ताहेर बादशहा; मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) इन्व्हेस्को म्युच्युअल फंड

भांडवली बाजारात निर्देशांक जानेवारी महिन्यात अत्युच्च शिखरावर होते, तेथून दोन महिन्यांत तीव्र घसरण अनुभवास आली त्याची कारणमीमांसा आणि आगामी दिशादर्शन करणारा हा वार्तालाप..

  • अत्युच्च शिखरावरून सध्याचा निर्देशांकातील १० टक्क्यांपर्यंतचा ताजा उतार नेमके काय सूचित करतो?

जानेवारी २०१८ मधील सार्वकालिक उच्चांकावरून निर्देशांकाची झालेली अलीकडची घसरण ही काही घटनांवरील प्रतिसादाला प्रतिबिंबित करते. सरकारी रोख्यांच्या किमती गेल्या ४-५ महिन्यांत जवळपास एक टक्क्यांनी घसरल्या आहेत. वित्तीय शिस्तीच्या आघाडीवर सरकारचे भरकटणे आणि त्या परिणामी चलनवाढीचा दर वाढून व्याजाचे दर वाढतील, अशा रोखे बाजाराच्या चिंताग्रस्त कयासांचे ते फलित आहे. शिवाय, जागतिक बाजारात अमेरिका-चीन अर्थसत्तांचा संघर्ष, विकसित राष्ट्रांमध्ये व्याजाचे दर चढत जाणे, आयातीत जिनसांच्या किमती भडकणे वगैरेचा एकत्रित परिणाम म्हणून या घसरणीकडे पाहावे लागेल.

  • या घसरणीनंतर मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील गुंतवणुकीकडे कसे पाहावे, त्यांचे मूल्यांकन अद्याप चढेच म्हणावे काय?

जानेवारीचा उच्चांक ते मार्च २०१८ अखेपर्यंत मिड कॅप निर्देशांकातील घसरण ही अधिक तीव्र स्वरूपाची म्हणजे १४ टक्क्यांच्या घरातील आहे. निफ्टीतील या काळातील घसरण साधारण ९ टक्के आहे. इतकेच नव्हे काही मिड कॅप समभाग तर १० ते २५ टक्क्य़ांपर्यंत आपटले आहेत. हे असे असूनही एकंदर मिड कॅप आणि स्मॉल कॅप भांडाराचे मूल्यांकन हे ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत अद्याप अधिमूल्य राखून आहे, तर या श्रेणीतील काही समभागांचे मूल्यांकन यातून अधिक आकर्षकही बनले आहे, असे म्हणावे लागेल.

  • सध्या सुरू असलेल्या जागतिक व्यापार युद्धाबद्दल आपले मत काय? भारताच्या दृष्टीने यासह आणखी काही धोके दिसून येतात काय?

या व्यापार युद्धाच्या प्रारंभिक छटा पाहिल्या तर त्यातून भारतातील व्यापारविषयक परिस्थितीवर काही अर्थपूर्ण परिणाम साधेल, अशा शक्यतेला वाव नाही हे आता विश्वासाने सांगता येईल. किंबहुना काही अप्रत्यक्ष लाभदायी परिणामांची शक्यताच अधिक आहे. जसे आपण आयात करीत असलेल्या जिनसांचे भाव घसरतील आणि परिणामी देशांतर्गत महागाई दर संथावला जाईल. तरीही येत्या काळात जागतिक स्तरावर तरलता आटली जाणे आणि खनिज तेलाच्या किमतीचा भडका हे भारतीय अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजार दोहोंसाठी धोक्याची टांगती तलवार असतील.

तर मग बाजारात तेजी पुन्हा प्रवाहित करणारे घटक काय असतील?

अलीकडच्या दिवसातील सरकारी रोख्यांच्या किमतीतील शिखरापासून अर्धा टक्क्यांच्या घसरणीने रोखे बाजाराच्या चिंता कमी करण्यास मदत केली आहे आणि त्याचा भांडवली बाजारावरही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. नजीकच्या काळात कंपन्यांच्या आर्थिक वर्षांतील अंतिम तिमाहीतील बहारदार कामगिरी ही भांडवली बाजाराच्या तेजीचा कल निर्धारित करेल. त्याचबरोबरीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीतून पुढे येणाऱ्या कौलाकडे बाजाराच्या सावध नजरा निश्चितच असतील.

  • पुढील वर्षांतील सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत बाजाराचे वर्तन कसे असेल? मार्च २०१९ अखेरीस निफ्टी निर्देशांकाच्या पातळीबद्दल तुमचे कयास काय? पुढील १२ महिन्यांत गुंतवणूकदारांनी किती परतावा समाधानकारक मानावा?

केंद्रातील सत्ताधाऱ्यांची आजवर विधानसभा निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमधील कामगिरी संमिश्र स्वरूपाची आहे, त्याला अनुरूप बाजारात वध-घटीचे अस्थिर पडसाद स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्यावरून, काही राज्यांमधील विधानसभा निवडणुका आणि पुढे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असा एकंदर महत्त्वाच्या राजकीय घटनाक्रमाने बजबजलेल्या आगामी काळाचा रागरंग कसा असेल, याचा अंदाज लावता येणे अवघड नाही. पुढील सहा ते १२ महिने हे भांडवली बाजारासाठी तीव्र अस्थिरतेचे छोटय़ा-मोठय़ा टप्प्यांचे असतील.

अर्थव्यवस्थेतील ताजे संकेत हे आर्थिक उभारीचा कल सुस्पष्टपणे दर्शविणारे आहेत आणि त्याचे प्रतिबिंब म्हणून आर्थिक वर्ष २०१९ मध्ये बाजार अपेक्षेनुरूप साधारण २० टक्क्यांच्या आसपास महसुली वाढ दर्शविणारी कंपन्यांची वित्तीय कामगिरी राहील. तरीही प्रासंगिक राजकीय, अर्थकारणीय आणि जागतिक जोखीमांमधून हे मूल्यांकनाचे गणित पार बिघडवून टाकले जाऊ शकेल.

  • सद्य:स्थितीत आदर्श भागभांडार काय असावा, गुंतवणूकयोग्य मालमत्तेच्या विभागणीबाबत तुमचे मार्गदर्शन काय असेल?

एक फंड घराणे या नात्याने आमच्या विविध फंडांची गुंतवणूक उद्दिष्टे आणि घराण्याच्या मूलभूत आज्ञांद्वारे आमचे गुंतवणूक निर्णय ठरतात. पोर्टफोलिओ अर्थात भागभांडार बनविताना, समभाग निवडीसाठी बॉटम-अप अप्रोच आणि उद्योग क्षेत्रवार योगदान यांचे पारडे एकसमान राखणारा आमचा संतुलित दृष्टिकोन आहे. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या आवर्तनाचा वेध घेऊन आम्ही केलेली गुंतवणूक योग्यच होती, हे उदयोन्मुख पुराव्यांमधून स्पष्ट झाले आहे. येत्या काळात औद्य्ोगिक/निर्मिती क्षेत्र पुनर्उभारी प्राप्त करू शकेल, अशा संभाव्यतेने आमच्या काही फंडांच्या पोर्टफोलिओत फेरबदल होतील. मिड आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत लार्ज कॅप समभागांना प्राधान्य आजवर आमच्यासाठी लाभदायी राहिले आहे. आमच्या सर्व पोर्टफोलिओमध्ये रोकडीची पातळी ही कमाल पाच टक्क्यांपर्यंत मर्यादित राखण्याचा क्रम यापुढेही कायम असेल.

..तरीही बँकांमध्ये गुंतवणुकीत दमदार मूल्य

  • बँकिंग व्यवस्थेपुढील ‘एनपीए’चे अवाढव्य संकट पाहता, तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील अथवा खासगी बँकांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला द्याल काय?

दीर्घावधीचा दृष्टिकोन असेल तर खासगी बँका हे आजही गुंतवणुकीचे प्राधान्याचे क्षेत्र निश्चितच आहे. गेल्या दोन वर्षांत बँकांच्या पत गुणवत्तेबाबत अभूतपूर्व समस्या सामोऱ्या आल्या असतानाही, उद्योग क्षेत्राला वित्तपुरवठय़ावर भर असणाऱ्या काही खासगी तसेच सार्वजनिक बँकांचा मुख्य गाभा अद्याप मजबूत आणि कोणत्याही विपरीत परिणामांपासून सुरक्षित आहे, अशी आमची धारणा आहे. प्रवाहाविरुद्ध पवित्रा (कॉन्ट्रा) म्हणून यातील काही मोजके समभाग दमदार मूल्य मिळविता येऊ  शकेल, असे वाटते.

(मुलाखत : सचिन रोहेकर)