प्राप्तीकर कायद्यामध्ये ‘पगार ’ संज्ञेची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामध्ये मूळ वेतन (बेसिक) आणि महागाई भत्ता या बरोबरच विविध भत्ते (Allowances) आणि लाभ (Perks) सुद्धा समाविष्ट असतात. त्याच बरोबर अन्युइटी , पेन्शन, ग्रॅच्युइटी, वेतन थकबाकी, अग्रिम वेतन  (Advance Salary) यांचाही समावेश होतो. तसेच पगारदार व्यक्ती निवृत्त होताना त्या व्यक्तीला त्याच्या नावावर जमा झालेल्या रजेच्या मोबदल्यात जी रक्कम दिली जाते ती देखील पगार या संज्ञेमधे येते. त्या रकमेला ‘लिव्ह एन्कॅशमेंट’ असे म्हणतात. पगारदार व्यक्तीला निवृत्त होते वेळी जर अशी रक्कम मिळाली तर त्यावर कलम १० (१० एए) मधे कर सवलतीची तरतूद आहे.
प्राप्तीकर कायद्याच्या कलम १० (१० एए) प्रमाणे केंद्र अथवा राज्य सरकारी पगारदार व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम संपूर्णपणे करमुक्त मिळते.
परंतु केंद्र अथवा राज्य सरकारी नोकरी न करणाऱ्या पगारदार व्यक्तीला निवृत्त होताना जी रक्कम मिळते ती संपूर्णपणे करमुक्त मिळत नाही. या व्यक्तींबाबत करमुक्त रक्कम मोजण्याची एक पद्धत आहे.
खालील पकी जी रक्कम सर्वात कमी असेल ती करमुक्त मिळते :
१. प्रत्यक्षात मिळालेली ‘लिव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम किंवा
२. काम केलेल्या प्रत्येक वर्षांसाठी ३० दिवसांच्या भरपगारी रजेची रक्कम किंवा
३. दहा महिन्यांचा सरासरी पगार (पगार म्हणजे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता मिळून होणारी रक्कम) किंवा
४. रु. ३,००,०००/-
या ठिकाणी करदात्यांनी खालील महत्त्वाच्या तरतुदी लक्षात ठेवाव्यात:
१. ‘लिव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम ती व्यक्ती निवृत्त होतानाच कर मुक्त मिळते.
२. दिनांक ३ जुलै १९८१ च्या परिपत्रक ३०९  [ F. No. 200/125/79-IT (A-I) ] नुसार सरकारी नोकरदार व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मिळणारी रक्कम कर मुक्त मिळते.
३. दिनांक ५ नोव्हेंबर १९६५च्या परिपत्रक 35/1/65 IT(B) नुसार नोकरदार व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या नावे जमा झालेली ‘‘ प्रीव्हीलेज लिव्ह’’ (Privilege Leave)ची रक्कम त्याच्या कायदेशीर वारसांना कर मुक्त मिळते.
सोबतच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की प्राप्तीकर कायदा उत्पन्नावर कर आकारतो तसेच याच प्राप्तीकर कायद्यातच करसवलती सुद्धा दिल्या आहेत. फक्त त्याची आपल्याला माहिती हवी. म्हटलेच आहे ना, ‘‘ज्ञानातील गुंतवणूक – सर्वश्रेष्ठ गुंतवणूक!’’
लेखक गुंतवणूक व प्राप्तीकर नियोजन सल्लागार
‘लिव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम कशी मोजाल?
एक उदाहरण घेऊन कर मुक्त ‘लिव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम कशी मोजतात ते पाहूया:
सरकारी नोकरीमधे नसलेली एक व्यक्ती निवृत्त झाली. त्यावेळी त्या व्यक्तीचा दरमहा पगार होता : रु.२२,०००/-
एकूण सेवाकाळ : २८ वष्रे
निवृत्तीसमयी जमा झालेली   रजा: २५ महिने
वापरलेली रजा: १७ महिने
त्यांच्या नावे जमा झालेली  लिव्ह एन्कॅशमेंटची रक्कम: रु. ५,५०,०००

वरील माहितीच्या आधारे कर मुक्त लिव्ह एन्कॅशमेंटची रक्कम खालील प्रमाणे असेल:
१. प्रत्यक्षात मिळालेली लिव्ह एन्कॅशमेंटची रक्कम: रु. ५,५०,०००
२. काम केलेल्या प्रत्येक वर्षांसाठी ३० दिवसांच्या भरपगारी रजेची रक्कम:
३०  २८ वष्रे = ८४० दिवस = २८ महिने ( ८४० भागिले ३० दिवस )
वजा: वापरलेली रजा  = १७ महिने
    म्हणजे    = ११ महिने  २२,०००
        = रु. २,४२,०००/-
३. १० महिन्यांचा सरासरी पगार = रु. २,२0,०००/-
४. निश्चित रक्कम = रु. ३,००,०००/-
या चार रकमापकी रु. २,२0,००० ही रक्कम सर्वात कमी असल्याने ही रक्कम त्यांना करमुक्त मिळेल आणि राहिलेली रु. ३,३०,००० [ ५,५०,००० वजा २,२0,०००] ही रक्कम करपात्र ठरेल.
dattatrayakale9@yahoo.in