|| प्रवीण देशपांडे

एप्रिल महिना सुरू झाला म्हणजे आर्थिक वर्षांची सुरुवात झाली. नियोजनाच्या दृष्टीने या वर्षांत कराव्या लागणाऱ्या अनुपालनाचेसुद्धा नियोजन करणे गरजेचे आहे. या नियोजनामध्ये योग्य ते लेखे ठेवणे याचासुद्धा समावेश होतो. जे करदाते धंदा-व्यवसाय करतात त्यांना प्राप्तिकर कायद्यानुसार लेखे ठेवावे लागतात. मागील काही वर्षांत या तरतुदींमध्ये काही बदल झाले. अनुमानित कराच्या ‘कलम ४४ एडी’ आणि ‘कलम ४४ एडीए’ लागू झाल्यानंतर लेखे आणि लेखापरीक्षण याच्या तरतुदी बदलल्या आहेत. छोटा धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्यांना यापासून काही सूट दिली आहे; परंतु ठरावीक प्रमाणात नफा न दाखविणाऱ्यांना लेखापरीक्षणसुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्या करदात्याला लेखे ठेवणे बंधनकारक आहे, कोणाला नाही, कोणते लेखे ठेवावे, कोणी लेखापरीक्षण करून घ्यावे याविषयी करदात्याच्या मनात अनेक प्रश्न येतात. आपले अनेक वाचक डॉक्टर, आíकटेक्ट, वकील, स्वत:चा धंदा व्यवसाय करणारे आहेत. अशांसाठी या लेखातून यासंबंधी माहिती उपयुक्त ठरेल. प्राप्तिकर कायद्यात धंदा आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी लेखे ठेवणे आणि त्याचे लेखापरीक्षण (ऑडिट) करून घेणे याबद्दलच्या तरतुदी आहेत. याव्यतिरिक्त उत्पन्न असणाऱ्यांसाठी लेखे ठेवणे आणि त्याचे परीक्षण करून घेणे बंधनकारक नाही.

लेखे आणि लेखापरीक्षण कोणाला बंधनकारक आहेत :

प्राप्तिकर कायद्यानुसार लेखे आणि लेखापरीक्षणाच्या दृष्टीने ठरावीक व्यवसाय (स्पेसिफाइड प्रोफेशन) आणि ‘धंदा आणि ठरावीक व्यवसायाव्यतिरिक्त व्यवसाय’ असे दोन भाग आहेत. जे करदाते ठरावीक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी लेखे ठेवण्याच्या तरतुदी वेगळ्या आहेत. या ठरावीक व्यवसायामध्ये वैद्यकीय, कायदाविषयक, इंजिनीअिरग, स्थापत्य, अकौंटिंग, तांत्रिक सल्लागार, अंतर्गत सजावटदार, चित्रपट कलाकार, अधिकृत प्रतिनिधी, कंपनी सेक्रेटरी या व्यावसायिकांचा समावेश होतो.

ज्या करदात्यांची ठरावीक व्यवसायापासून एकूण जमा मागील तीन वर्षांपकी कोणत्याही एका वर्षांत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि व्यवसाय जर या वर्षी सुरू केला असल्यास या वर्षीची अपेक्षित जमा दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर लेखे ठेवणे बंधनकारक आहे. ठरावीक व्यावसायिकांसाठी (जे निवासी भारतीय आहेत) अनुमानित कराच्या तरतुदी मागील दोन वर्षांपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या ठरावीक व्यवसायापासून एकूण जमा ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांना या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना अनुमानित कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. ज्या करदात्यांचे व्यवसायापासून उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना ‘कलम ४४ एबी’नुसार लेखापरीक्षण करून त्याचे अहवाल सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ज्या ठरावीक व्यावसायिकाची एकूण जमा ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे (अशांना ‘कलम ४४ एबी’ लागू होत नाही) आणि उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे अशांना (‘कलम ४४ एडीए’नुसार) लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. म्हणजेच ज्या ठरावीक व्यावसायिकाची एकूण जमा ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि उत्पन्न ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे अशांना लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करणे हे दोन्हीही बंधनकारक नाही.

उदाहरणार्थ, एका डॉक्टरची (निवासी भारतीय) वार्षकि एकूण जमा ३० लाख रुपये इतकी आहे. त्याचे उत्पन्न जर १५ लाख रुपयांपेक्षा (म्हणजेच ५० टक्क्य़ांपेक्षा) कमी असेल तर त्याला लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करणे दोन्हीही बंधनकारक आहे आणि त्याचे उपन्न १५ लाख रुपयांपेक्षा जास्त दाखविले असेल तर त्याला लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करून घेणे दोन्हीही बंधनकारक नाही. वार्षकि एकूण जमा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करून घेणे सर्वानाच बंधनकारक आहे.

ठरावीक व्यावसायिकांव्यतिरिक्त धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना खालील परिस्थितीत लेखे ठेवणे बंधनकारक आहे :

१ धंदा किंवा व्यवसायाचे उत्पन्न १,२०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभाज्य कुटुंबांसाठी ही मर्यादा २,५०,००० रुपये) किंवा एकूण उलाढाल मागील तीन वर्षांपकी कोणत्याही एका वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभाज्य कुटुंबांसाठी ही मर्यादा २५ लाख रुपये).

२ या वर्षांत धंदा किंवा व्यवसाय नव्याने सुरू केला असल्यास या वर्षीचे अपेक्षित उत्पन्न १,२०,००० रुपयांपेक्षा (वैयक्तिक आणि हिंदू अविभाज्य कुटुंबांसाठी ही मर्यादा २,५०,००० रुपये) जास्त आहे किंवा या वर्षीची अपेक्षित उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभाज्य कुटुंबांसाठी ही मर्यादा २५ लाख रुपये).

३ करदात्याचे प्रत्यक्ष उत्पन्न, ‘कलम ४४ एडी’ (अनुमानित कर) नुसार नमूद केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असल्यास आणि करदात्याचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नापेक्षा जास्त आहे.

छोटा धंदा करणाऱ्यांसाठी (जे निवासी भारतीय आहेत) अनुमानित कराच्या तरतुदी मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आल्या आहेत. यानुसार त्यांना लेखे ठेवणे, लेखापरीक्षण करून घेणे, अग्रिम कर चार हफ्त्यांत भरणे यापासून सूट दिली आहे. अनुमानित कराच्या ‘कलम ४४ एडी’च्या तरतुदी फक्त वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब आणि भागीदारी संस्था (एलएलपी सोडून) यांनाच लागू होतात. याशिवाय या तरतुदी कमिशन किंवा दलालीचा धंदा करणारे, एजन्सीचा धंदा करणारे किंवा इतर अनुमानित कराच्या तरतुदी लागू होणाऱ्या धंदा करणाऱ्या करदात्यांना लागू होत नाहीत. या कलमानुसार जे करदाते पात्र धंदा करतात आणि त्यांच्या धंद्यातील एकूण उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशांना या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना अनुमानित कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. ज्या करदात्यांची अशा पात्र धंद्यातील उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांचे उत्पन्न आठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशांना (‘कलम ४४ एडी’नुसार) लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करणे बंधनकारक नाही. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी धंद्यातील उलाढाल चेक, बँक ट्रान्स्फर किंवा क्रेडिट कार्डद्वारे झाली असेल तर ही उत्पन्नाची मर्यादा ६ टक्के इतकी असेल. ज्या करदात्यांची अशा पात्र धंद्यातील उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी उत्पन्न ८ टक्के किंवा ६ टक्के (जे लागू असेल ते) किंवा त्यापेक्षा कमी दाखविले आहे अशांना (कलम ४४ एडीनुसार) लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.

उदा. ‘अ’ या दुकानदाराची वार्षकि उलाढाल ८० लाख रुपये आहे. त्याची उलाढाल रोख स्वरूपात आहे. त्याने आपले उत्पन्न ८ टक्क्य़ांपेक्षा कमी म्हणजे ६,४०,००० रुपयांपेक्षा जास्त दाखविले तर त्याला लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक नाही. ‘ब’ या दुकानदाराची वार्षकि उलाढाल ८० लाख रुपये आहे आणि त्याचीही उलाढाल रोख स्वरूपाची आहे. जर त्याला उत्पन्न ८ टक्क्य़ांपेक्षा कमी (उदा. ५ लाख रुपये) दाखवायचे असेल तर त्याला लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करून घेणेसुद्धा बंधनकारक आहे. ‘क’ या दुकानदाराची वार्षकि उलाढाल दीड कोटी रुपये आहे. त्याची उलाढाल ही चेकद्वारे किंवा क्रेडिट कार्डद्वारेच आहे, रोख स्वरूपात नाही. त्याने उत्पन्न ९ लाख रुपयांपेक्षा (६ टक्क्य़ांपेक्षा जास्त) दाखविल्यास त्याला लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक नाही.

‘कलम ४४ एबी’नुसार लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याची मर्यादा धंद्यांसाठी १ कोटी रुपयांची आहे. म्हणजेच १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्यांना लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे; परंतु वरील उदाहरणात ‘ब’ दुकानदाराची उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा कमी असूनसुद्धा त्याला लेखापरीक्षण करून अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. कारण त्याने उत्पन्न ‘कलम ४४ एडी’नुसार नमूद केलेल्या उत्पन्नापेक्षा (८ टक्के किंवा ६ टक्के) कमी दाखविले. वरील उदाहरणात ‘क’ या दुकानदाराची उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असूनसुद्धा ‘कलम ४४ एडी’नुसार नमूद केलेल्या उत्पन्नापेक्षा (या दुकानदाराच्या बाबतीत ६ टक्के) जास्त उपन्न दाखविल्यामुळे लेखापरीक्षण करणे बंधनकारक नाही.

लेखे आणि लेखापरीक्षण यासंबंधीच्या तरतुदी क्लिष्ट वाटत असल्यास आणि काही संभ्रम असल्यास करसल्लागाराची मदत घेणे उचित ठरेल; परंतु करदात्याने स्वत:च्या माहितीसाठी किंवा पुढील नियोजनासाठी लेखे ठेवले तर त्याला त्याचा फायदा मात्र जरूर होईल.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.