07 March 2021

News Flash

ज्येष्ठ नागरिकांना पन्नास हजार रुपयांच्या व्याजावर करातून सूट

प्रश्न : मी एक घर खरेदी केले आहे आणि त्यासाठी मी गृहकर्ज घेतले आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| प्रवीण देशपांडे

प्रश्न : मी एक घर खरेदी केले आहे आणि त्यासाठी मी गृहकर्ज घेतले आहे. या घराव्यतिरिक्त माझे अजून एक घर आहे. हे घर विकून आलेल्या पैशातून माझे गृहकर्ज फेडू इच्छितो. असे केल्यास मला घरविक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यावर कर सवलत घेता येईल का?- संजय बोर्डे, औरंगाबाद

उत्तर : कलम ५४ नुसार घर विक्री केलेल्या तारखेपूर्वी एक वर्ष आधी किंवा विक्रीनंतर दोन वर्षांच्या आत (बांधले तर तीन वर्षांच्या आत) नवीन घरात गुंतवणूक केल्यास विक्रीवर होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. आपण नवीन घरात गुंतवणूक वरील कालावधीमध्ये केलेली असल्यास आपल्याला कर सवलत मिळू शकते. नवीन घरात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझे वय ९० वर्षे आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये माझ्या अपेक्षित उत्पन्नात मुदत ठेवींवरील व्याज ७५,००० रुपये, म्युचुअल फंड आणि शेअर्सवरील लाभांश १,२५,००० रुपये आणि शेअर्स विक्रीतून होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा १,५०,००० रुपये यांचा समावेश आहे. मला या नफ्यावर कर भरावा लागेल का?- कृ.रा. टेंबे, ठाणे

उत्तर : आपल्याला म्युचुअल फंड आणि शेअर्सवर मिळणारा लाभांश हा करमुक्त आहे. नवीन झालेल्या सुधारणेनुसार कलम ८० टीटीबी नुसार ज्येष्ठ नागरिकांना बँकेतील आणि पोस्टाच्या ठेवींवरील व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंत सूट असल्यामुळे आपल्याला मुदत ठेवींवर मिळालेल्या ७५,००० रुपयांच्या व्याजापोटी उत्पन्नापैकी या कलमानुसार ५०,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. कंपन्यांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर, ८० टीटीबी या कलमानुसार वजावट मिळत नाही. शेअर्सच्या विक्रीतून होणारा भांडवली नफा हा एक लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे, नफा एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर, एक लाख रुपयांवरील रकमेवर १० टक्के इतका कर आर्थिक वर्ष २०१८-१९ या वर्षांपासून भरावा लागेल. आपल्या बाबतीत हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा १,५०,००० रुपये इतका आहे. या मधील १ लाख रुपये करमुक्त आहे, बाकी ५०,००० रुपये करपात्र आहेत. असे आपले एकूण करपात्र उत्पन्न ७५,००० रुपये (२५,००० व्याज आणि ५०,००० रुपये दीर्घ मुदतीचा भांडवली नफा). आपल्यासाठी कमाल करमुक्त मर्यादा ५,००,००० रुपये (वय ८० वर्षांपेक्षा जास्त) आहे आणि आपण निवासी भारतीय असल्यामुळे आपल्याला या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. तथापि, ११२ अ या कलमानुसार नमूद केलेल्या अटींची पूर्तता आपण केली आहे आणि हा भांडवली नफा कलम ५५ नुसार खरेदी किमतीनुसार गणला आहे असे गृहीत धरले आहे.

प्रश्न : माझ्या वडिलांनी एप्रिल २०११ मध्ये एक घर १८ लाख रुपयांना खरेदी केले होते. आता ते घर ३५ लाख रुपयांना विकून आलेले पैसे मला आणि माझ्या भावाला दोन स्वतंत्र घरे खरेदी करण्यासाठी मदत म्हणून देणार आहेत. या व्यवहारावर कर आकारणी कशी होईल?- अजय कुलकर्णी, ई-मेलद्वारे

उत्तर : आपल्या वडिलांनी एप्रिल २०११ मध्ये खरेदी केलेले घर आता म्हणजेच २०१८-१९ या आर्थिक वर्षांत विकले तर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. यावर महागाई निर्देशांकाचा फायदासुद्धा घेता येईल. भांडवली नफा खालीलप्रमाणे :

 • खरेदी किंमत रु. १८,००,०००
 • आर्थिक वर्ष २०११-१२ सालचा निर्देशांक१८४
 • आर्थिक वर्ष २०१८-१९ सालचा निर्देशांक२८०
 • महागाई निर्देशांकानुसार खरेदी किंमतरु. २७,३९,१३०
 • विक्री किंमतरु. ३५,००,०००
 • दीर्घ मुदतीचा भांडवली नफारु. ७,६०,८७०

२०१८-१९ या आर्थिक वर्षांचा महागाई निर्देशांक अजून जाहीर झाला नसल्यामुळे गृहीत धरला आहे.नवीन घरात गुंतवणूक वडिलांच्या नावाने होत नसल्यामुळे त्यांना नवीन घराच्या गुंतवणुकीची वजावट मिळू शकणार नाही. या भांडवली नफ्यावर त्यांना २० टक्के इतका कर भरावा लागेल. हा कर वाचविण्यासाठी भांडवली नफ्याएवढी रक्कम (७,६०,८७० रुपये) कलम ५४ ईसी कलमानुसार कर्जरोख्यांमध्ये (बाँड्स) गुंतविल्यास कर पूर्णपणे वाचेल. वडिलांनी आपल्याला आणि आपल्या भावाला दिलेल्या रकमेवर दोघांनाही कर भरावा लागणार नाही.

प्रश्न : मी पाच वर्षांपूर्वी पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) साठी अर्ज केला होता आणि तो मला मिळालासुद्धा होता. आता माझे पॅन कार्ड हरविले आहे आणि मला पॅनही माहीत नाही मला काय करता येईल?- शांताराम जाधव, ई-मेलद्वारे

उत्तर : प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर पॅन माहीत नसलेल्यांसाठी तो जाणून घेण्याची सोय केली आहे. आपण प्राप्तिकर खात्याच्या संकेत स्थळावर जाऊन ‘ङठडह डवफ ढअठ’द्वारे आपले नाव आणि जन्मतारीख ही माहिती भरून आपला पॅन  जाणून घेऊ शकता. हा पॅन माहीत झाल्यावर आपण नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. कोणत्याही व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असल्यास १०,००० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. एकापेक्षा जास्त पॅन असल्यास अतिरिक्त पॅन त्वरित प्राप्तिकर खात्याला कळवून रद्द करावे.

प्रश्न : माझी दोन घरे आहेत. एका घरात मी स्वत: राहतो आणि दुसरे घर मी नुकतेच खरेदी केले आहे आणि ते भाडय़ाने दिले आहे. मला दरमहा २०,००० रुपये भाडे मिळते. या घरासाठी मी गृह कर्जसुद्धा घेतले आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ सालचे गृह कर्जावरील व्याज ४,५५,००० रुपये इतके आहे. मला गृह कर्जावरील व्याजाची वजावट किती मिळेल?- रोहित काळे, ई-मेलद्वारे 

उत्तर : करदात्याला स्वत:चे एक राहते घर करमुक्त आहे, या घराचे घरभाडे उत्पन्न शून्य समजले जाते. या शून्य उत्पन्नातून गृह कर्जावर भरलेल्या व्याजाची वजावट मिळते. या वजावटीची मर्यादा २ लाख रुपये इतकी आहे. करदात्याकडे एकापेक्षा जास्त घरे असतील तर राहत्या घराव्यतिरिक्त इतर घरावर घरभाडे उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणले जाते. अशा घराच्या खरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटीला २ लाख रुपयांची मर्यादा नाही. प्रत्यक्ष दिलेल्या व्याजाची वजावट मिळते. आपल्या बाबतीत उत्पन्न आणि वजावट खालील प्रमाणे :

 • घरभाडे उत्पन्न रु. २,४०,०००
 • मालमत्ता कर (गृहीत)रु. १२,०००
 • बाकी रक्कमरु. २,२८,०००
 • ३०% प्रमाणित वजावट रु. ६८,४००
 • बाकी रक्कमरु. १,५९,६००
 • गृहकर्जावरील व्याजरु. ४,५५,०००
 • करपात्र उत्पन्न / (तोटा) – २,९५,४००

मागील वर्षी झालेल्या सुधारणेनुसार ‘घरभाडे उत्पन्न’ यामध्ये असलेला ‘तोटा’ इतर उत्पन्नातून फक्त २ लाख रुपयांपर्यंत वजा करता येतो. बाकीचा ९५,४०० रुपयांचा तोटा पुढील ८ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येईल.

प्रश्न : मला माझ्या वाढदिवसानिमित्त मित्राने परदेशातून २,५०० अमेरिकी डॉलर, म्हणजेच अंदाजे १,६५,००० रुपये भेट म्हणून बँकेद्वारे पाठविले. मला मिळालेली रक्कम करपात्र आहे का? असल्यास मला किती कर भरावा लागेल?- एक वाचक, ई-मेलद्वारे

उत्तर : करदात्याला ५०,००० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या भेटी मिळाल्यास त्या करपात्र नाहीत. आर्थिक वर्षांत ५०,००० रुपयांच्या पेक्षा जास्त भेटी मिळाल्यास संपूर्ण भेटीची रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणली जाते. आपल्याला मित्राकडून मिळालेली रक्कम ५०,००० पेक्षा जास्त असल्यामुळे संपूर्ण १,६५,००० रुपये रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणली जाईल. ठरावीक नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटी करमुक्त आहेत अशा भेटी या ५०,००० रुपयाच्या मर्यादेत गणल्या जात नाहीत.

प्रश्न : मी एका अनिवासी भारतीयाकडून एक घर खरेदी करीत आहे. घर खरेदी करताना मला त्यावर उद्गम कर (टीडीएस) कापावा लागत आहे? तो उद्गम कर मी कसा भरावा?- आकाश देसाई, मुंबई

उत्तर : अनिवासी भारतीयांकडून स्थावर मालमत्ता खरेदी करताना कलम १९५ नुसार उद्गम कर कापला जातो. या कलमाद्वारे उद्गम कर कापण्यापूर्वी टॅक्स डिडक्शन नंबर (टीडीएन) घेणे गरजेचे आहे. हा नंबर घेण्यासाठी फॉर्म ४९ ब मध्ये माहिती भरून हा अर्ज जवळच्या टीन सेंटरमध्ये दाखल करता येतो किंवा ऑनलाइन अर्ज देखील करता येतो. कापलेला उद्गम कर टीएएन वापरून संबंधित चलानद्वारे बँकेत भरावा लागेल. निवासी भारतीयाकडून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेवर कापलेला उद्गम कर भरण्यासाठी मात्र टीएएनची आवश्यकता नाही. हा उद्गम कर पॅनद्वारे देखील भरता येतो.

प्रश्न : मी शेअरबाजारात नोंदणीकृत असलेल्या एका कंपनीचे ३०० शेअर्स जून २०१४ मध्ये प्रत्येकी १६० रुपयांना खरेदी केले होते. या कंपनीने नोव्हेंबर २०१७ मध्ये १:१ असा बोनस जाहीर केला. माझ्याकडे असे एकूण ६०० शेअर्स झाले. हे सर्व ६०० शेअर्स मी जानेवारी २०१८ मध्ये प्रत्येकी १२५ रुपयांना विकले. मला या व्यवहारावर कर भरावा लागेल काय?- संदीप कुलकर्णी, पुणे

उत्तर : आपण शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनीचे ३०० शेअर्स २०१४ मध्ये खरेदी केले आणि जानेवारी २०१८ मध्ये विकले. हे शेअर्स खरेदी केल्याच्या तारखेपासून एक वर्षांनंतर विकल्यामुळे हे दीर्घ मुदतीचे आहेत. त्यावर होणारा भांडवली नफा कलम १० (३८) नुसार करमुक्त आहे. या कलमानुसार करमुक्ततेचा फायदा घेण्यासाठी अशी अट आहे की शेअर्स खरेदी करताना (काही अपवाद वगळता) आणि विक्री करताना त्यावर एसटीटी (रोखे उलाढाल कर) भरला गेला आहे. आपला हा दीर्घ मुदतीचा तोटा आहे. दीर्घ मुदतीचा नफा करमुक्त असल्यामुळे तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येणार नाही किंवा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड देखील करता येणार नाही. नोव्हेंबर २०१७ मध्ये बोनस म्हणून मिळालेले शेअर्स जानेवारी २०१८ मध्ये, म्हणजेच बोनस मिळाल्यापासून एक वर्षांच्या आत, विक्री केल्यामुळे त्यावर होणारा भांडवली नफा हा अल्प मुदतीचा असेल. यावर एसटीडी भरला गेला असेल तरी या नफ्यावर १५ टक्के इतका कर भरावा लागेल. बोनस शेअर्ससाठी खरेदी किंमत शून्य समजली जाते. थोडक्यात आपला भांडवली नफा आणि त्यावर भरावा लागणारा कर खालीलप्रमाणे :

(लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेलpravin3966@rediffmail.comवर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 12:05 am

Web Title: loksatta financial advice
Next Stories
1 भूगोलाची तयारी
2 औषध संशोधनाचे अनोखे प्रारूप
3 नोकरीची संधी
Just Now!
X