19 December 2018

News Flash

सही है

एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाची पहिली एनएएव्ही २६ फेब्रुवारी २०१५ रोजी रोजी जाहीर झाली.

मागील आठवडय़ात मॉर्निगस्टार आणि व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन या म्युच्युअल फंडांचे पतमापन करणाऱ्या संस्थांनी म्युच्युअल फंडांची पत जाहीर केली. वेगवेगळ्या फंडांना मिळालेल्या मानांकनांपैकी एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाच्या रेग्युलर ग्रोथला मॉर्निगस्टारने ‘फोर स्टार’ आणि व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइनने ‘थ्री स्टार’ रेटिंग दिले. एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ पर्यायाला सर्वोच्च फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले. एखाद्या फंडाला पहिल्यांदाच फोर स्टार आणि फाइव्ह स्टार रेटिंग मिळणे हे एखाद्या फलंदाजाने कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावण्यासारखेच आहे. अशाच आश्वासक कामगिरीची अपेक्षा ४ सप्टेंबर २०१७ रोजी या ‘पायी घागऱ्या करिती रुणझुण’ या शीर्षकाच्या लेखातून केली होती.

पतनिश्चितीच्या पहिल्याच प्रयत्नांत नव्याने गुंतवणुकीसाठी आश्वासक पत मिळाल्यामुळे या यशामागील कारणांची दखल घेणे भाग आहे. फंडाच्या गुंतवणुकीसाठी निवड करताना शाश्वत व्यवसायातील कंपन्या, दर्जेदार व्यवस्थापन कौशल्य, भांडवली कार्यक्षमता, स्पर्धात्मक फायदा, व्यवसायवृद्धीच्या संधी या निकषांवर पात्र ठरलेल्या कंपन्यांतून होते. कंपनीचा समावेश फंडाच्या गुंतवणुकीत झाल्यानंतर निधी व्यवस्थापक त्रमासिक आणि वार्षिक निकालांच्या आधारे पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन केले जाते. वरील निकषात न बसलेली कंपनी गुंतवणुकीतून वगळली जाते.

एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाची पहिली एनएएव्ही २६ फेब्रुवारी २०१५ रोजी रोजी जाहीर झाली. या दिवसापासून फंडात ५,००० रुपये नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या १.८० लाख रुपयांचे ८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार वार्षिक २०.०६ टक्के दराने २.४१ लाख रुपये झाले आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत वाहननिर्मिती पूरक उद्योग, रसायने, आरोग्य निगा, रोकडसंलग्न गुंतवणुका, खासगी बँका ही आघाडीची पाच गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे असून, आयसीआयसीआय बँक, मदरसन सुमी, टाटा केमिकल्स, रॅम्को सिमेंट आणि ऑरबिंदो फार्मा या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत सर्वसाधारणपणे ४५ ते ४७ कंपन्यांचा समावेश असून पहिल्या पाच गुंतवणुकांचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण १९ टक्के आणि पहिल्या गुंतवणुकांचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण ३५ टक्के राखलेले आहे. आघाडीच्या कंपन्यांतून समभागकेंद्रित जोखीम पत्करून शेपटाकडील कंपन्यांतून जोखमीचे विकेंद्रीकरण केले आहे.

जानेवारीनंतर बाजारात झालेल्या पडझडीचा सर्वाधिक फटका मिड कॅप समभागांना बसला आहे. अशा परिस्थितीत एकूण गुंतवणुकीच्या १० टक्के गुंतवणूक रोकड समरूप असलेले जे मोजके फंड आहेत त्यापैकी हा एक फंड आहे.

समभाग गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार मिड कॅपच्या मोहात पडला नाही असे अभावानेच आढळते. येत्या एप्रिलपासून फंडाच्या प्रमाणीकरणानंतर सर्वच फंड एकसमान दिसतील आणि फंडाच्या गुंतवणुकीचा ढाचा बदलल्यामुळे मागील परताव्याच्या कामगिरीनुसार फंडाची निवड करणे व्यर्थ असेल. अशा परिस्थितीत एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाच्या ताज्या पतनिश्चितीमुळे या फंडाचा समावेश निवडक दर्जेदार मिड कॅप फंडांमध्ये झाला आहे. कसोटी क्रिकेट संघात निवडलेल्या खेळाडूने पदार्पणात द्विशतक झळकाविल्याचा जो आनंद निवड समिती सदस्यांना होईल तसाच आनंद विश्लेषक या नात्याने होत आहे. सचिन रेळेकर यांच्यासारख्या कसबी फंड मॅनेजरच्या व्यवस्थापनाखाली हा फंड भविष्यात अव्वल कामगिरीच्या बळावर गुंतवणूकदारासाठी संपत्ती निर्मिती करेल याबद्दल आशा आहे. आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या शिफारसीनुसार या फंडाचा गुंतवणुकीत समावेशाचा निर्णय करावा.

– वसंत माधव कुळकर्णी

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on March 12, 2018 12:05 am

Web Title: lic mf midcap fund