मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

ज्ञानेश्वर गुहे.. एक सर्वसामान्य नोकरदार. सकाळी अगदी नाकासमोर चालत कारखान्यापर्यंत जायचे व काम आटोपून संध्याकाळी घरी परत यायचे हा त्यांचा दिनक्रम. साहस, धाडस.. असे शब्द त्यांच्या या दिनचर्येत कुठेच नव्हते. परंतु आयुष्याच्या एका सावध वळणावर त्यांचा कारखाना अचानक बंद झाला. रोजच्या भाकरीचा प्रश्न आणखी गंभीर झाला. समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला नशीब समजून कुंठत जगायचे की धाडस करून आयुष्याला भिडायचे, असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यांनी यातला दुसरा पर्याय निवडला. आधी दिनचर्येत नसलेले साहस, धाडस हे शब्दच त्यांचे सारथी झाले आणि गाठीशी असलेल्या तांत्रिक अनुभवाच्या बळावर ज्ञानेश्वर गुहे यांनंी औद्योगिक यशाची नवी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. आता ते स्वत: एका उद्योगाचे मालक असून त्यांच्या व्यवसायाची ७ लाखांची उलाढाल आज ७ कोटींवर पोहोचली आहे.

२००४ पूर्वी ज्ञानेश्वर गुहे हे िहगणा येथील एका कारखान्यात काम करायचे. ते युनिट (कारखाना) बंद पडल्यानंतर त्यांनी विजेशी संबंधित कामे घरूनच करण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर स्वत:चा व्यवसाय करायला हवा असाही विचार त्यांच्या मनात आला. मित्र मंडळींची मते जाणून घेतली आणि मग ठाम निश्चय करून उद्योग क्षेत्रात स्वबळावर पाऊल टाकायचा धाडसी निर्णय घेतला. त्यांना इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनल म्हणजे वीज नियंत्रित ठेवणारे उपकरण तयार करायचे होते. घरात कोणाचीही उद्योग व्यवसायाची पाश्र्वभूमी नसताना केवळ घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर २००४ साली गुहे यांनी िहगणा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्यक्षात उद्योग सुरू केला. मात्र हा उद्योग सहज सुरू नाही झाला. त्यामध्येही अनंत अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. कोणताही उद्योग उभारताना सर्वात महत्त्वाचे असते ते त्या क्षेत्रातील ज्ञान आणि भांडवलासाठी पसा. गुहेंचे शिक्षण आणि पूर्वानुभव पाहता ते उद्योग उभारणीसाठी सक्षम होते. मात्र मुख्य अडचण होती ती भांडवलाची. गुहे सर्वसामान्य घरातून आल्याने उद्योग उभारण्यास लागणारी रक्कम त्यांच्याजवळ नव्हती. हाताशी केवळ एक लाख रुपये होते. त्याशिवाय उद्योग थाटण्यासाठी जागा खरेदीचे आव्हान होते. गुहे यांनी  िहगणा एमआयडीसी क्षेत्रात जागेचा शोध घेणे सुरू केले. अशात त्यांना एकांतात असलेल्या उद्योगाची जागा पसंत आली. जागा होती दहा हजार चौरस फूट. ही जागा त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी पुरेशी होती. मात्र दर त्यांच्या आटोक्यात नव्हते. त्या जागेसाठी त्यांना विविध प्रकारचे दर सांगण्यात आले. अंतिम दर हा ८ लाख ४५ हजार रुपये ठरला. मग गुहे यांनी त्यांचे खाते असलेल्या शिक्षक सहकारी बँकेत कर्ज घेण्यासाठी अर्ज केला. हाताशी असलेले एक लाख सुरक्षित ठेवी म्हणून अदा केली. त्यासोबतच कागदपत्राची पूर्तता केली आणि त्यानंतर त्यांना पाच लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात मिळाले. कर्ज मिळाले, पण उत्पादनासाठी आवश्यक मशीन, कामगार, कच्चा माल यांची जुळवाजुळव हे मोठेच आव्हान होते. कठोर मेहनतीची तयारी बघता गुहे यांना जणू नशिबानेही साथ दिली. काही पसे गोळा करून त्यांनी प्राथमिक स्तरावर उद्योग कसाबसा सुरू केला. मात्र त्यांना चिंता होती ती कर्जाच्या हप्त्यांची. अनेकदा कर्जाचे हप्ते वेळेवर जात नव्हते. सुरुवातीला केवळ चार कामगार मिळून त्यांनी उत्पादनाची सुरुवात केली. स्वत:च उत्पादन करायचे आणि त्याची मार्केटिंगदेखील स्वत:च करायचे सोबतच ऑर्डर मिळवायचे आणि माल पोहोचवून द्यायचा. १७ सप्टेंबर २००४ साली उत्पादन सुरू झाल्यावर त्यांना काही प्रमाणात ऑर्डर मिळायची. मिळालेल्या उत्पन्नातून कर्जाचे हप्ते फेडत त्यांनी स्वत:ला कर्जमुक्त केले. यात बराच कालावधी गेला. मात्र त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता बघता कालांतराने त्यांना मोठे ग्राहक मिळत गेले.  व्यवसाय वाढवण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण मंडळात नोंदणी करून तेथेदेखील आपले उत्पादन पुरवठय़ाचे काम मिळवले. एमएसईबीमध्ये ट्रान्सफॉर्मर, सब स्टेशन येथे या यंत्रणेचा पुरवठा गुहे यांच्या कारखान्यातून होऊ लागला.  मागणी वाढली आणि गुहे यांना आणखी काही नवे ग्राहक मिळाले. यामध्ये इंडोरामा, वेस्टर्न कोल फिल्ड, एमएसईबी, विविध खाद्य कारखान्यामध्ये यंत्र बसवण्यात आले. त्याशिवाय त्या यंत्राची देखभाल दुरुस्तीदेखील गुहे यांच्याकडे असायची.  त्यांच्या उद्योगाने भरारी घेतली. गुहे यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. २००६ साली गुहे यांची उलाढाल ६० लाखांपर्यंत गेली. त्यानंतर २००७ साली एक कोटीपर्यंत व त्यानंतर दरवर्षी उलाढाल वाढतच गेली. आज ती उलाढाल ७ कोटी ५० लाखांच्या घरात आहे. २०१८ पासून गुहे यांचा मुलगा तुषार याने आता व्यवसायाला हातभार लावला. बी. ई. इलेक्ट्रिकलची पदवी प्राप्त केलेला तुषार उद्योगाला अत्याधुनिक स्वरूप देण्यास मदत करतोय. नवे तंत्रज्ञान आत्मसात करायची जबाबदारी तुषारवर असून तो सक्षमपणे उद्योग सांभाळत आहे. गुहे यांच्या व्यवसायाची विशेषत: म्हणजे येथे प्रत्येक उपकरण हे मागणीनुसार तयार होते. कारखान्यात किंवा कंपनीत असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या लोडप्रमाणे अर्थात अ‍ॅम्पिअरप्रमाणे ते वीज नियंत्रित करत असते. विशेष म्हणजे, हे यंत्र शंभर टक्के मेक इन इंडिया आहे.

गुहे यांच्या हिंगणा येथील कारखान्यात मिळालेल्या ऑर्डरप्रमाणे इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनल तयार करण्यात येते. एकाचप्रमाणे हजारो पॅनल तयार करता येत असले तरी मागणीप्रमाणे त्यामध्ये बदल करावे लागतात. अर्थात त्यामध्ये विजेच्या प्रवाहाप्रमाणे पॅनल तयार करावे लागतात. या उत्पादनाचा थेट संबंध विजेशी असल्याने  गुणवत्तेकडे अधिक भर देण्यात येतो. लागणारे सर्व साहित्य आयएसओ प्रमाणित वापरण्यात येतात. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात, अशी माहिती ज्ञानेश्वर गुहे यांनी दिली.

ज्ञानेश्वर गुहे

जानकी इलेक्ट्रोमेक

’ उत्पादन :  इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनल

’ स्व भांडवल :  रु. १ लाख

’ सरकारी योजनेचा फायदा : नाही

’ सध्याची उलाढाल :  रु. ७ कोटी

’ कर्जभार : शून्य

’ रोजगार निर्मिती : २२