नववर्षांतील निर्देशांकासाठी सर्वात बहारदार आठवडा मध्यंतरी आपण अनुभवला. प्रथेने दिसून येणारी अर्थसंकल्पपूर्व बाजार तेजी सुरू आहे असे वाटले होते. पण पुढे सलग चार दिवस घसरणीचा क्रम रेल्वे अर्थसंकल्पापर्यंत सुरू राहिला. चीन, जपान, युरोपातील बडय़ा अर्थव्यवस्थांमधील दोषपूर्ण संकेतांपायी वैश्विक बाजार नरमला असल्याने, आपल्या बाजाराने यापेक्षा वेगळे काही चित्र दाखविणे शक्यच नाही.

आता प्रश्न यंदाच्या अर्थसंकल्पातून बाजाराला काही ठोस वळण दिले जाईल काय? सोमवारच्या अर्थसंकल्पाआधी सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालाचा रोख पाहता तशी शक्यता कमीच दिसून येते. बँकांच्या समभागांबाबत वाढते अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) हे अतीव चिंतेचे कारण असले तरी या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान व आवाका यांची आर्थिक पाहणी अहवालाने समर्पक दखल घेतलेली आहे. सरलेल्या सप्ताहअखेरीस बँकांच्या समभागांमधील सरशीनेही असाच प्रत्यय दिला आहे. बँकांचे समभाग गुंतवणूकदारांच्या भागभांडारात असायलाच हवेत.

असे म्हटले जाते की, ‘इक्विटी इज फॉर लाँग टर्म!’ ज्या कुणाला शेअर बाजारात आपले नशीब आजमावायचे त्यांच्यासाठी हा पहिला कानमंत्र ठरावा. होय हे खरेच आहे. परंतु बाजारात केव्हा प्रवेश करावा आणि केव्हा बाहेर पडावे, हे ठरविणार कसे? बाजाराची नेमकी नाडी पकडण्याच्या आपल्या या प्रयत्नात, आपले अंदाज हे १०० टक्के अचूक ठरतील काय?  ठोस हमीचा अभाव, प्रच्छन्न अनिश्चितता व अनाकलनीयतेतूनच बहुतांश गुंतवणूकदार आपले स्वकष्टार्जित धन म्हणूनच मुदत ठेवींमध्ये गुंतविताना दिसतात.

समभाग गुंतवणुकीत प्रचंड जोखीम आणि चढ-उतार आहेत, हे मान्य. पण ही चढ-उताराची चक्रे केवळ काही दिवसांपुरती असतात. तुम्ही दीर्घावधी म्हणजे काही वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचे निश्चित केले असेल तर या काही दिवसांच्या घटनाक्रमाने तुम्ही बेजार होण्याचे तसे काहीच कारण नाही. किंबहुना हे चढ-उतार तुमच्यासाठी शाप नव्हे तर अशा स्थितीत वरदान ठरतील. अट एकच गुंतवणुकीचा तोही नियमित व संयत स्वरूपात शिरस्ता तुम्ही कायम ठेवायला हवा. हा शिरस्ता ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात एसआयपी (सिप)च्या माध्यमातून सहज शक्य आहे. दरमहा तुमच्या बँक खात्यातून ठरावीक रक्कम ठरलेल्या गुंतवणूक पर्यायात वळती करणारा हा यांत्रिक प्रकार आपोआपच गुंतवणुकीतील भावनिक पैलूवर फक्त नव्हे तर धाकधूक, चिंता यावर मात करणारा ठरतो. सिप गुंतवणूक पद्धती वरदान कशी ठरते ते सोदाहरण पाहू या.

आजच्या बाजारस्थितीची तुलना ही २००८-०९ सालातील परिस्थितीशी केली जात आहे. किंबहुना गुंतवणूकदारांची मानसिकता तरी तशी बनली आहे. त्यामुळे त्या समयीचे एक उदाहरण नजरेखालून घालू. २००८ सालात जानेवारीमध्ये सेन्सेक्स २०,३०० अंशांच्या घरात होता, त्यावेळी तुम्ही पसंतीच्या इक्विटी म्युच्युअल फंडात दरमहा १००० रुपयांची सिप सुरू केली असे मानू या. एप्रिलपर्यंत तुमचे ४,००० रुपये जमा झाले, पण बाजार नरम असल्याने या गुंतवणुकीचे मूल्य ३,५६३ रु. इतकेच म्हणजे नुकसानीचे होते. पण त्याच वेळी सेन्सेक्समध्ये २३ टक्के घसरण होऊन तो १५,६०० वर उतरला होता. सहा महिन्यांपश्चात तुम्ही गुंतविलेल्या ७,००० रुपयांचे मूल्य नुकसानीतच म्हणजे ५,४९९ रु. असे होते. तर त्या समयी सेन्सेक्स १२,९६२ अंश म्हणजे जानेवारीच्या तुलनेत ३७ टक्के घसरला होता. नऊ महिन्यांनंतर म्हणजे ऑक्टोबर २००८ मध्ये तुमच्या १० हजारांच्या गुंतवणुकीचे मूल्य बनले ८,३३० रुपये. म्हणजे तुमचे व्यक्तिगत नुकसान १७ टक्क्य़ांचे तर त्यावेळी सेन्सेक्सची १३,०५६ ही पातळी पाहता त्याचे नुकसान ३६ टक्के असे होते.

थोडा कालावधी वाढवत नेत १८ महिन्यांपश्चात असणारी स्थिती पाहू. जुलै २००९ मध्ये सेन्सेक्स काहीसा सुधारून १४,६४५ पातळीवर पोहचला. तरी तुम्ही गुंतवणूक सुरू केली त्या पातळीपासून सेन्सेक्स २८ टक्के खालीच होता. परंतु तुम्ही सिपद्वारे तोवर केलेल्या १९,००० रुपयांचे मूल्य हे २१,८६६ रुपयांवर पोहोचले होते. म्हणजे सेन्सेक्स २८ टक्के खाली तर तुमचे गुंतवणूक मूल्य हे १५ टक्के वर असे चित्र दिसून आले.

जर आणखी पुढे जाऊन पाहिल्यास, ऑगस्ट २०११ मध्ये सेन्सेक्सने १८,३१४ अंशांचा स्तर गाठला. तुमची गुंतवणूक सुरू झाली त्या जानेवारी २००८ तुलनेत सेन्सेक्स तरी १० टक्के खालीच होता. त्या उलट तुमच्या सिप गुंतवणुकीचा परतावा २० टक्क्य़ांवर पोहोचला होता. याचा अर्थ स्पष्टच आहे की, जर तुम्ही सिपद्वारे गुंतवणूक करीत राहिलात, कोणताही खंड नाही की निर्गुतवणूक नसेल तर बाजारातील चढ-उतार तुमच्या पथ्यावर पडताना दिसतील. मोठय़ा कालावधीत समभागांमधील गुंतवणूक लाभ मिळवून देते ती अशीच!

(लेखक निर्मल बंग सिक्युरिटीजमध्ये सल्लागार आहेत.)

arthmanas@expressindia.com