सुहास सरदेशमुख

आंतरजाल न वापरता राहणारा माणूस आता आदिम समजला जाईल. बदलणारे तंत्रज्ञान आणि त्याचा वापर ही करोनाकाळात जगण्याची अपरिहार्यता झाली आहे. क्षणाक्षणाला इंटरनेटचे अवलंबित्व वाढू लागले आहे. हा जग बदलाचा वेग आणि त्या वेगावर आपला उद्योग उभा करताना अधिकाधिक सुविधा निर्माण करणारी माणसे यशस्वी ठरू शकतील. काळ बदलतो आणि त्याबरोबर भाषेत काही नवे शब्द येतात किंवा जुन्या शब्ंदाना नवे अर्थ मिळतात. लॉकडाऊन, आयसोलेशन, क्वॉरंटाइन हे शब्द या सहा महिन्यांत पुढे आलेले. अशाच दोन शब्दांनी आता आपले व्यवहार बांधलेले आहेत. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. यातील पहिल्या शब्दाभोवती इंटरनेट म्हणजे आंतरजाल जोडलेले असेल तर सुविधांचा उद्योग उभा करता येऊ शकतो हे औरंगाबादमधील तरुण उद्योजक सचिन काटे यांनी दाखवून दिले आहे.

बहुतांश उद्योगांमध्ये आता तंत्रज्ञानाचे ‘उबरीकरण’ (ओला- उबरमधील) सुरू झाले आहे. मूळ भांडवल कमी पण सुविधा निर्माण करून देणारी सेवा अशी ती प्रक्रिया. सचिन काटे यांचे व्यवसाय याच क्षेत्रात पाय रोवून उभारलेले. उद्योगाच्या स्थिर उभारणीमध्ये ‘क्लिअर कार रेंटल डॉट कॉम’ या पोर्टलचा मोठा वाटा. पुढे ही एक स्वतंत्र कंपनी झाली. एकही कार मालकीची नसताना ती उपलब्ध करून देणारी सुविधा सचिन काटे यांच्या कंपनीने २००९ मध्ये सुरू केली. ही प्रक्रिया ओला-उबरच्या पूर्वीची. त्यांची दखलही अर्थक्षेत्रातील नामांकित प्रकाशन संस्थांमध्ये घेण्यात आली. पण करोनाकाळात प्रवासी व्यवसाय पूर्णत: थांबले. गेल्या सहा महिन्यांत दहा कोटी रुपयांची उलाढाल आता एक कोटींपर्यंत खाली आली आहे.

पण उद्योगाची एक खिडकी बंद झाली आणि त्याच वेळी दुसऱ्या खिडकीजवळील ग्राहकांची गर्दी वाढली, कारण परिस्थितीमुळे तंत्रज्ञानाला दिलेला वेग. ‘इन्फोगिर्ड सोल्यूशन’ या कंपनीच्या नावातील ‘गिर्ड’ हा इटालिअन शब्द. सुरक्षा प्रदान करणारा, विमानात बसल्यावर सुरक्षा पेटी असतो तसा. माहिती किंवा विदा (डेटा) अधिक सुरक्षित राहावे म्हणून वापरला जाणारा. या उद्योगाच्या या खिडकीतून विविध कंपन्यांचा मनुष्यबळ वापर, त्यांचे व्यवस्थापन, उत्पादकतेचा दर्जा यासह विविध प्रकारच्या माहितीचे वर्गीकरण करून उद्योगातील उत्पादकता साखळी सुधारण्याची प्रणाली सचिन काटे यांची कंपनी विकसित करते. हा व्यावसाय आता करोनाकाळात वाढू लागला आहे. येत्या काळात जसजसा प्रवास आणि प्रवासी मोकळा श्वास घेतील आणि प्रवास करण्याची त्यांची मानसिकता बदलेल तसतसे ‘क्लिअर कार रेंटल’चा व्यवसाय पुन्हा नव्या वळणावर येईल असे काटे यांना वाटते. खरे तर आता भांडवली गुंतवणुकीपेक्षा उद्योगासाठी लागणाऱ्या वस्तू, यंत्र या भाडय़ाने मिळतात काय, याची चाचपणी अधिक होत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर हा कल प्रामुख्याने अधोरेखित होतो. अगदी संगणक विकत घेण्याऐवजी तो भाडय़ाने देणाऱ्या कंपन्या आणि ऑनलाईन सॉफ्टवेअरवर घरातून काम करता येणारी सोय निर्माण करून देण्यावर भर आहे. या बदलाच्या क्षेत्रात सचिन काटे काम करतात.

खरे तर औपचारिक शिक्षणातील काटे यांची गती जेमतेमच. म्हणजे दहावीला ४७ टक्के आणि बारावीला ५४ टक्के एवढेच गुण. परभणी जिल्ह्य़ातील धारडिघोळ या चार-पाचशे लोकसंख्येच्या गावाचे ते मूळ रहिवासी.

पुढे सचिनने औरंगाबाद शहर गाठले. तत्पूर्वी सोनपेठ येथे दहावीचे शिक्षण घेताना एका कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूटमध्ये स्वच्छतेचे काम केले. केवळ निरीक्षणातून ‘एस-सीआयटी’चा अभ्यासक्रम त्यांनी शिकून घेतला. पुढे या संस्थाचालकाने ही संस्थाच सचिनच्या जीवावर सोडून दिली. पण पुढे काय करायचे, असे प्रश्न होतेच त्यामुळे त्यांनी गाव सोडले. याच काळात ‘बीएस्सी-आयटी’ असा अभ्यासक्रम औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात सुरू झाला होता. त्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाने सचिन यांचे आयुष्य बदलून गेले. दरम्यान, शिकताना एका हॉटेलात टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी सुरू केली. पण तेथील संगणकाच्या आधारे त्यांनी हॉटेलची ऑनलाइन जाहिरात केली. औरंगाबादेत येणारे पर्यटक आणि प्रवासी वाहतूक या क्षेत्रात ग्राहक कसे मिळतात, त्यांना कोणत्या सुविधा लागतात, त्यांचा त्रास कसा कमी होईल, अशा प्रश्नांची उत्तरे शोधत जाणाऱ्या सचिन यांनी नोकरीत चांगली प्रगती केली होती. त्यांचा देश-विदेशातील संपर्क वाढला. पुढे नोकरी सोडून त्यांनी आणि त्यांच्या मित्राने ‘होरायझन टूर्स इंडिया डॉट कॉम’ ही कंपनी स्थापन केली. पर्यटकांना हॉटेल, टॅक्सी आदी सुविधा निर्माण करून देणारी ही कंपनी म्हणता येईल. संकेतस्थळांचे विविध पॅकेज करणाऱ्या सचिन काटे यांची पुढे भागीदारी तुटली. पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्यासाठी लागणारी रक्कम नातेवाईकांकडून घेतली. मात्र यशाची पायरी गाठताना संकेतस्थळ विकसित करण्याचे काम मिळावे म्हणून खासे प्रयत्न केले. साई टूर ट्रॅव्हल्सचे पहिले संकेतस्थळ त्यांनी केवळ दहा रुपयांत विकसित करून देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला. हे संकेतस्थळ विकसित करून घेण्यास या टूर कंपनीचे मालक तसे फारसे उत्सुक नव्हते. ‘आधी काम करून घ्या, मग फायदा होत असेल तर पैसे द्या,’ अशी अट मान्य करून कामाला सुरुवात केली. अशी पाच संकेतस्थळे विकसित केल्यानंतर अधिक रक्कम मिळू शकेल, असा सचिन यांना विश्वास होता. घडलेही तसेच. ट्रॅव्हलर्सच्या उद्योगाला लाभ होत असल्याचे दिसून आल्यानंतर ठरलेल्या रकमेपेक्षा साई ट्रॅव्हलर्सच्या मालकांनी दीड हजार रुपये अधिकची रक्कम दिली. याच काळात श्रीराम चौधरी हे सहकारी त्यांना भेटले. ते तेव्हा ‘एमसीए’चा प्रकल्प करीत होते. पगार नको पण काम करू द्या असे म्हणणाऱ्या चौधरी यांना सचिन यांनी स्वत:चा संगणक दिला आणि स्वत:चा लॅपटॉप घेतला. त्यानंतर कारभार वाढू लागला आणि आता चौधरी त्यांच्या कंपनीचे तंत्रज्ञान विषयातील प्रमुख व्यक्ती आहेत. २००८ ते २०११ या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील चांगले नाव आणि ओळख सचिन काटे यांनी मिळविली. पुढे प्रवासी क्षेत्रातील ओळखी आणि त्या क्षेत्राची गरज ओळखून त्यांनी ‘क्लिअर कार रेंटल’ हे पोर्टल सुरू केले. परदेशातून येणाऱ्या पर्यटक व्यक्तीला प्रति किलोमीटर लावण्यात येणारा दर आणि कारमालकाला मिळणारा दर यामध्ये खूप मोठा फरक होता. त्यामुळे पर्यटक आणि टॅक्सी यातील दुआ म्हणून ‘क्लिअर कार रेंटल’ हा उद्योग सुरू झाला. कमीत कमी किमतीमध्ये अधिकाधिक सेवा असे क्लिअर कारचे उद्दिष्ट ठरवून १०० शहरांत सेवा पुरविण्याचे लक्ष्य ठरविले होते. आता तो विस्तार ४०० शहरांपर्यंत पोहोचला होता. पण करोनामुळे पुन्हा सारे कमी झाले आणि आता सहा महिन्याने पुन्हा थोडय़ा प्रमाणात सुरू झाले आहे. पण आता दुसऱ्या बाजूचे काम वाढले आहे. विविध कंपन्यांमधील मनुष्यबळाचे व्यवस्थापन आणि त्यांना लागणारी तंत्रज्ञानाची सुविधा या क्षेत्रात सचिन काटे काम करत आहेत. मनुष्यबळ व्यवस्थापनातील हा व्यवसाय आता बाळसे धरतो आहे. गेल्या वर्षी एक कोटी २५ लाखांहून तो व्यवसाय दोन कोटीपर्यंतच्या उलाढालीपर्यंत वाढला आहे. आता सॉफ्टवेअर विकत घेण्याचा काळ नाही. त्यांची किंमतही परवडणारी नसते. त्याऐवजी त्याच्या स्वामित्व हक्कापोटी दरमहा रक्कम मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. त्याला आता चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे ते सांगतात.

आता भांडवली गुंतवणूक करण्याऐवजी जेवढे वापराल तेवढीच किंमत अशी नवी रचना उद्योगात येऊ लागली आहे. आता संगणकासारख्या वस्तूही तीन वर्षांने भाडय़ाने मिळू शकतात. माहिती तंत्रज्ञानातील मोठय़ा कंपन्या आता तसेच करार करू लागले आहेत. तंत्रज्ञानही बदलू लागले आहे. पूर्वी संगणकातील विविध सॉफ्टवेअरसाठीचे परवाने मिळविणे महागडे असे. त्यामुळे ‘ओपन सोर्स’मधील तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी रक्कम वापरून काम करण्यावर सचिन काटे यांनी आणि त्यांच्या कंपनीने प्रयत्न केले. आता तंत्रज्ञानाची भाषाही बदलते आहे. आता मशीन लर्निग आणि त्याला लागणारी विदा (डेटा)यावर काम केले जात आहे. उत्पादक कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनातील त्रुटी सांगणारा किंबहुना असे उत्पादन तयार झाले तर तो बाजूला काढणारी यंत्रणा विकसित होत आहे. त्यातील माहिती तंत्रज्ञान विकसित करण्यावर काटे आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत असतात. सर्व उद्योग उभा करताना कर्मचाऱ्यांबरोबर अधिक चांगले संबंध राहावेत असेही काटे यांचे प्रयत्न असतात. त्यातूनच वाढ होते, असाही त्यांचा दावा आहे.

सचिन काटे                     

क्लिअर कार रेटल प्रा. लि. इन्फोगिर्ड इन्फॉरमॅटिक्स प्रा. लि.

* व्यवसाय : माहिती-तंत्रज्ञान सेवा

* प्राथमिक गुंतवणूक    : नगण्य

* सध्याची उलाढाल : कोविडपूर्व १० कोटी रु,

(क्लिअर कार रेंटल)     : २ कोटी (इन्फोगिर्ड)

’ मनुष्यबळ            :  ६९ कर्मचारी

* लेखक ‘लोकसत्ता’चे औरंगाबाद प्रतिनिधी suhas.sardeshmukh@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.