पाच ते सात वर्षांनंतर पूर्तता करायच्या वित्तीय ध्येयांसाठी सध्याचे नीचांकी व्याजदर पाहता, समभाग गुंतवणुकीला पर्याय नाही. दूरच्या कालखंडात पूर्तता असलेल्या वित्तीय ध्येयांसाठी केलेल्या नियोजनात बदल करण्याची आवश्यकता नाही. जवळच्या अर्थात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीतील वित्तीय ध्येयांसाठी अंशत: नफावसुली करून रोखे आणि समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात मालमत्ता संतुलन साधणे गरजेचे आहे. शेवटी जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि वित्तीय ध्येयासापेक्ष केलेली तरतूद यावर हे ठरते. तुमचा म्युच्युअल फंड विक्रेता या बाबतीत व्यक्तिगत सल्ला देऊ शकेल. गुंतवणूक ही वैयक्तिक असते तसाच सल्लासुद्धा वैयक्तिक असतो. एखाद्या वित्तीय ध्येयासाठी सार्वजनिक सल्ला देणे योग्य ठरणार नाही.

व्यापार प्रतिनिधी

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 12:01 am

Web Title: l t investment management company ceo kailash kulkarni interview zws 70
Next Stories
1 विम्यातील ‘न्यू-नॉर्मल’ची रुजुवात
2 निर्देशांकांचे २०२१ मधील संक्रमण..!
3 रिस्क है तो..
Just Now!
X