28 October 2020

News Flash

अर्थ वल्लभ : आहे मनोहर तरी..

भांडवली बाजाराला बसणाऱ्या धक्क्य़ांमुळे निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांच्या गुंतवणुकीवर देखील तोटा झाल्याचे दिसत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वसंत कुलकर्णी

‘गोठय़ात दुध काढणाऱ्याला शेणाचा वास टाळता येत नाही’ अशी म्हण आहे. त्याप्रमाणे, समभाग गुंतवणूकदाराला समभाग गुंतवणुकीतील नफा हवा असेल तर अस्थिरतेचा परिणाम सहन करावा लागतो. समभाग गुंतवणुकीचा नफा निश्चित उत्पन्न मिळणाऱ्या व्याजासारखा सरळ रेषेत नसतो. भांडवली बाजाराला बसणाऱ्या धक्क्य़ांमुळे निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांच्या गुंतवणुकीवर देखील तोटा झाल्याचे दिसत आहे.

कवी सरस्वतीकंठाभरण (दिनकर नानाजी शिंदे) यांची ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ असे धृवपद असणारी एक सुंदर कविता आहे. सारे काही मनोहर असूनही छोटेसे न्यूनहि मनाला उदास करते असा या कवितेचा आशय आहे.

म्युच्युअल फंडातून सध्या मिळत असलेला परतावा समाधानकारक वाटत नसल्याने गुंतवणूकदारांची अवस्था

अम्रादिकी गगनचुंबिती थोर वृक्षी

उद्यन एक भरले लतिकाविशेषी

तेथे परंतु वसंत न करी विलास

‘आहे मनोहर तरी गमते उदास’

या ओळींची आठवण व्हावी अशी झाली आहे.

मागील दोन वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात आपल्या बचतीचा मोठा हिस्सा गुंतविण्यास सुरवात केली. या नवगुंतवणूकदारांनी समभाग गुंतवणूकीस सुरवात करण्याचा निर्णय मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांचा २०१७ आणि २०१६ मधील परतावा पाहून घेतल्याचे उघड दिसत आहे.

सध्या साहजिकच मिड कॅप गुंतवणूक असलेले फंड हा या नवगुंतवणूकदारांच्या चिंतेचा विषय तर लार्ज कॅप गुंतवणूकदारांच्या नाखुषीचा विषय आहे. मिड कॅप फंडाच्या ३ वर्षांच्या एसआयपीची कामगिरी १.५ ते १२ टक्के नफा असल्याचे दर्शविते. बहुसंख्य नवगुंतवणूकदारांना जानेवारी ते मे महिन्यापर्यंतच्या काळातील अस्थिरता सहन होत नसल्याने मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडातील गुंतवणुकीबाबत चिंता वाटणे साहजिक आहे.

‘गोठय़ात दुध काढणाऱ्याला शेणाचा वास टाळता येत नाही’ अशी म्हण आहे. त्याप्रमाणे, समभाग गुंतवणूकदाराला समभाग गुंतवणुकीतील नफा हवा असेल तर अस्थिरतेचा परिणाम सहन करावा लागतो. समभाग गुंतवणुकीचा नफा निश्चित उत्पन्न मिळणाऱ्या व्याजासारखा सरळ रेषेत नसतो. भांडवली बाजाराला बसणाऱ्या धक्क्य़ांमुळे निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांच्या गुंतवणुकीवर देखील तोटा झाल्याचे दिसत आहे. रोखे बाजारात झालेल्या ‘दिवाणी’ भूकंपामुळे बुधवारी टाटा कॉर्पोरेट बाँड फंडाच्या एनएव्हीत एखाद्या इक्वि टी फंडाप्रमाणे ३० टक्के घसरण झाली.

एकापेक्षा आणिक फंडांची कामगिरी तपासण्यासाठी फंडाचा चलत परतावा हे सर्वमान्य निकष आहे. मागील परताव्यापेक्षा (ट्रेलिंग रिटर्न्‍स) चलत परतावा (रोलिंग रिटर्न्‍स) बाजारातील अस्थिरता समजून घेण्यासाठी मागील कामगिरी तपासण्याची एक ‘बुलेट प्रूफ’ पद्धत समजली जाते.

बाजार हा नेहमीच एका मोठय़ा अर्थचक्राच्या एका विशिष्ट टप्प्यात असतो. जसे की, सध्याच्या तेजीला २०१४ मध्ये प्रारंभ झाला तरी बाजार वेगवेगळ्या टप्प्यात मंदीच्या विळख्यात सापडला होता. चलत परतावा तपासणे म्हणजे एका मोठय़ा कालावधीतील रोजच्या एसआयपीची कामगिरी तपासण्यासारखे असते. समभाग गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी केलेली असल्याने १५ वर्षांच्या कालावधीसाठी पाच वर्षांची चलत सरासरी तपासणे हा सर्वात योग्य कालावधी समजला जातो.

‘रिटर्न्‍स नहीं है’ वाल्यांनी हा कालावधी खूपच आशावादी असल्याची धारणा करून घेतल्याने पाच वर्षांच्या कालावधीसाठी तीन वर्षांची चलत सरासरी तपासायला कोणाची हरकत नसावी. ४ जून २०१४ ते ४ जून २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत फंडाच्या तीन वर्षे चलत सरासरी परताव्यापैकी ८५.३६ टक्के सकारात्मक परतावा दिला. याच कालावधीत ५७.३२ टक्के वेळा फंडाचा वार्षिक परतावा १२ टक्यांहून अधिक होता. यापेक्षा मोठा कालावधी अभ्यासाला असता १३ जानेवारी २००८ ते १३ जानेवारी २००९ या कालावधीत फंड गुंतवणुकीवर ६४.०९ टक्के तोटा झाला. तर पुढील वर्षी ९ मार्च २००९ ते ९ मार्च २०१० या कालावधीत फंडाने गुंतवणूकदारांना वार्षिक १४७.६१ टक्के नफा मिळवून दिला. याच फंडाने २ डिसेंबर २००८ ते २ डिसेंबर २०१० या कालावधीत ७४.८१ टक्के वृद्धे दिली (वार्षिक लाभ ३७.४० टक्के). अन्य मिडकॅप फंडांची कामगिरी सुद्धा थोडय़ाफार फरकाने अशीच असल्याचे दिसून आले.

भारतात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. साहजिकच भांडवली बाजाराने एका अस्थिरतेचा सामना केला. त्याचे प्रतिबिंब गुंतवणूकदारांच्या परताव्यात दिसले. समभाग गुंतवणुकीतील अस्थिरतेची दाहकता कमी करण्यासाठी एसआयपीसारखे शस्त्र नाही. ‘..बट रिटर्न्‍स नही है’ असे वाटल्याने ‘एसआयपी’ बंद करणे म्हणजे वित्तीय ध्येयांशी प्रतारणा आहे.

१० वर्षांंनंतरच्या वित्तीय ध्येयाच्या तरतुदीसाठी सुरू केलेली एसआयपी वर्ष दिड वर्षांत बंद करणे किंवा रक्कम काढून घेणे हे वित्तीय मागासलेपणाचे लक्षण आहे. एक प्रगल्भ गुंतवणूकदार होण्यासाठी आजूबाजूच्या अनावश्यक गोंगाटाकडे दुर्लक्ष करारायला शिकणे महत्वाचे असते. या अस्थिरतेचा उपयोग गुंतवणुकीचा समतोल साधण्यास करता येतो. मालमत्ता विभाजन निश्चित केल्यानंतर बाजाराच्या अस्थिरतेचा परिणाम झाल्यामुळे निर्धारित मालमत्ता विभाजनात बदल करणे हे वित्तीय आरोग्यास धोकादायक ठरू शकते. बाजाराचे मुल्यांकन सरासरीपेक्षा अधिक आहे सत्य असले तर समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडापासून तात्पुरती किंवा कायमची फारकत घेणे म्हणजे एसआयपीचा मुख्य फायदा असलेल्या ‘रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’चा फायदा गमाविण्यासारखे आहे.

पुढील एका वर्षांत सर्वोत्तम परतावा देणारा फंड शोधून काढता येईल काय असा कोणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. परंतु लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या पैकी कोणते फंड अधिक परतावा देतील असे विचारले तर मिड अँड स्मॉल कॅप धाटणीच्या फंडांची कामगिरी अन्य फंडाच्या तुलनेत उजवी असेल हे नक्की सांगता येईल. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक अधिक अस्थिर म्हणूनच अधिक परतावा देणारी असते. आजचे लार्ज कॅप मुल्यांकन हे अवास्तव पातळीवर आहे हे सत्य असले तरी समभागांचा उत्सर्जनात सुधारणा अपेक्षित असल्याने हे मुल्यांकन वाजवी पातळीवर लवकरच आलेले दिसेल.

दुसऱ्या बाजूला मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांचे मुल्यांकनसुद्धा तळाच्या अवास्तव पातळीवर आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप धाटणीच्या अनेक कंपन्या भांडवलावर १२ टक्कय़ाहून अधिक लाभ (आरओसी) मिळविणाऱ्या आहेत.

निवडक म्युच्युअल फंडांचे निधी व्यवस्थापक अशा कंपन्या हुडकून आपल्या फंडांच्या गुंतवणुकीत या कंपन्यांचा समावेश करण्यात माहीर असल्याचे त्यांच्या फंडांच्या ‘फॅक्टशीट’ वरून लक्षात येते.

दोन एक वर्षांपूर्वी रिलायन्स निप्पॉन लाईफ म्युच्युअल फंडाच्या अश्विनीकुमार यांची भेट झाली होती. त्यांचे वाक्य उधृत करण्याचा मोह याप्रसंगी आवरत नाही. ते म्हणाले होते, ‘अवर मार्केट्स आर इनपरफेक्ट मार्केट्स. अँड देअर इज आल्वेज गॅप इन द व्हॅल्युएशन इफ यु कुड फाईंड दॅट गॅप यु आर सक्सेसफुल स्टॉक पीकर.’

आज वर्तमान मुल्यांकन आणि कंपन्यांचा भविष्यातील वृद्धीदर यांच्यात असलेली तफावत या गुंतवणुकीवर भविष्यात वाजवी नफा मिळवून देईल ही अशा वाटावी अशी परिस्थिती नक्कीच आहे. म्हणूनच ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ असे वाटण्याचे कारण नाही.

मागील १२ ते १८ महिने मिड कॅप, स्मॉल कॅप फंडातील एसआयपी करण्यास सुरवात केली त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर वार्षिक १.५ ते १४ टक्कय़ांपर्यंत तोटा होत असल्याचे दिसत आहे.

मिड व स्मॉल कॅप समभागांचे मुल्यांकन तळाच्या पातळीवर आहे. त्यातील अनेक कंपन्या भांडवलावर १२ टक्कय़ाहून अधिक लाभ मिळविणाऱ्या आहेत.

shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 2:18 am

Web Title: lack of investments on fixed income schemes due to shocks in the capital market
Next Stories
1 कर बोध : अग्रिम कराचा पहिला हफ्ता १५ जूनपूर्वी..
2 नावात काय? : जनरलाईज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्स अर्थात जीएसपी
3 थेंबे थेंबे तळे साचे : अपघात विमा कशाला? मुदत विमा पुरणार का?
Just Now!
X