09 July 2020

News Flash

कर बोध : तोटा आणि प्राप्तिकर कायदा

आर्थिक व्यवहारांमध्ये जसा नफा होतो तसाच तोटाही होऊ शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण देशपांडे

आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक जण आवश्यक काळजी घेत असतो. यामध्ये कायद्याचे उल्लंघन होत नाही ना आणि आपली संपत्ती सुरक्षित आहे याकडे आपले विशेष लक्ष असते.

आर्थिक व्यवहारांमध्ये जसा नफा होतो तसाच तोटाही होऊ शकतो. नफा झाल्यानंतर ते उत्पन्न करपात्र आहे किंवा नाही, त्यावर किती दराने कर भरावा लागतो हे समजणे जसे गरजेचे आहे तसेच तोटा झाल्यावर काय करावयाचे हे माहीत असणेदेखील गरजेचे आहे. प्राप्तिकर कायद्यात या तोटय़ासाठी वेगवेगळ्या तरतुदी आहेत. हा तोटा कोणत्या उत्पन्नाच्या स्रोतात झाला आहे त्यानुसार तो तोटा इतर उत्पन्नातून वजा करावयाचा किंवा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करावयाचा हे ठरते. तोटा झाल्यानंतर खालील क्रमाने उत्पन्नातून वजावट घ्यावी लागते :

१. त्याच उत्पन्नाच्या स्रोतातून प्रथम वजावट : करदात्याला ज्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये तोटा झाला असेल तर तो प्रथम त्याच उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेल्या नफ्यामधून वजा करता येतो. उदा. जर एखाद्या करदात्याला एका धंद्यातून नफा झाला आणि दुसऱ्या धंद्यात तोटा झाला. हा तोटा त्याला सर्वप्रथम दुसऱ्या धंद्यातील उत्पन्नातून वजा करता येतो. याला काही अपवाद आहेत :

* सट्टा व्यवहारातील (ज्या व्यवहारात मालाचा ताबा घेतला जात नाही) तोटा हा इतर धंदा व्यवसायांतील उत्पन्नातून वजा करता येत नाही, तो फक्त सट्टा व्यवहारातील नफ्यामधूनच वजा करता येतो. उदा. शेअर्सच्या ‘इंट्रा डे’ व्यवहारामध्ये झालेला तोटा इतर धंदा व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही तो फक्त इतर सट्टा उत्पन्नातूनच वजा करता येतो. तो पूर्णपणे वजा होत नसेल तर पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो; परंतु सट्टा व्यवहारातून झालेल्या नफ्यातून इतर धंदा-व्यवसायांतील तोटा मात्र वजा करता येतो.

* घोडय़ाच्या व्यवसायातील तोटा हा फक्त घोडय़ाच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो.

* लॉटरी, शब्दकोडे, पत्ते खेळ किंवा जुगार, बेटिंगमधील तोटा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नाही.

* दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्पमुदतीच्या भांडवली तोटय़ातून वजा करता येत नाही. अल्प मुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.

२. इतर स्रोतातील उत्पन्नातून वजावट : एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्रोतामधून वजा होत नसेल तर तो इतर स्रोतामधील उत्पन्नामधून वजा करता येतो. याला अपवाद खालीलप्रमाणे :

* भांडवली तोटा हा इतर स्रोताच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही

* धंदा-व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही

* ‘घराच्या उत्पन्नातील’ तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो, मागील वर्षांपासून फक्त २ लाख रुपयांपर्यंतचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो

* कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतामधील तोटा हा लॉटरी, शब्दकोडे, पत्ते खेळ किंवा जुगार, बेटिंगमधील उत्पन्नातून वजा करता येत नाही

* कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतामधील तोटा हा घोडय़ाच्या व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही.

३. पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड : एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्रोतामधून वजा होत नसेल (वरील १ प्रमाणे) आणि तो इतर स्रोतांमधील उत्पन्नामधून वजा होत नसेल (वरील २ प्रमाणे) तर तो पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. याबाबतच्या तरतुदी खालीलप्रमाणे :

* ‘घरभाडे उत्पन्न’ या स्रोतातील तोटा : हा तोटा त्याच स्रोतातील उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून वजा न झाल्यास पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. मागील वर्षांपासून घरभाडे उत्पन्नातील २ लाख रुपयांपर्यंतचा तोटा इतर उत्पन्नांतून वजा करता येतो. हा तोटा जास्त असेल तर बाकी तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. पुढील वर्षांमध्ये हा तोटा फक्त घरभाडे उत्पन्नातूनच वजा करता येतो. हा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करताना विवरणपत्र मुदतीत दाखल केले पाहिजे, अशी अट नाही.

* ‘धंदा-व्यवसायातील उत्पन्न’ या स्रोतातील तोटा: सट्टा व्यवहाराव्यतिरिक्त धंदा-व्यवसायातून झालेला तोटा हा या वर्षीच्या उत्पन्नातून वजा होत नसेल तर तो पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि पुढील वर्षांमध्ये तो फक्त धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. सट्टा व्यवसायातील तोटा हा त्याच वर्षीच्या सट्टा व्यवसायाच्या नफ्यातून वजा न झाल्यास पुढील चार वर्षांसाठी तो कॅरी फॉरवर्ड करता येतो; परंतु पुढील वर्षांमध्येसुद्धा हा तोटा फक्त सट्टा व्यवसायाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. हा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

* ‘भांडवली नफा’ या स्रोतातील तोटा : भांडवली तोटा हा या वर्षीच्या उत्पन्नातून वजा होत नसेल तर तो पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि पुढील वर्षांमध्ये तो फक्त भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो; परंतु दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. अल्प मुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी दीर्घ आणि अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. हा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

* घोडय़ाच्या व्यवसायातील तोटा हा फक्त घोडय़ाच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो आणि तो वजा न झाल्यास पुढील चार वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि पुढील वर्षांत हा तोटा फक्त घोडय़ाच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो. हा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

*  उदाहरणार्थ : एका करदात्याचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०१९-२० यासाठी खालीलप्रमाणे :

पगार : ८,००,००० रुपये,

घरभाडे उत्पन्न : राहते घर १ घरभाडे उत्पन्न शून्य आणि गृहकर्जावरील व्याज ३,५०,००० रुपये, घर २ – घरभाडे उत्पन्न १,००,००० रुपये, मालमत्ता कर १०,००० रुपये आणि या घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज ३,००,००० रुपये.

भांडवली नफा : शेअर्सच्या विक्रीवरील अल्प मुदतीचा भांडवली नफा ७५,००० रुपये, शेअर्सच्या विक्रीवरील दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा ३,००,००० रुपये, सोने विक्रीवरील भांडवली नफा १,००,००० रुपये. सट्टा व्यवहारातील तोटा ५०,००० रुपये.

या करदात्याचा तोटा खालीलप्रमाणे या वर्षीच्या उत्पन्नातून वजा होईल किंवा कॅरी फॉरवर्ड होईल:

(खालील तक्ता पाहावा)

*(प्रत्यक्ष व्याज ३,५०,००० रुपये असले तरी कर-लाभ २ लाख रुपयांपर्यंत मर्यादित)

तक्त्यातील उदाहरणात ज्या राहत्या घराचे घरभाडे उत्पन्न शून्य आहे अशा घरासाठी कमाल २ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजाची वजावट मिळते. मागील वर्षांपासून फक्त २ लाख रुपयांपर्यंतचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत असल्यामुळे दुसऱ्या घरावरील २,३७,००० रुपयांचा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. सट्टा व्यवसायातील तोटा हा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नसल्यामुळे पुढील वर्षांसाठी कॅरी करावा लागेल. शेअर्सच्या विक्रीवर झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा (३ लाख रुपये) सोने विक्रीवर झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून (१ लाख रुपये) वजा करता येतो आणि तो पूर्णपणे वजा न झाल्यामुळे बाकी दोन लाख रुपये पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करावा लागतील. दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2019 4:07 am

Web Title: loss and income tax abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : दुर्लक्षित ‘हाय-बीटा’ शिलेदार
2 नियोजन भान : पण उमज पडेल तर..
3 अर्थ वल्लभ : तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी
Just Now!
X