– शिवाजी खांडेकर

अभियांत्रिकी शाखेतील पदवी संपादन केल्यानंतर आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळावे, यासाठी एमबीए पूर्ण केले. एमबीएमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर परदेशात उमदी संधी चालून आली होती. पण मनाशी पक्के केल्याप्रमाणे नोकरीसारखी रुळलेली वाट न निवडण्याचा निर्णय केला. वडिलांचा स्थापित व्यवसाय आणि त्यांच्या कारखान्यामध्ये हातभार लावण्याचा पर्याय उपलब्ध होता. परंतु लहानपणापासूनच उद्योगाची आवड असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हते. रंग तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नोकरदार न होता अनेकांसाठी रोजगार देणाऱ्या उद्योजकतेची कास धरली. आता चांगलेच मूळ धरलेल्या त्या कंपनीचे नाव आहे क्वालिटी पेंट अँड कोटिंग प्रा. लि. आणि त्या कंपनीच्या प्रवर्तक असलेल्या तरुण उद्योजिकेचे नाव आहे दीप्ती चंद्रचूड. त्यांच्या कंपनीमध्ये तयार झालेला रंग अमेरिकेसारख्या देशातील नामांकित कंपनीला पुरवला जातो.

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार

अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर अनुभवासाठी सुरुवातीला एक वर्षभर चिंचवड येथील ‘गरवारे वॉल रोप’मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून एक वर्षभर नोकरी केली. वर्षभराचा अनुभव घेतल्यानंतर आर्थिक आणि व्यावसायिक ज्ञानासाठी २००८ मध्ये एमबीएला प्रवेश घेऊन दोन वर्षांत ती पदवी संपादन केली. रांजणगाव, पुणे येथील युरोपियन पेंट आणि पीपीजी या जागतिक दर्जाच्या रंगाच्या कारखान्यामध्ये प्रत्येकी सहा महिने अनुभव घेतला. त्या कंपनीतून सहा महिन्यांसाठी चेन्नई येथील कंपनीमध्ये नोकरी केली. चेन्नई येथून पुण्यात आल्यानंतर २०१० मध्ये भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये रंगाचा पहिला कारखाना सुरू केला. त्यानंतर २०१७ मध्ये दुसरा कारखाना भोसरीमध्येच सुरू केला. रंगाच्या या कारखान्यामधून पर्यावरण पूरक रंग तयार केला जातो, अशा प्रकारचा रंग तयार करणारी क्वालिटी पेंट अँड कोटिंग ही भारतातील पहिली कंपनी आहे.

चंद्रचूड कुटुंब मूळचे पुण्याचेच. व्यवसायाला सुरुवात करताना वडिलांकडून अडीच कोटी रुपयांची आर्थिक मदत घेतली. मुलीचा उद्योग उभारणीचा हट्ट म्हणून वडिलांनी ते भांडवल उपलब्ध करून दिले. त्या पैशातून २०१० मध्ये कारखान्याची उभारणी केली. २०१७ मध्ये स्वत:च्या कमाईच्या पैशातून दुसऱ्या कारखान्याची उभारणी केली. बँकांचे कर्ज घेण्यास दीप्ती यांची तयारी नसते. त्यामुळे सुरुवातीला वडिलांच्या मदतीने आणि नंतर स्वत:च्या कारखान्यातील मिळालेल्या नफ्यावर त्यांनी दुसरा कारखाना सुरू केला. उत्पादन सुरू असताना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजोपयोगी पर्यावरण पूरक रंग तयार करण्याला सुरुवात केली. कंपनीचा प्रारंभ झाल्यानंतर कंपनीमधून धातू आधारित उत्पादनाला लागणाऱ्या रंगाची निर्मिती सुरूकेली. त्यानंतर त्यांनी प्लास्टिक उत्पादित उत्पादनाला लागणाऱ्या रंगाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. २०१२ मध्ये त्या रंगाला अमेरिकेतील वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘कमिन्स’ हे पहिले ग्राहक मिळाले. त्यासाठी अमेरिकेतून परवानगी मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाला हातभार लावण्याचे धोरण दीप्ती यांनी स्वीकारले. त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये यूव्ही किरणांच्या साहाय्याने वाळणारा रंग तयार केला. हा रंग केवळ चार सेकंदात वाळतो. याशिवाय ग्राहकांची उत्पादन क्षमता वाढते. भारतात अशा प्रकारचा रंग तयार करणारी ही एकमेव कंपनी आहे. हेल्मेटला चकाकी देण्यासाठी या रंगाचा वापर केला जातो. हा रंग बनविण्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी तैवान येथील एका रंगाच्या कारखान्यामध्ये प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर तशा प्रकारच्या रंगाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर किंवा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विषाणू प्रतिरोधक (अँटी-मायक्रोबायल) रंग तयार करण्याचा दीप्ती यांचा मानस आहे. त्यासाठी संशोधन सुरू असून लवकरच त्या रंगाचे उत्पादन त्यांच्या कारखान्यामधून सुरू करण्यात येणार आहे.

दीप्ती यांच्या कारखान्यामधून वाहन निर्मिती तसेच प्लास्टिक वापरासाठीच्या रंगाचे उत्पादन घेतले जाते. सध्या उद्योग क्षेत्रातील सर्वात जास्त ग्राहक त्यांनी उत्पादित केलेल्या रंगाला आहे. पुण्यासह देशभरात विविध कंपन्यांना रंग पुरविला जातो. प्रतिदिन ३५० टन (३ ते ३.५० लाख लिटर) इतक्या रंगाचे उत्पादन केले जाते. सुरुवातीच्या दोन ते चार वर्षांत पंधरा कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या कंपनीची आजची वार्षिक उलाढाल ४२ कोटी रुपये इतकी आहे. दोन्ही कारखान्यांमध्ये ९० कामगारांना रोजगार मिळत आहेत. विशेष म्हणजे रासायनिक उत्पादन असताना ६० टक्के कामगार महिला आहेत. मुलीचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. दीप्ती त्यांच्या कारखान्यामध्ये उत्पादित होत असलेल्या उत्पादनाचे विपणन करण्यासाठी त्या स्वत: लक्ष घालतात.

दीप्ती यांच्या क्वालिटी पेंट अँड कोटिंग प्रा. लि कारखान्यामधून उत्पादित झालेला रंग टाटा मोटर्स, बजाज, भारत फोर्ज, किलरेस्कर, महिंद्र, रिलायन्स, प्राज इंडस्ट्रिज, अ‍ॅटलास कॉप्को याशिवाय हेल्मेट तयार करणाऱ्या नावाजलेल्या कंपन्यांना पुरविला जातो. त्यांच्या कारखान्यांमध्ये रंगाची विविध ६०० उत्पादने घेतली जातात. कारखाना सुरू केल्यानंतर सुरुवातीला ५० ते ६० प्रकारची उत्पादने घेतली जात होती. परंतु ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्यावर संशोधन करून नवीन उत्पादन तयार करण्याला प्राधान्य देण्यास त्यांनी सुरुवात केली. सर्वात जास्त मागणी वाहन उद्योगातील कंपन्यांकडून येते. उत्पादनाचे विपणन करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये म्हणून विविध भाषा त्यांनी अवगत केल्या आहेत. मातृभाषा मराठीसह, हिंदी, इंग्रजी याशिवाय तामिळ, चिनी भाषा त्यांनी शिकून घेतली आहे. दीप्ती बहुभाषिक असल्यामुळे कंपनीच्या उत्पादनासाठी कंपनीमध्ये आलेल्या ग्राहकांशी त्या सहज संवाद साधतात. नोकरी करून सुखी जीवन जगण्यापेक्षा उद्योग सुरू करण्याचे धाडस त्यांनी स्वीकारले. त्यासाठी त्यांना आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि पाठबळही मिळाले. नवीन कामासाठी त्यांचा संपूर्ण पाठिंबा ही आतापर्यंतच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्या आवर्जून सांगतात.

भविष्यात पर्यावरण पूरक रंगाला मागणी वाढणार असल्यामुळे त्यांनी आतापासूनच त्यावर संशोधन सुरू केले आहे. रंगाची परदेशात निर्यात व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. कारखान्यामधील रंग अमेरिकेशिवाय परदेशातील इतर देशामध्ये रंगाचे उत्पादन पोहोचविण्याचा मानस दीप्ती यांनी व्यक्त केला आहे. ‘ग्रीन टेक्नॉलॉजी बेस प्रॉडक्ट’ तयार करणे हे दीप्ती यांच्या कंपनीचे वेगळेपण आहे. दीप्ती यांनी केलेल्या धाडसाची आणि कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकाने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे.

कारखान्यातील कामगारांना कुटुंब मानून कारखान्यात काम केले जाते. कामगारांच्या अडीअडचणीमध्ये सहकार्याची भूमिका ठेवून त्यांना मदत केली जाते. त्यामुळे कामगारही आपला कारखाना आहे, असे मानून काम करतात.

दीप्ती प्रदीप चंद्रचूड                      

क्वालिटी पेंट अँड कोटिंग प्रा. लि. पुणे

’ व्यवसाय : औद्योगिक वापराचे विविध प्रकारचे रंग निर्मिती

’ कार्यान्वयन : २०१०  साली

’ मूळ गुंतवणूक : अडीच कोटी रु. (स्व-भांडवल)

’ सध्याची उलाढाल : वार्षिक ४२ कोटी रुपये

’ रोजगार : थेट ९० कामगार

लेखक ‘लोकसत्ता’चे पुणे जिल्हा प्रतिनिधी 

shivaji.khandekar@expressindia.com