सचिन रोहेकर  sachin.rohekar@expressindia.com

संगणक युग आणि डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून शक्या-शक्य गोष्टींची ही केवळ सुरुवात मात्र आहे. येणारा काळ हा या युगाच्या आणखी नवनवीन आविष्कारांचा असेल. पण मागे वळून पाहिले तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला आज शक्य व सुलभ झाल्या आहेत, त्यांचा त्यावेळी आपल्याला कल्पनेतही विचार शक्य नव्हता. वित्तीय सेवा क्षेत्राबाबत बोलायचे झाल्यास, बँकिंग उद्योगाच्या उतरंडीत सर्वात तळचे स्थान हे ग्रामीण आणि सहकारी बँकांचे येते. सर्वार्थाने मागास मानल्या गेलेल्या या बँकांचे तुरळक अपवाद सोडल्यास आज संपूर्ण संगणकीकरण झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे ग्राहकांना कधीही आणि कुठेही सेवा देण्याइतकी त्यांनी सक्षमता मिळविली आहे. दोन दशकांपूर्वी एका सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या ध्यासपूर्ण धडपडीने साधलेला हा परिणाम आहे. तंत्रज्ञानाचे बळ देऊन सहकारी बँकांच्या सार्वत्रिक सक्षमतेसाठी मंदार आगाशे आणि त्यांच्या ‘सर्वत्र टेक्नॉलॉजीज’ने दिलेले योगदान असामान्य धाटणीचेच आहे.

सोलापूरमध्ये पंढरपूर अर्बन सहकारी बँक आणि कोल्हापुरात डॉ. अण्णासाहेब चौगुले नागरी सहकारी बँक आहे. या बँकांची खासियत ही की, त्यांचे खातेदार २०११ सालापासूनच देशभरातील दोन लाखांहून अधिक एटीएमचा वापर करून व्यवहार करीत आले आहेत. आज ही गोष्ट फारशी नवलाची नाही. परंतु दोन दशकांपूर्वी बँकिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या पाऊलखुणा सहकार क्षेत्रात याच फारशा नावाजलेल्या नसलेल्या बँकांमार्फत उमटविल्या गेल्या. आज सर्व डिजिटल देयक व्यवहारांच्या देखरेखीचा मक्ता ज्या सरकारी संस्थेकडे आहे त्या ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एनपीसीआय’ची नुकतीच स्थापना झाली होती. देशातील सर्व बँकांकडून त्याकाळी स्थापित सव्वा लाख एटीएमचे एक-सामाइक राष्ट्रीय जाळे विणणारी ‘राष्ट्रीय वित्तीय सांधा – एनएफएस’ची अंमलबजावणी एनपीसीआयने डिसेंबर २००९ मध्ये हाती घेतली. तोवर बँकांच्या ग्राहकांना त्यांचे खाते असलेल्या बँकांच्याच एटीएमचा वापर शक्य होता. ‘एनएफएस’मुळे कोणत्याही बँकेच्या एटीएम वापराचे बँक ग्राहकांना स्वातंत्र्य मिळाले आणि सहकारी बँकांच्या क्षेत्रात याची सुरुवात ही मुंबई-पुण्यातील नव्हे तर या सोलापूर-कोल्हापुरातील या बँकांकडून झाली ती ‘सर्वत्र टेक्नॉलॉजीज’च्या सेवा-प्रयासामुळे.

उद्योजकता अथवा उपक्रमशीलतेला काही उपजत गुण आवश्यक असतात हे मान्य. तरी आसपासच्या पोषक पृष्ठभूमीची भूमिका याकामी तितकीच महत्त्वाची असते. कुटुंबात शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे वातावरण असले तरी, पुण्याच्या प्रतिष्ठित पीआयसीटीमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवेपर्यंत मंदार आगाशे यांनी नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, असे काहीही ठरविले नव्हते. मंदार यांचे आजोबा चंद्रशेखर आगाशे हे सहकार क्षेत्रातील एक अग्रणी नाव. १९३४ साली बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेटच्या स्थापनेत आगाशे यांचा हिरिरीने सहभाग होता. त्याकाळी राज्यात पहिले काही सहकारी साखर कारखाने उभे राहिले, त्यात त्यांनी अकलूज, सोलापूर येथे पंढरपूर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे घरात रुळलेल्या परंपरेनेच मंदार यांचे सहकार क्षेत्राशी नाते जुळलेले आहे.

वडील आणि आजोबा ज्या क्षेत्रात काम करीत होते, तेथे नवीन तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञता, अगदी क्षुल्लक कारणाने आर्थिक व्यवहारात दिरंगाई किंवा खोळंबा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतात त्यावेळी ‘फिनटेक’ अर्थात वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र नुकतेच उदयाला येत होते. मंदार यांनीही शिक्षणानंतर अशा काही फिनटेक कंपन्यांत उमेदवारी केली. तथापि ग्रामीण भागात फिरताना, तेथे एटीएम कार्ड, डेबीट-क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणाच्या सुविधा वगैरे कशाचाही गंध नव्हता हे त्यांच्या लक्षात आले. विशेषत: सहकार क्षेत्रातील कुटुंबातील व्यावसायिक अडचणी लक्षात घेऊन, २००० साली ‘सर्वत्र’ची त्यांनी स्थापना केली. काळाची गरज म्हणून सुरुवातीला जपलेला हा व्यावसायिक परिवेश हीच ‘सर्वत्र’ची मग अद्वितीय ओळख बनून गेली, असे मंदार यांनी सांगितले.

छोटय़ा बँकांच्या डिजिटलीकरणात कळीची भूमिका बजावणाऱ्या या कंपनीकडून आज जवळपास ६०० हून अधिक सहकारी व ग्रामीण बँका राष्ट्रीय प्रवाहात सम्मीलित होऊ शकल्या आहेत. इतकेच नव्हे तर यातील बऱ्याच बँका रूपे डेबीट व क्रेडिट कार्ड ग्राहकांना वितरित करू शकल्या आहेत. किंबहुना, ग्रामीण आणि सहकारी बँकांसाठी कार्यरत आणि नियामकांकडून प्रमाणित पहिली तंत्रज्ञान प्रदाती कंपनी – ‘एएसपी’ म्हणून सर्वत्र टेक्नॉलॉजीजची ओळख आहे. भारतातील पहिल्या पॉससमर्थ एटीएमची विकासक, छोटय़ा बँकांना राष्ट्रीय अस्तित्व मिळवून देण्यासाठी एटीएम आणि आयएमपीएस नेटवर्कमध्ये त्यांचा समावेश, तसेच रूपे डेबीट कार्ड आणि रूपे ई-कॉम त्या बँकांपर्यंत नेणारी पहिली ‘एएसपी’ अशा अनेक गोष्टींचे जनकत्व या कंपनीकडे आहे.

‘एनएफएस’ने जसे एटीएमचे सार्वत्रिकीकरण केले, तेच काम युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ने डिजिटल देयके आणि निधी हस्तांतरणात घडवून आणले. मंदार आगाशे सांगतात, पूर्वी तुम्ही केवळ तुमच्या बँक खात्याचा वापर करून डिजिटल देयक व्यवहार पूर्ण करू शकत होता. आता यूपीआय आल्यामुळे तुमचे खाते कोणत्याही बँकेत असो, मोबाईल फोनवर असलेल्या कोणत्याही बँकेचे अ‍ॅप वापरून देयक व्यवहार विनासायास पूर्ण करण्याची सुलभता ग्राहकांना मिळाली आहे. एप्रिल २०१६ मधील यूपीआय सुविधेच्या अनावरणापासून सर्वत्र टेक्नॉलॉजीजने ग्रामीण व सहकारी बँकांना या व्यासपीठावर आणण्याचा विडा उचलला आहे. पुढे निश्चलनीकरण आले आणि ‘सर्वत्र’ राबवू पाहत असलेल्या प्रक्रियांनी आपसूकच वेग धारण केला. आताच्या करोनाकाळाने तर ज्या गोष्टी घडायला दोन वर्षांचा एरव्ही कालावधी लागला असता, त्या दोन महिन्यांत साकारल्या गेल्यात, असा अनुभव मंदार यांनी सांगितला. परिणामी २७ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील जवळपास ६०० बँका सर्वत्रमुळे यूपीआय आणि आयएमपीएस व्यासपीठावर येऊ शकल्या आहेत.

मंदार सांगतात, सर्वत्रच्या व्यासपीठामार्फत देशात होणारे निम्मे यूपीआय उलाढालीचे व्यवहार हाताळले जातात. तर देशातील आयएमपीएस व्यवहारांमध्ये सर्वत्रचा वाटा जवळपास ३० टक्के इतका आहे. सहकारी बँकांवर भर असलेल्या तंत्रज्ञान कंपनीचे अशा तऱ्हेने देशातील नवीन डिजिटल संक्रमणात महत्त्वाचा दुवा असणाऱ्या परिपूर्ण बँकिंग सेवा देणाऱ्या कंपनीच्या  रूपात परिवर्तन सुरू झाले आहे.

ग्रामीण व सहकारी बँकांच्या विशेष गरजांची पूर्तता करणारी नावीन्यपूर्ण उत्पादने आणि उपाययोजना हाच आपला कायम प्राधान्यक्रम राहील, असे मंदार आजही सांगतात. या अभावग्रस्त क्षेत्रासमोरील तांत्रिक, कार्यात्मक, पायाभूत आणि आर्थिक अशा सर्व अडथळ्यांना दूर करण्याचा ‘सर्वत्र’कडून प्रयत्न सुरूच राहील, असे ते सांगतात. निश्चलनीकरणानंतर, ३१ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने अनेक घोषणा करताना, तीन कोटी किसान क्रेडिट कार्डाचे रूपे डेबीट कार्डात रूपांतरणाचे उद्दिष्ट बँकांपुढे ठेवले आणि तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची मुदत निर्धारित करण्यात आली. केवळ सर्वत्रने यापैकी एकतृतीयांश काम मार्गी लावणारी कामगिरी केली. म्हणजे अनेक राज्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून वितरित अशा एक कोटी किसान क्रेडिट कार्डाचे रूपे कार्डात रूपांतरण ‘सर्वत्र’नेच घडवून आणले.

करोनाकाळात लोक घरात कोंडले गेले असताना, त्यांची आर्थिक कोंडीही होऊ नये म्हणून ‘सर्वत्र’कडून विकसित पॉइंट ऑफ सेल्स (पॉस)वर बेतलेले एटीएम आणि मायक्रो एटीएम थेट गृहसंकुलाच्या आवारात बँकांना पोहचविले. लोकांचीही या संकटसमयी उपयुक्त ठरलेल्या नगदी नोटा मिळविण्याची सोय होऊ शकली. यापूर्वी हा प्रयोग दोन वर्षांपूर्वी पंढरीच्या वारीत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थानासोबत समर्थ सहकारी बँकेला फिरते एटीएम प्रदान करून यशस्वीपणे केला गेला होता. उल्लेखनीय म्हणजे सध्याच्या टाळेबंदीच्या या काळाने एकीकडे ई-व्यापारालाही चालना दिली, तर कैक अशा गोष्टी होत्या ज्यासाठी लोकांपाशी रोकड असणेही तितकेच निकडीचे ठरले. गंमत म्हणजे दोन्ही आघाडय़ांवर सर्वत्रची तंत्रज्ञान प्रणालीच जनसामान्यांच्या कामी आली. ‘सर्वत्र’चा हा सार्वत्रिक वित्तीय संचार हा वेगाने उदयास येत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा बनतोय तो असा.

मंदार आगाशे

संस्थापक, सर्वत्र टेक्नॉलॉजीज

’ व्यवसाय : बँकिंग तंत्रज्ञान प्रणालीची पुरवठादार

’ कार्यान्वयन : २००० साली

’ सध्याची उलाढाल : वार्षिक ७० कोटी रुपये

’ मनुष्यबळ  : ३०० कर्मचारी थेट सेवेत

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस ई-मेल: arthmanas@expressindia.com वर करता येईल.