फंडाविषयक विवरणफंडाचा गुंतवणूक प्रकार: समभाग गुंतवणूक  
जोखीम प्रकार     : समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)  
गुंतवणूक: समभाग गुंतवणूक ८०% पेक्षा कमी नसेल व जास्तीत जास्त २०% गुंतवणूक रोखे प्रकारची असेल.  
फंडाच्या परताव्याच्या     :एस अँड पी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक तुलनेसाठी निर्देशांक             
निधी व्यवस्थापक : या फंडासाठी रामनाथ वेंकटेश्वरन यांची ५ मार्च २०१५ पासून निधी व्यस्थापक म्हणून नेमणूक झाली आहे. रामनाथ हे आयआयटी खरगपूरचे पदवीधर असून, आयआयएम कोलकातामधीनव्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली आहे. या फंड घराण्यात रूजू होण्यापूर्वी बिर्ला सन लाइफ इन्श्युरन्समध्ये वरिष्ठविश्लेषक म्हणून ते कार्यरत होते. त्यांना १२ वर्षांचा निधी व्यवस्थापन आणि समभाग विश्लेषक म्हणून अनुभव आहे. या फंडासह एलआयसी नोमुराच्या अन्य योजनांचे ते निधी व्यवस्थापक आहेत.
पर्याय:    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे आउट व रिइन्व्हेंस्ट)
किमान गुंतवणूक: पहिल्यांदा ५००० रुपये आणि पुढे १००० रुपयांची ‘एसआयपी’
फंड खरेदीची पद्धती: मोबाईल द्वारे EQUITY FUND  ही अक्षरे टाइप करून क्रमांक 993718555 वर एसएमएस पाठवावा किंवा फंड घराण्याच्या http://www.licnomuramf.com संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अथवा फंडांच्या विक्रेत्यामार्फत
av-09
मागील आठवडय़ात व्यवहार झालेल्या पाचपैकी चार दिवस बाजारात मोठय़ा घसरणीचे राहिले. साहजिकच म्युच्युअल फंडांचे नक्त मालमत्ता मूल्य-एनएव्हीदेखील त्यानुसार कमी झाले. सध्या बाजार एका ‘करेक्शन झोन’मध्ये असल्याचा दावा तांत्रिक बिश्लेषक करीत आहेत. आर्थिक वर्ष संपायला दोन आठवडे शिल्लक आहेत. २०-२२ दिवसांनी नवीन निकाल सत्राला प्रारंभ होईल म्हणून बाजारात थोडी अनिश्चितता असणे नैसर्गिक आहे. या पाश्र्वभूमीवर एलआयसी नोमुरा इक्विटी फंड नवीन एसआयपी सुरू करण्यास योग्य फंड आहे.
हा फंड प्रामुख्याने लार्ज कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. ११ जानेवारी १९९३ रोजी हा फंड गुंतवणुकीस खुला झाला. या २२ वर्षांच्या काळात तीन आर्थिक आवर्तने अनुभवली गेली. या चढ-उतारांदरम्यानही या फंडाचा परतावा तुलनेसाठी निवडलेल्या निर्देशांक- सेन्सेक्सपेक्षा अधिक आहे. ३० जानेवारीच्या गुंतवणूक विवरण (फॅक्टशीट) नुसार योजनेने एकूण १५ प्रकारच्या उद्योगक्षेत्रात गुंतवणूक केली आहे. सर्वाधिक गुंतवणूक ३०.३९ टक्के बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये आहे. यात आयसीआयसीआय बँकेत सर्वाधिक गुंतवणूक असून, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा सारख्या राष्ट्रीयीकृत बँका, एचडीएफएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, येस बँकेसारख्या नवीन खासगी बँका आणि सिटी युनियनसारखी जुनी खासगी बँकही आहे. याच्या जोडीला महिंद्र फायनान्स व पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनसारख्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्याही आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र असून, इन्फोसिस, विप्रोसारखे लार्ज कॅप आणि परसिस्टंट सिस्टीम्स व माइंड ट्री सारख्या मिड कॅप कंपन्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील वाहन उद्योगातील टाटा मोटर्स (डीव्हीआर), बजाज ऑटो, महिंद्र अँड महिंद्र यांच्या जोडीला बॉशसारखी वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादने घेणारी दिग्गज कंपनी आहे. ३० जानेवारी रोजी फंडाच्या गुंतवणुकीत एकूण ४० समभाग होते. पहिल्या पाच समभागातील गुंतवणुकीचे प्रमाण २९.८८ टक्के तर पहिल्या १० समभागांतील गुंतवणुकीचे प्रमाण ४८.९८ टक्के आहे. निधी व्यवस्थापक अनेक उद्योगात गुंतवणूक करून कंपन्यांचा फाफटपसारा वाढविण्यापेक्षा मोजक्याच कंपन्यांवर केंद्रीत गुंतवणूक करणे पसंत करतात. योजनेच्या एकूण मालमत्तेच्या केवळ ०.९७ टक्के गुंतवणूक कॉलमनी पर्यायांत असल्याने मोठय़ा प्रमाणावर युनिट्सची विक्री झाल्यास गुंतवणुका विकून युनिटधारकांना पैसे द्यावे लागतील.
मॉर्निग स्टारने ‘फाइव्ह स्टार’ मानांकन फंडाला दिले आहे, तर क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंग सप्टेंबर २०१४ अखेर तिमाहीत हा फंड तिसऱ्या क्रमांकावर असून, मागील तीन वर्षांपासून प्रत्येक तिमाहीत हा फंड क्रिसिल रँकिंगमध्ये पहिल्या तीन क्रमांकांत स्थान टिकवून असणे ही गोष्ट नवगुंतवणूकदारांना नवीन ‘एसआयपी’ सुरू करण्यासाठी पुरेशी आहे.