|| तृप्ती राणे

वेगवेगळ्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करताना मला एक गोष्ट जी प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे स्वत:साठी खर्च करायची इच्छा आणि वृत्ती. निवृत्तीजवळ आलेली कुटुंब हमखास मला सांगतात – अहो, इतकी वर्ष फक्त कुटुंबासाठी म्हणून काम केलं, आणि आता जर जमलं तर एखादी ट्रिप करायची आहे. युरोप पाहता येईल का? आमच्या सेवानिवृत्ती निधीत हा खर्च होऊ शकेल का? साधारण ३०-३५ वर्षे काम केल्यानंतर पण हे पती-पत्नी साशंकपणे आपल्या इच्छा आणि सेवानिवृत्ती निधीकडे बघत असतात. त्यात जर तब्येत साथ देत असेल तर ठीक, नाही तर आता कुठे जाणार या अशा परिस्थितीत? असं म्हणून उसासा सोडतात आणि आपली इच्छा मनाच्या एका कोपऱ्यात कायमची पुरून टाकतात.

त्या उलट तिशीत किंवा चाळिशीत असलेली जोडपी. माझ्याकडे आल्यावर दर वर्षी एक रक्कम त्यांच्या छंदांसाठी बाजूला ठेवा म्हणून ठासून मला सांगतात. त्यांचा फंडा एकच – ‘वर्क हार्ड अ‍ॅण्ड पार्टी हार्डर’ म्हणजेच ढोर मेहनत करा आणि त्याही पेक्षा जास्त मजा करा! उद्या कोणी बघितला नाहीये, म्हणून मन मारत जगायचं नाही. आपल्या इच्छा तरुणवयात पूर्ण करायच्या. निवृत्तीची वाट पाहायची नाही. काय खात्री की तेव्हा हे जमेल काय?

या दोन्ही प्रकारच्या मानसिकता आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत, नाही का? आधी कुटुंबाची गरज महत्त्वाची म्हणून काही जण मन मारत जगतात. तर काही तरुणपणी आयुष्यात आनंद मिळवायचा असं धोरण ठेवून स्वत:साठी वेळ आणि पसा दोन्ही बाजूला काढून खर्च करतात. पण या बाबतीत मी एका गोष्टीचा विचार नेहमी या दोन्ही प्रकारच्या जोडप्यांना करायला सांगते. आपल्याला आयुष्यात पशापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे समाधान. एखादी गोष्ट केल्यावर जर आपल्याला खरंच मनापासून छान वाटलं तर ठीक. पण मन मारून केलेली गोष्ट आपल्याला जरी कर्तव्यपूर्तीचा भास करून देत असेल तरीसुद्धा मनात कुठेतरी एक काही तरी न मिळवल्याची जाणीव राहते. परंतु याचीच दुसरी बाजू म्हणजे उद्याचा अजिबात विचार न करता आजच्या खर्चाना आवर न घालणं.

या दोन्ही विचार प्रवाहांना जर एकत्र करता आलं तर त्यातून निश्चितपणे दीर्घकाळ टिकवता येणारा आनंद मिळेल असं मला वाटतं. म्हणजेच आपल्या आवडी शिस्तीने जोपासायच्या आणि त्याचबरोबर पुढचाही विचार करायचा. यासाठी आर्थिक नियोजन फायद्याचं ठरतं. आणि म्हणून खालच्या टिप्स.

  • प्रत्येक व्यक्तीने स्वत:मध्ये पहिली गुंतवणूक केली पाहिजे. तेव्हा मला काय आवडतं याचं उत्तर शोधा आणि त्यासाठी काय खर्च होतो हे माहीत करा. उदाहरण घ्यायचं तर एखादं वाद्य शिकायची इच्छा असेल तर त्या वाद्याची किंमत, शिकायचा खर्च आणि त्याच्याशी निगडित प्रवास व इतर खर्च या सर्वाचा विचार झाला पाहिजे.
  • कुठला खर्च टप्प्याटप्प्याने करता येतो आणि कुठला एकहाती करावा लागतो याची शहानिशा करा. त्यानुसार आपण खर्चाच्या वेळेचे नियोजन करू शकतो.
  • फिरण्याच्या बाबतीत म्हणायचं तर हात आखडता ठेवून फिरण्यात मजा नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. तेव्हा याची तयारी करताना रक्कम थोडी जास्त ठरवावी. पंचतारांकित हॉटेलमधे जाऊन नुसता चहा का प्यायचा? चांगलं जेवण आणि त्यानंतर आठवणीत राहणारं डेझर्ट हे हवंच.
  • छोटय़ा-छोटय़ा रकमेतून नियमित गुंतवणुकीने एक चांगला गल्ला जमवता येतो. दर महिना १,००० रु. असे पाच वर्ष चांगल्या म्युच्युअल फंडात किंवा शेअरमध्ये गुंतवले, तर त्यातून साधारणपणे ८० हजार रु. ते अगदी १ लाख रुपयेसुद्धा जमा झालेल्याचा अनुभव आहे.
  • बजेट ठेवा, पण स्वित्र्झलड समजून सिमल्यावर समाधान मानायचं नाही. मोठी ध्येय बाळगा, त्यासाठी धडपड करा आणि मग बघा. ‘द सिक्रेट’ या पुस्तकातील ही गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्ही जे विचार करता त्यांच्या अनुषंगाने गोष्टी आयुष्यात घडतात. मोठे विचार ठेवा, तर मोठी मजल माराल. जमणार नाही म्हणून थांबू नका तर कसं जमवता येईल हे बघा.

प्रत्येक व्यक्तीने नोकरी-व्यवसायाच्या पलीकडे जाऊन स्वत:साठी वेळ काढायला हवा. आपल्या आवडीनिवडी जपायला हव्यात. आपला आनंद स्वत: मिळवता आला पाहिजे. आणि त्यासाठी आर्थिक गुंतवणूक योग्य वेळी करून त्यानुसार खर्च केला तर आनंद आणि समाधान दोन्ही उपभोगता येईल.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

trupti_vrane@yahoo.com

सूचना :

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरात गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व नमूद म्युच्युअल फंड रेग्युलर ग्रोथ प्लानचे असून, यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील; परंतु त्यांचा या सदरातील पोर्टफोलिओंच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.
  • म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर यांचा विचार या सदरात केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.