28 February 2021

News Flash

करावे कर-समाधान : दीर्घावधीच्या भांडवली तोटय़ाची वजावट, दीर्घावधीच्या भांडवली नफ्यातूनच!

करोना, टाळेबंदी, मंदावलेली अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून काय बदल केले जाणार आहेत याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण देशपांडे

करोना, टाळेबंदी, मंदावलेली अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून काय बदल केले जाणार आहेत याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. हा अर्थसंकल्प प्रथमच कागदरहित असणार आहे. मोबाइल अ‍ॅपद्वारे अर्थसंकल्पाची माहिती मिळू शकणार आहे. पगारदारांसाठी ५०,००० रुपयांची प्रमाणित वजावट मर्यादा वाढेल काय? ‘कलम ८० सी’नुसार मिळणारी दीड लाख रुपयांच्या वजावटीची मर्यादा (जी २०१४-१५ मध्ये वाढविली होती) बदलत्या काळानुसार वाढेल का ? करोनामुळे वैद्यकीय खर्चात वाढ झाली आहे, त्याची वजावट करदात्याला मिळेल का? करदात्यांना करात काही सवलत मिळेल का? अशा अनेक प्रश्नांची उकल या अर्थसंकल्पातून होणे अपेक्षित आहे.

प्रश्न : मी एक वाणिज्य वापराची जागा भाडय़ाने घेतली आहे. परंतु काही कारणाने मी ही संपूर्ण जागा वापरू शकत नाही. त्यातील काही भाग मी भाडय़ाने दुसऱ्या व्यक्तीला दिला आहे त्याचे मला भाडे मिळते. हे भाडे मला करपात्र आहे का? या उत्पन्नावर मला ३० टक्के इतकी प्रमाणित वजावट मिळेल काय?

* किशोर जाधव

उत्तर : आपल्याला मिळणारे भाडे हे करपात्र आहे. आपण जागेचे मालक नसल्यामुळे हे उत्पन्न आपल्याला ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरात दाखविता येणार नाही. हे उत्पन्न आपल्याला ‘इतर उपन्न’ या सदरात किंवा ‘धंदा-व्यवसायाचे उत्पन्न’ या सदरात दाखवावे लागेल. त्यामुळे घरभाडे उत्पन्न या सदरात मिळणारी ३० टक्के प्रमाणित वजावट आपल्याला मिळणार नाही.

प्रश्न : मी माझी सदनिका माझ्या पत्नीच्या नावाने भेट म्हणून हस्तांतरित केली आहे. ही सदनिका भाडय़ाने दिली आहे आणि याचे भाडे पत्नीच्या नावाने मिळत आहे. हे घरभाडे उत्पन्न पत्नीने तिच्या उत्पन्नात दाखविले तर चालेल का?

* प्रशांत कुलकर्णी

उत्तर : सदनिका आपल्या पत्नीच्या नावाने जरी असली आणि पत्नीला जरी घरभाडे मिळत असले तरी हे घरभाडे उत्पन्न आपल्यालाच करपात्र उत्पन्नात दाखवावे लागेल. आपण आपली सदनिका पत्नीला  कोणत्याही मोबदल्याशिवाय हस्तांतरित केली असल्याने त्यापासून मिळणारे उत्पन्न आपल्यालाच करपात्र असेल, हे उत्पन्न पत्नीच्या उत्पन्नात दाखवणे कायद्याला अनुसरून नाही.

प्रश्न : मी काही वर्षांपूर्वी एका घराची विक्री केली होती आणि या विक्रीवर होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी नवीन घरामध्ये गुंतवणूक केली होती आणि त्यापूर्वी मी एका बँकेत कॅपिटल गेन खाते योजनेअंतर्गत पैसे ठेवले होते. हे पैसे मी नवीन घरासाठी वापरले, परंतु व्याजापोटी जमा झालेली रक्कम अद्याप या खात्यात बाकी आहे. आता हे खाते बंद करून मला पैसे काढायचे आहेत. हे खाते बंद करण्यासाठी काय करावे लागेल?

* मुग्धा नाडकर्णी

उत्तर : कॅपिटल गेन खाते योजना, १९८८ नियम १३ नुसार हे खाते बंद करण्यासाठी आपल्याला प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेला ‘फॉर्म जी’ पासबुक सोबत बँकेला सादर करावा लागेल. हा फॉर्म बँकेला सादर केल्यानंतर बँक हे पैसे आपल्या इतर खात्यात जमा करते.

प्रश्न : मी या वर्षी शेअर बाजारामार्फत समभागाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत. मला १,४५,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा झाला आणि १,२०,००० रुपयांचा अल्प मुदतीचा भांडवली नफा झाला. याशिवाय मागील वर्षांत ‘कॅरी फॉरवर्ड’ केलेला ५०,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटादेखील आहे. मला भांडवली नफ्याअंतर्गत कोणत्या रकमेवर कर भरावा लागेल?

* प्रभाकर सावंत

उत्तर : या वर्षी झालेला १,४५,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा या वर्षी झालेल्या १,२०,००० रुपयांच्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. तो पुढील वर्षीसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’च करावा लागेल. तसेच मागील वर्षांत ‘कॅरी फॉरवर्ड’ केलेला ५०,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा यावर्षी किंवा पुढील वर्षी फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येईल. या वर्षी दीर्घ मुदतीचा नफा न झाल्याने मागील वर्षांतील तोटादेखील पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करावा लागेल. त्यामुळे १,२०,००० रुपयांचा अल्प मुदतीचा भांडवली नफा हा करपात्र उत्पन्नात गणला जाईल आणि त्यावर १५ टक्के इतक्या सवलतीच्या दराने (यावर ‘एसटीटी’ भरला गेला असल्यामुळे) कर भरावा लागेल.

वाचकांनी आपले प्रश्न खाली दिलेल्या ई-मेलवर किंवा ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या arthmanas@expressindia.com ई-मेलवर शक्यतो मराठीत युनिकोडमध्ये टाइप करून पाठवावेत.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2021 12:35 am

Web Title: long term capital loss deduction only from long term capital gains abn 97
टॅग : Budget 2021
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : आत्मनिर्भर भारताचा ‘दुर्लक्षित’ पाईक
2 विमा.. सहज, सुलभ : विमा क्षेत्राला अपेक्षापूर्ती आस
3 रपेट बाजाराची : ‘हुरूप’ हवाय!
Just Now!
X