|| वसंत माधव कुळकर्णी

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान फंड

ईएलएसएस फंड गटातील २० वर्षे जुना आणि सर्वाधिक रोख रक्कम बाळगणारा फंड असल्याने मागील एका वर्षांत बाजार घसरणीचा सर्वात कमी परिणाम झालेला हा फंड आहे.

चालू वर्षांत भांडवली बाजाराची वाट अतिशय खडतर असली तरी, ऑक्टोबर महिन्यांत म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून ७,९८५ कोटी गुंतविण्यात आले. ही रक्कम आजपर्यंतची कुठल्याही महिन्यांत ‘एसआयपी’ माध्यमातून गुंतविलेल्या रकमेहून सर्वाधिक रक्कम आहे. दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन मिळून सर्वाधिक ‘एसआयपी’ची नोंदणी झाल्याचे दिसून आल्याचे वृत्त म्युच्युअल फंडविषयक वार्ताकन करणाऱ्या संकेतस्थळाने दिले आहे. फटाक्यांचा दणदणाट आणि सोन्याची चमक फिकी पडलेल्या यंदाच्या दिवाळीत ‘एसआयपी’ची विक्रमी नोंद झाली आहे. यावर्षीची दिवाळी मागील वर्षांच्या तुलनेत २२ दिवस उशिरा आल्याने नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर होईल तेव्हा नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या रकमेने ८ हजार कोटींचा टप्पा पार केला असेल. आर्थिक वर्षांच्या आठव्या महिन्यांत असल्याने आयकर नियोजनाच्या दृष्टीने कमी कालावधी राहिला असल्याने फंड गटाच्या सरासरीहून अधिक परतावा दिलेल्या एका कर बचत अर्थात ‘ईएलएसएस फंडा’ची ही ओळख.

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान हा ईएलएसएस फंड गटातील २० वर्षे जुना फंड आहे. ईएलएसएस फंड गटात सर्वाधिक रोख रक्कम बाळगणारा फंड असल्याने मागील एका वर्षांत बाजार घसरणीचा सर्वात कमी परिणाम झालेला हा फंड आहे. एका वर्षांपूर्वीच्या गुंतवणुकीची कामगिरी सोबतच्या कोष्टक क्रमांक १ मध्ये दिली आहे.

या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे ९ मार्च २०१५ पासून सचिन रेळेकर यांच्याकडे आहेत. फंडाची गुंतवणूक मल्टी कॅप फंडाप्रमाणे असून फंडाच्या मालमत्तेत ४७.२९ टक्के लार्ज कॅप, ३०.५६ टक्के मिड कॅप, २.८७ टक्के स्मॉल कॅप प्रकारचे समभाग आहेत. फंडाच्या गुंतवणुकीचा २० टक्के हिस्सा आभासी रोकड प्रकारच्या गुंतवणुकीत आहे. त्या खालोखाल अनुक्रमे खाजगी बँका, वित्तीय कंपन्या, रसायने, वाहन आणि वाहन निर्मिती या उद्योगातून गुंतवणूक केली गेली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, विनाती ऑरगॅनिक्स, सिटी युनियन बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा केमिकल्स, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट, कोटक महिंद्रा बँक, आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. निर्देशांक जसे नवीन उच्चांक गाठू लागले तसेतसे निधी व्यवस्थापक नफावसुली करून आभासी रोकड प्रकारच्या गुंतवणुकीतील हिस्सा वाढवत गेले. बाजार घसरणीचा सर्वात कमी परिणाम या फंडावर झाला आहे. अनेकदा फंडाच्या प्रत्यक्ष कामगिरीपेक्षा निधी व्यवस्थापक फंड घराणे इत्यादी बाबींवर फंडाची गुंतवणुकीसाठी निवड केली जाते. एलआयसी फंड घराण्याच्या वास्तवापेक्षा त्याच्या इतिहाचीच चर्चा अधिक होते. वास्तवात या फंड घराण्याचे निवडक फंडांची कामगिरी नजीकच्या वलयांकित स्पर्धक फंडांच्या तुल्यबळ आहे. विद्यमान निधी व्यवस्थापक रेळेकर यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून फंडाची तुलनात्मक कामगिरी कोष्टक क्रमांक २ मध्ये दिली आहे. एलआयसी एमएफ टॅक्स प्लान या फंडाची कामगिरी अन्य ईलएसएस फंडाच्या कामगिरीच्या जवळपास जाणारी असल्याने आयकराच्या कलम ८० सी खाली उपलब्ध असलेल्या वजावटीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या करदात्यांनी एलआयसी एमएफ टॅक्स प्लानचा गंभीरपणे गुंतवणुकीसाठी विचार करावा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)