19 September 2020

News Flash

बंदा रुपया : पोल्ट्री खाद्य उद्योगातील सुमंगल

मालेगाव तालुक्यातील निमगावातील गरीब शेतकरी कुटुंबात संजय हिरे यांचा जन्म झाला

प्रल्हाद बोरसे

मालेगावच्या कर्मवीर भाऊराव हिरे यांच्या घराण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीर्घ काळ आपला दबदबा राखला होता. हिरे यांचे मूळ गाव असलेल्या निमगावचा रहिवासी असलेल्या एका नवउद्योजकानेही पोल्ट्री खाद्य निर्मिती क्षेत्रात असाच आगळावेगळा ठसा उमटविला आहे. कधी काळी वृत्तपत्र कार्यालयात शिपाई असलेला आणि उद्योगाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसणारा तरुण मजल-दरमजल करत स्वत:चा उद्योग थाटतो काय अन् तो यशस्वी करत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतो काय, हे सारे चमत्कारिक वाटावे असेच आहे. हा चमत्कार करणारा ‘हिरा’ म्हणजे संजय हिरे.

मालेगाव तालुक्यातील निमगावातील गरीब शेतकरी कुटुंबात संजय हिरे यांचा जन्म झाला. जेमतेम १० वीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षणाला रामराम ठोकण्याची वेळ संजयवर आली. शिक्षण घेण्याच्या वयात कुटुंबाची गरज म्हणून रोजगार शोधण्यासाठी मग भटकंती सुरू झाली. वयाच्या १९ व्या वर्षी १९९६ मध्ये नाशिक गाठल्यावर एका वृत्तपत्र कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी पत्करली. त्यातून प्राप्त होणाऱ्या अल्प पगारात फार काही भागत नाही, हे लक्षात आल्यावर पाच-सहा महिन्यांनी नोकरीला सोडचिठ्ठी देऊन इलेक्ट्रिकची कामे शिकून घेण्याचा प्रयत्न संजयने सुरू केला. हे ज्ञान आत्मसात झाल्यावर खासगी कामे मिळू लागल्याने अर्थार्जनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली. कालांतराने इलेक्ट्रिकची कंत्राटे घेऊन या व्यवसायात जम बसविण्याची धडपड सुरू ठेवली. आर्थिक चढ-उतार आणि एकूणच शाश्वत उत्पन्नाचा अभाव यामुळे या व्यवसायात तो समाधानी नव्हता. त्यामुळे हा व्यवसाय बंद करून २००८ मध्ये मालेगाव तालुक्यातील बेळगाव-जळगाव शिवारात जोखीम पत्करत कुक्कुटपालनाचा व्यवसाय संजयने सुरू केला.

या व्यवसायात वर्षभराचा अनुभव घेतल्यानंतर संजय हिरे यांच्यातील उद्यमशील व्यक्तिमत्त्व जागृत झाले. त्यांच्या असे लक्षात आले की, महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या एकूण कुक्कुटपालन व्यवसायाच्या जवळपास निम्मा कुक्कुटपालन व्यवसाय हा एकटय़ा नाशिक जिल्ह्य़ात आहे. आणि कोंबडय़ांचे खाद्यान्न बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे मका या पिकाचे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात विपुल प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. या भागात पोल्ट्री खाद्यान्न निर्मितीला उपलब्ध कच्चा माल आणि बाजारपेठ अशा दोन्ही अंगांनी अत्यंत पोषक वातावरण होते. त्यामुळे पोल्ट्री खाद्यनिर्मितीचा कारखाना सुरू केला तर त्याला उज्ज्वल भवितव्य राहील, या अटकळीतून त्यांनी काम सुरू केले. आर्थिक भांडवलाची जुळवाजुळव करण्यासाठी सुरू केलेली धडपड कामी आली. आंध्र बँकेच्या वित्त साहाय्याने २०१० मध्ये प्रत्यक्षात ‘आर. पी. अ‍ॅग्रो’ या नावाची पोल्ट्री खाद्य उत्पादन करणारी कंपनी त्यांनी बेळगावपाडे येथील पोल्ट्रीच्या जागीच सुरू केली. अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या कंपनीच्या उत्पादनाची मागणी दिवसागणिक वाढत गेली. परिणामस्वरूप वार्षिक उलाढाल वाढत गेली आणि कंपनीची भरभराटही.

प्रकल्प सुरू केल्यावर तीन-चार वर्षांतच या उद्योगात बऱ्यापैकी जम बसविणे हिरे यांना शक्य झाले. त्यानंतर पोल्ट्री खाद्याच्या वाढत्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी चांगला वाव असल्याचे लक्षात घेत त्यांनी उद्योग विस्ताराचे धोरण हाती घेतले. त्यानुसार जुन्या कंपनीचे नामकरण करून सुमंगल ग्रुप ऑफ कंपनीज्च्या अंतर्गत सुमंगल मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग कंपनी, सुमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, एस. एम. अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज आणि सुमंगल फूड्स अशा चार स्वतंत्र कंपन्या निर्माण केल्या. त्यामुळे सुरुवातीला एक कंपनी अस्तित्वात असताना जेव्हा प्रतिदिन शंभर मेट्रिक टन खाद्य उत्पादन घेता येणे शक्य होते तेथे आता ६०० मेट्रिक टनापर्यंत उत्पादन क्षमता वाढवणे शक्य झाले आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षमतेचे पोल्ट्री खाद्य उत्पादक म्हणून या समूहाची त्यामुळे ओळख निर्माण झाली आहे. खाद्य उत्पादनासह नऊ  कोटींचा आधुनिक पद्धतीचा पोल्ट्री व्यवसाय या समूहाने गेल्या वर्षीच सुरू केला आहे.

सुरुवातीला हिरे यांना प्रकल्प उभारताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. कौटुंबिक आर्थिक पाठबळ नसल्याने भांडवल उभारणीसाठी त्यांच्यासमोर पदोपदी अडचणी उभ्या राहिल्या. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पासाठी सुरुवातीला बँकेकडे एक कोटी कर्जाची मागणी त्यांनी केली होती. परंतु बँकेने केवळ ३८ लाखांचे अर्थसाहाय्य मंजूर केले. अशा परिस्थितीत हा प्रकल्प कसा तडीस न्यावा, हा यक्षप्रश्न त्यांना सतावत होता. पण याही स्थितीतून मार्ग काढत हिरे यांनी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे या प्रकल्पासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य वा शिक्षण त्यांच्याकडे नव्हते. पण केवळ प्रबळ इच्छाशक्ती, सचोटी, जिद्द आणि अपार कष्ट घेण्याची तयारी या कौशल्याच्या जोरावर सर्व अडचणींवर त्यांनी लीलया मात केली. १० वर्षांच्या कालावधीत सुमंगल ग्रुपची चांगली आर्थिक भरभराट झाली असून नावलौकिक आणि विश्वासार्हतादेखील वाढल्याने प्रारंभी कर्ज देण्यास आढेवेढे घेणाऱ्या बँका आता कर्जपुरवठा करण्यासाठी उतावीळ झाल्याचे चित्र आहे.

पोल्ट्री खाद्य उत्पादन कंपनीसाठी मोठय़ा प्रमाणावर मक्याची गरज असते. ती स्थानिक पातळीवर भागविली जाते. या भागातील उत्पादकांकडून बाजारभावाच्या तुलनेत प्रति क्विंटल २५ ते ३० रुपये जादा दराने हिरे यांची कंपनी मका खरेदी करते. यात शेतकऱ्यांची सोय होतेच, पण अडत, हमाली, वाहतूक आदी स्वरूपाच्या खर्चाची ते बचतदेखील करतात. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५० ते ७५ रुपयांचा लाभ होत असतो. एके काळी नाममात्र ६०० रुपये महिन्यावर दुसऱ्यांकडे नोकरी करणाऱ्या तरुणाने उद्योग क्षेत्रात स्वत:चा प्रशस्त असा मार्ग निर्माण करत, त्या माध्यमातून जवळपास ३२५ स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल.

शेतकऱ्यांना शेतमाल पिकवता येतो, पण विकता येत नाही असे नेहमी म्हटले जाते. तसेच पारंपरिक पद्धतीच्या शेतीमुळेही शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याची ओरड केली जाते. या पार्श्वभूमीवर, अलीकडेच हिरे यांनी शेतकऱ्यांसाठी सुमंगल नावानेच आणखी एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. त्याद्वारे शेतमाल विपणन व्यवस्थेस बळकटी मिळवून देणे, शेतकऱ्यांना उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यासाठी मार्गदर्शन करणे यांसारखे प्रयत्न केले जाणार आहेत.

संजय हिरे                       

सुमंगल ग्रुप ऑफ कंपनीज्, मालेगाव

’ व्यवसाय : पोल्ट्री खाद्य निर्मिती, शेतकरी     उत्पादक संघ

’ कार्यान्वयन :      २०१०  साली

’ मूळ गुंतवणूक :    ७० लाख रुपये

’ अर्थसाहाय्य :      डीएनएस बँक, आंध्र बँक

’ सध्याची उलाढाल : वार्षिक ३० कोटी रुपये

’ रोजगार निर्मिती :  ३२५ कामगार

लेखक ‘लोकसत्ता’चे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 1:02 am

Web Title: marathi entrepreneurs successful marathi industrialists industrialist from maharashtra zws 70
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : तरुणांना भुलवणारा ‘रॉयल’ दरारा
2 थेंबे थेंबे तळे साचे : कर नियोजन आणि गुंतवणूक पर्याय
3 बाजाराचा तंत्र कल : पण ‘चाल’ चांगली आहे
Just Now!
X