20 October 2019

News Flash

एल निनो नरो वा कुंजरोवा..

क.. कमॉडिटीचा

|| श्रीकांत कुवळेकर

पावसाबद्दल अधिक स्पष्टता येण्यासाठी १५ मेदरम्यान होणाऱ्या पुढील अनुमानाची वाट पाहण्याची गरज असून तोपर्यंत वस्तू बाजारातील चढ-उतार छोटय़ा कक्षेत राहतील.

कौरव-पांडवांमध्ये घनघोर युद्ध चालू होते. कौरवांतर्फे द्रोणाचार्य सेनापती असताना त्यांच्या पराक्रमाने जेव्हा पांडवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर कृष्णाने त्यावर उपाय काढला. त्याने अश्वत्थामा ठार झाल्याची बातमी, खरे म्हणजे अफवा पसरवली. हा एक युद्धनीतीचा भाग होता. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र असल्याने तोच ठार झाला असे वाटून द्रोणाचार्य व्यथित झाले. बातमीची सत्यासत्यता तपासण्यासाठी त्यांनी युधिष्ठिराला विचारणा केली. युधिष्ठिरानेदेखील बातमी खरी असल्याचे सांगताना ‘नरो वा कुंजरोवा’ म्हणत अश्वत्थामा नावाचा हत्ती ठार झाला की द्रोणाचार्याचा पुत्र मारला गेला याबद्दल संदिग्धता कायम ठेवली. पुढील रामायण, शब्दश: म्हणायचे तर महाभारत, सांगण्याची गरज नाही.

आता या कथेचा आणि कमोडिटी बाजाराचा काय संबंध असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. अर्थाअर्थी तसा काहीच संबंध नसला तरी मागील काही आठवडय़ांत देशी-विदेशी पंडितांकडून भारतातील नर्ऋत्य मोसमी पावसाबद्दल जेवढे अंदाज प्रसिद्ध झालेत ते पाहता महाभारतातील या कथेची आठवण झाल्यावाचून राहत नाही. गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेने ‘एल निनो’बाबतचे अंदाज प्रसिद्ध करताना पावसाबद्दल निदान भारतासाठी तरी भीतिदायक चित्र रंगवले होते. त्यानंतर अमेरिका आणि भारतीय खासगी क्षेत्रातील हवामान संस्था ‘स्कायमेट’नेदेखील त्याची री ओढली. विशेष म्हणजे स्कायमेटने तर चांगल्या पावसाचा आपलाच अंदाज एकाच महिन्यात बदलला. मात्र गेल्या सोमवारी भारतीय हवामान खात्याने एल निनोचा प्रभाव किमान राहील आणि जुल-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस राहील, असे सांगत सुखद धक्का दिला. या नंतर बऱ्याच संकेतस्थळांवरूनच नव्हे तर चक्क ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेनेदेखील आपला पवित्रा बदलल्याचे दिसत आहे. एल निनो येण्याची शक्यता अजूनही ७० टक्के आहे हे सांगतानाच या संस्थेने त्यापुढे ‘जर एल निनो निर्माण झाला तर तो अल्पजीवी असेल,’ असा शब्दांचा खेळ करत अप्रत्यक्षपणे ‘नरो वा कुंजरोवा’च म्हटले आहे.

काही विदेशी वृत्ते आणि व्यापार जगतामधील प्रतिक्रियांवरून अशीही शंका व्यक्त केली जात आहे, की एल निनोचे भूत निर्माण करण्यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका किंवा कॅनडा येथील व्यापाऱ्यांचा हात असावा. गेल्या दीड वर्षांपासून या तिन्ही देशांमधून कडधान्ये आणि इतर कृषीमालाच्या भारताला होणाऱ्या निर्यातीत प्रचंड घट झाल्यामुळे तेथील उत्पादक, व्यापारी आणि अगदी त्या देशांचे प्रमुख चिंताग्रस्त झाले आहेत. त्या मालाला भारताव्यतिरिक्त दुसरी बाजारपेठ नाही याची जाणीव या लॉबीला आहे. भारत सरकार या पदार्थाच्या आयातबंदीवर ठाम असल्याचे दिसत असताना जर एल निनोचे भूत उभे केले तर देशांतर्गत पुरवठय़ाबाबत भारत सरकारच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करता येईल आणि त्यायोगे आयात-निर्यात धोरण शिथिल करण्यास भाग पाडता येईल असे गणित कदाचित या विदेशी लॉबीचे असावे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत भारत सुमारे ६० लाख टन एवढे कडधान्य या देशांकडून आयात करत असे. यात कॅनडामधून येणारे २० लाख टन वाटाणे, सात लाख टन मसूर आणि ऑस्ट्रेलियामधून येणारा सुमारे १२ लाख टन हरभरा यांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून या देशांचाच हा ‘कट’ असण्याची शक्यता व्यक्त करण्यामागील कारणमीमांसा लक्षात येईल.

मुळात सामान्य माणूस असो व शेतकरी, त्यांना या शब्दांच्या भूलभुलय्यापेक्षा पाऊस केव्हा, किती आणि कशा पद्धतीने पडेल याचा आगाऊ अंदाज हवा असतो. या संस्थांच्या अंदाजांवरून पावसाबाबत निश्चित ठोकताळा बांधण्यापेक्षा जर-तरवर आधारित अंदाज जास्त केले जातात. परंतु कसेही असले तरी बदलत्या बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेमध्ये तरी या अनुमानांना महत्त्व प्राप्त झालेय हे मान्य केलेच पाहिजे. मागील आठवडय़ापूर्वी कृषीमालाच्या किमतींमध्ये चांगलाच जोर धरण्याची चिन्हे असताना भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानंतर मंदी आल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन, गवार सीड आणि गवार गम आणि एरंडीच्या किमतीत वायदे बाजारामध्ये घसरण झाली असून त्याचा परिणाम हरभरा, हळद आणि मोहरीच्या वायद्यांवरही झाला आहे. विशेष म्हणजे उत्पादनात मोठी घट झाली असतानाही तुरीचे भाव ५,६५० रुपये क्विंटलच्या हमीभावाजवळ जाऊन पडण्याची ही दोन महिन्यांतील पाचवी खेप. मात्र पावसाबद्दल अधिक स्पष्टता येण्यासाठी १५ मेदरम्यान होणाऱ्या पुढील अनुमानाची वाट पाहण्याची गरज असून तोपर्यंत बाजारातील चढ-उतार छोटय़ा कक्षेत राहतील.

या मंदीच्या वातावरणामध्ये काही मसाला पिके चमकताना दिसत आहेत. ऑगस्टमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे केरळमध्ये जो हाहाकार उडाला होता त्यानंतर या स्तंभामधून वेलची पिकाच्या नुकसानीबाबतच्या लेखामध्ये आपण वेलची भाव किरकोळ बाजारात ३,००० रुपये किलो होण्याचे अंदाज व्यक्त केले होते. गेल्या आठवडय़ात केरळमधील घाऊक बाजारामध्ये वेलची आठ वर्षांतील उच्चांकी पातळीवर म्हणजे १,८०० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून किरकोळ बाजारात ३,००० रुपयांची पातळी तिने मागेच गाठली आहे. गेल्या एक-दोन महिन्यांत केरळमध्ये पावसाचे प्रमाण नगण्य झाल्यामुळे वेलची तसेच काळी मिरीच्या बागांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे वेलचीच्या पुढील वर्षीच्या उत्पादनावर अजूनही प्रश्न चिन्ह असून त्यामुळे भावातील तेजी अजून संपलेली नाही.

काळ्या मिरीमध्ये देशांतर्गत उत्पादन फार नसतानादेखील २०१५-१६ मध्ये ७०० रुपये प्रतिकिलो असलेली मिरी २०१७-१८ मध्ये ३००-३५० रुपयांवर आली. गेल्या दोन वर्षांमध्ये व्हिएतनाममधून कमी प्रतीची मिरी भारतात प्रचंड प्रमाणात अवैधपणे आयात झाल्यामुळे अशी परिस्थिती झाली होती. कधीही मिरी नेपाळ, म्यानमारमधून आली तर बरेचदा ती श्रीलंकेमधून येत होती. यासाठी द्विपक्षीय व्यापार करारातील त्रुटींचा आधार घेतला गेला तर बरेचदा तस्करी मार्ग वापरूनही आयात होत राहिली. अलीकडे मात्र श्रीलंका सरकारने याबाबत कडक धोरण स्वीकारल्याने ही आयात कमी झाल्याची माहिती आहे. तसेच देशांतर्गत उत्पादनात पुढील काळात अधिक घट झाली तर मिरीच्या भावात परत तेजी शक्य आहे.

कृषीमालावरून आपण थोडे सोन्याकडे वळू या. अक्षय्य तृतीया हा सोनेखरेदीचा सुवर्णदिवस जवळ आल्याने सराफा बाजाराबद्दल जाणून घेऊ. गेल्या आठ-दहा महिन्यांपासून सोन्याचे भाव खूप वाढणार असे कानी-कपाळी ओरडून सांगितले जात असल्यामुळे त्यात बरीच गुंतवणूक केली गेली आहे. मात्र सोन्याचे भाव तुरीप्रमाणेच बरेचदा एका विशिष्ट पातळीवरून झपाटय़ाने पडल्यामुळे या गुंतवणूकदारांचे हात पोळले गेले आहेत हेही तेवढेच खरे आहे. बाजारपंडित मात्र अजूनही गिरे तो भी.. या उक्तीनुसार सोने घ्या म्हणत आहेत. सोन्याचे भाव भारतात प्रति दहा ग्रॅमला ३५,००० रुपयांकडे झुकू लागले असतानाच ते भारतीय चलनामध्ये आलेली मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावघसरण अशा दुहेरी घटकांमुळे गेल्या दोन महिन्यांत ३२,५०० रुपयांपर्यंत खाली आले असून, अक्षय्य तृतीयेपर्यंत ते कदाचित ३२,००० किंवा ३१,८०० रुपयांपर्यंत पडू शकतील. छोटय़ा अवधीसाठी या पातळीवर खरेदी किफायतशीर होईल, पण फायदेशीर कितपत होईल ते सांगणे अवघड आहे. त्यामुळे दुकानांमध्ये सोने घेण्यापेक्षा शेअर बाजारातील सुवर्ण रोखे ४-५ टक्के डिस्काऊंटमध्ये घेण्यात शहाणपण आहे आणि फायदेशीरदेखील. ज्यांना शक्य आहे त्यांनी एमसीएक्स या कमोडिटी एक्स्चेंजवर ८ ग्रॅम गिनी किंवा १०० ग्रॅम मिनी या दोन वायद्यांमध्ये गुंतवणूक करून सोन्याची डिमॅटमध्ये डिलिव्हरी घ्यावी आणि भावामध्ये तांत्रिक उसळी येईल तेव्हा विकून नफा कमवावा. लक्षात असू द्या, ही गुंतवणूक एक-दोन महिन्यांसाठी. दीर्घावधीसाठी सोन्यात गुंतवणूक फायदेशीर वाटत नाही.

भाजप सरकार चांगल्या बहुमताने सत्तेवर आले तर रुपया अजून वधारू शकतो, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव अमेरिका-चीन व्यापार युद्ध समाप्त झाल्यामुळे कोसळू शकतील. याचा एकत्रित परिणाम सोने ३०,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत येण्यास मदत होईल.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )

First Published on April 22, 2019 12:07 am

Web Title: loksatta arth vrutant 4 2