|| नीलेश साठे

विमा योजनांवर :- ‘रायडर्स’ हा शब्द ऐकला की, भूमितीतील प्रमेय आणि त्यावर आधारित रायडर्स आठवून अनेकांना आजही घाबरायला होईल. विशेषत: पायथॅगोरस प्रमेय आणि त्यावरील रायडर्स खतरनाक असायचे. अर्थात, विम्याच्या संदर्भात हे रायडर्स खतरनाक वगैरे नसून उलट वेगळी विमा पॉलिसी घेऊन अधिक विमा हप्ता भरण्यापेक्षा त्याच विमा पॉलिसीला जोडून काही रायडर्स घेता येतात. यातील एक लोकप्रिय आणि महत्त्वाचा रायडर आहे ‘अपघाती मृत्यू किंवा त्याने आलेले अपंगत्व.’ सर्वात लोकप्रिय असा हा रायडर असल्याने यावर जरा विस्तृत लिहितो.

अपघाती मृत्यू किंवा त्याने आलेले अपंगत्व रायडर :

आयुर्विमा महामंडळाच्या बहुतेक सर्व पॉलिसींना अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाचा फायदा असलेला रायडर घेता येतो आणि बहुतेक सर्व विमाधारक तो घेतातही, पण त्याला रायडर हा शब्द न वापरता ‘आपणांस अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाचा फायदा जोडून हवा आहे का?’ असे विचारले जाते. त्यातून विमा हप्त्यात वाढ प्रति हजारी विमा रकमेला (सम अश्युअर्ड) एक रुपया इतकी होते. मात्र विमा पॉलिसीची रक्कम जेवढी असेल तेवढी अधिकची रक्कम अपघाती मृत्यू झाल्यास मिळण्याची या रायडरमध्ये सोय असते. जास्तीत जास्त किती रकमेचा फायदा या रायडरमध्ये विमेदाराला घेता येईल हे विमा कंपनी ठरवू शकते. मूळ विमा रकमेपेक्षा रायडरची विमा रक्कम अधिक असता कामा नये. शिवाय अपघातात मृत्यू न होता विमेदारास जर कायमचे अपंगत्व म्हणजे दोन्ही हात गमावणे, दोन्ही पाय गमावणे, किंवा एक हात आणि एक पाय कापावा लागणे, किंवा अंधत्व किंवा बहिरेपणा येणे, वगैरेपैकी कोणत्याही प्रकारचे अपंगत्व अपघातानंतर १८० दिवसांच्या आत आल्यास, विमेदाराला विम्याची मुदत पूर्ण होईपर्यंचे सर्व विमाहप्ते माफ केले जातात. शिवाय पुढील १० वर्षे अपघाती मृत्यूची रक्कम (मृत्यू झाला नसला तरी) समान १२० मासिक हप्त्यांत दिली जाते. पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी जर विमेदाराचा मृत्यू झाला तर विमा रक्कम, बोनस आणि उर्वरित मासिक हप्त्यांची रक्कम दिली जाते.

अपघात हा अचानक, आकस्मिक, अनैच्छिक (म्हणून आत्महत्या अपघाताच्या व्याख्येत येत नाही.), बाह्य आणि दृश्य कारणाने झाला असला पाहिजे. न्यायालयाने खून हा अपघात आहे का यावर अनेक निकाल दिले आहेत. जर विम्याच्या करारामध्ये खून हा अपघात समजला जाणार नाही असे नमूद केले नसेल तर तो अपघाताच मानला जातो. मात्र असे नमूद केले नसेल आणि ज्याचा खून झाला त्या विमेदाराची जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर मात्र असा मृत्यू अपघाती मृत्यू समजता येत नाही.

विमेदाराचा अपघाताने मृत्यू झाल्यास, तो अपघातानेच झाला आहे आणि ती आत्महत्या नाही हे सिद्ध करण्यासाठी पोलीस पंचनामा, पोलीस फायनल क्लोजर अहवाल वगैरे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ‘इर्डा’च्या सूचनेनुसार विमा कंपन्यांना विमाधारकाचा मृत्यू अपघातात जरी झाला असेल तरी सर्वप्रथम मूळ विमा रकमेच्या मृत्यू-दाव्याची रक्कम नॉमिनीला देणे अनिवार्य आहे. तद्नंतर अपघाती मृत्यू सिद्ध झाल्यावर विमा अटीनुसार अपघाती मृत्यूची रक्कम द्यावी, असे दिशानिर्देश ‘इर्डा’ने विमा कंपन्यांना दिले आहेत.

आपल्याला माहीत आहे की विमा हा विमेदार आणि विमा कंपनी यांतील करार आहे आणि तो utmost good faith  या पायावर आधारित आहे. म्हणजे काय, तर विमेदार आपली प्रकृती, उत्पन्न, पूर्वी झालेले आणि सद्य असलेले आजार, वय, कुटुंबातील व्यक्तींपैकी कोणाचा कुठल्या रोगाने कमी वयात मृत्यू झाला का वगैरे सर्व माहिती विमा कंपनीला १०० टक्के खरी देईल ज्याचा विचार करून विमा कंपनी हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही आणि स्वीकारायचा तर विमा हप्ता किती घ्यायचा हे ठरवेल आणि ती हप्त्याची रक्कम विमेदाराने दिली की हा करार पूर्ण होतो. यात एक महत्त्वाची बाब बरेचदा दुर्लक्षित होते ती म्हणजे विमा पॉलिसी घेतल्यापासून वा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनापासून तीन वर्षांत जर विमेदाराचा मृत्यू झाला तर विमा कंपनी विमा घेताना विमेदाराने दिलेली माहिती खरी होती ना हे तपासून घेऊन विमा रक्कम द्यायची वा विमा रक्कम नाकारायची याचा निर्णय घेऊ  शकते.

अर्थात, म्हणूनही विमा हप्ता वेळेत भरला पाहिजे आणि आपली माहिती विमा प्रस्तावामध्ये १०० टक्के खरी द्यायला पाहिजे.

आता असे बघा की समजा विमेदार गंभीर रोगाने पीडित असूनही त्याने ही माहिती विमा प्रस्तावात दिली नाही आणि त्याचा तीन वर्षांच्या आत त्याच कारणाने मृत्यू झाला आणि विमा कंपनीला जर आपल्या तपासामध्ये याविषयीचे दस्तावेज (documentary proof) मिळाले तर विम्याची रक्कम तर मिळत नाहीच, पण भरलेले विमा हप्तेसुद्धा विमा कंपनी जप्त करते. त्यामुळे याबाबतीत विमेदारांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

मात्र जर असे असूनही म्हणजे non-disclosure of material facts  असूनही जर विमेदाराचा अपघाती मृत्यू झाला तर मृत्यूचे कारण (proximate cause of death) लपविलेला रोग हे नसल्याने विमा कंपनीला मृत्यू दाव्याची आणि अपघाती मृत्यू दाव्याची अशी पूर्ण रक्कम द्यावी लागते. अर्थात, असे आहे म्हणून विमा कंपनीपासून खरी माहिती लपवणे योग्य नाही, कारण अशा स्थितीत अपघाती मृत्यूहून नैसर्गिक मृत्यूच होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा प्रामाणिक असावे हे उत्तम.

शिवाय अपघाती मृत्यूनंतर विमा कंपनीला कोणते दस्तावेज द्यावे लागतील त्यांची प्रतसुद्धा आपल्या रेकॉर्डवर ठेवावी.

दहा लाख विमा रकमेसाठी या रायडरचा वार्षिक हप्ता केवळ रु. १,००० इतका अल्प येत असल्याने, पॉलिसीवर हा रायडर उपलब्ध असल्यास विमेदारांनी जरूर घ्यावा. पॉलिसी घेताना जरी हा रायडर घेतला नसेल तरी, नंतर कधीही हप्ता भरून हा रायडर पॉलिसीला जोडता येतो. खासगी विमा कंपन्यानीसुद्धा हा रायडर विमाधारकांना उपलब्ध करून दिला आहे. रायडर घेण्याची संमती देण्यापूर्वी त्याच्या अटी आणि फायदे कोणते हे समजून घ्यावे.

अन्य रायडर्सबद्दल पुढील लेखांत…

लेखक विमा नियामक ‘इर्डा’चे माजी सदस्य आणि ‘एलआयसी’मध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.

ई-मेल : nbsathe@gmail.com