|| अनुराधा सहस्रबुद्धे

अशोक दोडतले (वय ३४) हे ‘लोकसत्ता’चे बीडचे वाचक आहेत. त्यांनी आर्थिक नियोजनासाठी विनंती केली आहे. त्यांचे वडील त्यांच्या लहानपणीच निवर्तल्याने त्यांना आईने वाढविले. त्यांच्या कुटुंबात ते स्वत:, आई, पत्नी, थोरला मुलगा राजदीप (१० वर्षे) धाकटी मुलगी कादंबरी (४ वर्षे) असे सदस्य आहेत. अशोक दोडतले यांना कला शाखेत (एमए) आणि समाजसेवा (एमएसडब्ल्यू) अशा दोन पदव्युत्तर पदव्या प्राप्त आहेत. सुरुवातीला काही अस्थायी स्वरूपाच्या नोकऱ्यांनंतर शासकीय कंत्राटदारी केली. म्हणावा तसा नोकरी-उद्योगात जम बसला नाही. सध्या ते बीड शहरात ई-सेवा केंद्र चालवत आहेत. महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून शाळा- महाविद्यालयाचे प्रवेश, विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जातात. केंद्रचालक नागरिकाला आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाइन भरून देतो आणि नागरिक त्यासाठी सेवाशुल्क प्रदान करतात. हा व्यवसायसुद्धा मोसमी असल्याने जून महिन्यात शाळा- महाविद्यालयांचे निकाल लागल्यावर ई-सेवा केंद्रात संबंधितांची गर्दी असते. या ई-सेवा केंद्राला अजून वर्ष झालेले नाही. महाविद्यालयांच्या प्रवेशावेळी ही ई-सेवा केंद्रे नागरिकांच्या लक्षात येतात आणि त्यांचा प्रसार होतो. सध्या फार उत्पन्न नसलेला हा व्यवसाय पुढील वर्षी नफ्यात येईल अशी आशा आहे. अशोक दोडतले यांची सहा एकर जमीन माजलगांव येथे आहे. हा भाग पाण्याचे दुíभक्ष असलेला दुष्काळी भाग असल्याने या जमिनीत शेती होत नाही. ही शेती खंडाने दिली असून मासिक हजार रुपये फक्त मिळतात. भूतकाळातील व्यवसायातील काही देणी फेडण्यासाठी घेतलेल्या कर्जापोटी साधारण एक लाख फेडायचे अद्याप शिल्लक आहेत. या एक लाख कर्जाव्यतिरिक्त अशोक दोडतले यांच्यावर अन्य कुठलाही कर्जभार नाही.

वित्तीय नियोजकाचा सल्ला:

  • वित्तीय नियोजनाची इमारत शुद्ध विम्याच्या भक्कम पायावर उभी असायला हवी. कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याचे कुटुंब सुरक्षित करण्याचा शुद्ध विमा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. शुद्ध विम्याच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाइतकी रक्कम विमा पॉलिसीत नामनिर्देशन असलेल्या वारसास मिळते. विमा पॉलिसीची मुदत संपल्यानंतर विमाधारक हयात राहिला तरी विमाकवच बंद होते. विमा पॉलिसीची मुदत संपल्यावर काहीही रक्कम देय होत नाही. शुद्ध विमा ही गुंतवणूक नाही. ती एक कुटुंबाच्या संरक्षणासाठी केलेली तरतूद आहे. विमा पॉलिसी संपल्यावर कुठलाही फायदा मिळत नाही. या कारणामुळे विमा खरेदी इच्छुक या प्रकारचा विमा खरेदी करण्यास निरुत्साही असतात.
  • अशोक दोडतले यांनी सध्याच्या परिस्थितीत वित्तीय नियोजनाची सुरुवात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेने करणे योग्य ठरेल. या विमा पॉलिसीचा वार्षकि हप्ता रुपये ३३० असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय १८ ते ५० वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. या पॉलिसीचे विमा छत्र २ लाख रुपये आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त बँकेत खाते असणे आवश्यक असते. एक वर्षांचे विमा संरक्षण असणारी ही एक शुद्ध आयुर्वमिा योजना आहे. दर वर्षी या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. १८ ते ५० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असली तरी अशी व्यक्ती फक्त एकाच बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जातो. या योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा असतो. अशोक दोडतले यांनी पुढील वर्षांच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत बँकेत देणे आवश्यक राहील. हे विमा संरक्षण विमाधारकाने वय वर्षे ५५ पूर्ण केल्यावर/ बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास/ बँक खाते बंद केल्यास विमा संरक्षण संपुष्टात येते. तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.
  • पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही केवळ वार्षकि १२ रुपये हप्ता भरून अपघाती मृत्यू आल्यास दोन लाख आणि अपघातात जखमी झाल्यास १ लाखाची नुकसानभरपाई देणारी योजना आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
  • या दोन शासकीय विमा योजना तुमच्या कुटुंबाला सुरक्षित करण्याचा सहज मार्ग आहे. भविष्यात आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यानुसार अतिरिक्त विमाछत्र आणि गुंतवणुकीचा विचार करावा.
  • अर्थसाक्षर होण्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नाही. एक शुद्ध विमा, एक अपघाती विमा, आरोग्य विमा तसेच बचतीचे नियोजन करण्यासाठी पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी आणि रोकडीच्या उपलब्धतेनुसार एखादी ‘एसआयपी’ ही आर्थिक नियोजनाची पंचसूत्री आहे.

दासबोधाच्या अकराव्या दशकाच्या दहाव्या समासात समर्थ सांगतात,

उत्तम गुण तितुले घ्यावे। घेऊन जनास सिकवावे।

उदंड समुदाये करावे। परी गुप्तरूपें?

या समर्थ उपदेशानुसार शुद्ध विम्याची खरेदी हा आर्थिक नियोजनातील उत्तम गुण आहे. हा गुण अशोक दोडतले यांच्या नियोजनाच्या निमित्ताने याची महती पटविता आली याचे समाधान वाटते.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)