अनिकेत साठे aniket.sathe@expressindia.com

सर्वसाधारणपणे भागीदारीतील अनेक उद्योग, व्यवसाय कौशल्य आणि गुंतवणुकीसाठी पैसा यांचा संगम होऊन आकारास येतात. यात परस्परांवर विश्वास नसल्यास वादाचे प्रसंग उद्भवतात. भागीदारी विश्वासावर आधारलेली असेल तर प्रगती साधली जाते. नाशिक येथील टेक्नोक्रॅट्स कंट्रोल सिस्टीम (इं) प्रायव्हेट लिमिटेडच्या भरारीचे ‘नाते मैत्री अन् विश्वासाचे’ हे गमक ठरले. नीलेश साळगांवकर आणि अमर वैद्य यांची शाळेतील मैत्री उद्योगात अधिकच बहरली. उद्योगाची पार्श्वभूमी नसणाऱ्या मित्रद्वयींनी घरगुती स्वरूपात सुरू केलेल्या व्यवसायाचे आज प्रथितयश उद्योगात रूपांतर झाले आहे. भागीदारीत उद्योग-व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनाही त्यांचा प्रवास दिशादर्शक ठरणारा आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीत टेक्नोक्रॅट्स कारखाना आहे. करोनाकाळात नियमांचे पालन करत सुमारे ११० अधिकारी-कर्मचारी यंत्र, पाण्याचे पंप आदींवर वायर जुळवणी वा तत्सम कामात गर्क आहेत. तंत्रज्ञानाशी ओळख नसणाऱ्या आपल्यासारख्यांना असंख्य तारांच्या समोर दिसणाऱ्या जंजाळातून काहीच लक्षात येत नाही. टेक्नोक्रॅट्सचे कामच तसे अदृश्य शक्तीसारखे आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, यंत्र वा पंपांचे नियंत्रण, उद्योगात उत्पादन यंत्रणांचे स्वयंचलित व्यवस्थापन यासाठी अद्ययावत प्रणाली ते बनवितात. उद्योगांसाठी ऊर्जा अंकेक्षण, संवर्धन यंत्रणा, वीजपुरवठा गुणवत्ता नियंत्रण प्रणालीचे काम चालते. आवश्यकतेनुसार यंत्रणा तयार केल्या जातात.

अलीकडच्या काही वर्षांत महानगरांमध्ये उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या. अशा ठिकाणी पाणीपुरवठय़ासाठी आकाराने मोठी टाकी इमारतीच्या गच्चीऐवजी जमिनीवर बांधली जाते. या टाकीतून पंप पाणी खेचतो आणि आवश्यक त्या उंचीवर स्वयंचलितपणे ते पुरविले जाते. या व्यवस्थेला ‘बूस्टर पंप’ म्हणतात. केएसबी पंपच्या व्यवस्थेची संपूर्ण रचना टेक्नोक्रॅट्स करते. विक्रीपश्चात सेवाही पुरविते. एपी रॉक युरोपातील खाणकामासाठी यंत्र तयार करणारा उद्योग. २० मीटर लांब अशी त्यांची काही अवाढव्य यंत्रे आहेत. त्याची इलेक्ट्रिकल नियंत्रण प्रणाली टेक्नोक्रॅट्सची आहे. बांधकाम क्षेत्रासाठीची उपकरणे, मुंबईतील नव्या लोकलच्या इंजिनला लागणारे ‘वायर हार्नेसेस’, बडय़ा उद्योगांच्या उत्पादन यंत्रांसाठी नियंत्रण व्यवस्था, अशा अनेक ठिकाणी टेक्नोक्रॅट्सची यंत्रणा अदृश्य स्वरूपात कार्यरत आहे. इलेक्ट्रॉनिक्स, यंत्र नियंत्रण प्रणाली बनविण्याच्या क्षेत्रात इमर्सन हे जगातील सर्वात मोठे नाव. त्यांच्यासाठी टेक्नोक्रॅट्स काम करते. कामांचा विस्तारलेला परीघ आज दिसत असला तरी यामागे दोन दशकांतील मेहनत आहे.

नीलेश साळगांवकर आणि अमर वैद्य हे दोघेही पहिल्या पिढीतील उद्योजक. पेठे विद्यालयात त्यांचे एकाच वर्गात शिक्षण झाले. पुढे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ते सोबतच राहिले. नीलेश यांनी इलेक्ट्रॉनिक्स तर अमर यांनी यांत्रिकीची पदवी मिळवली. नीलेश यांचे वडील आरोग्य विभागात डॉक्टर, तर अमर यांचे वडील पेठे विद्यालयात मुख्य लिपिक. कुटुंबात कोणी उद्योजक नाही वा कसलीही व्यावसायिक पूर्वपीठिकाही नाही. अभियंता झाल्यानंतर या मित्रद्वयीने नोकरीऐवजी शिक्षणातील अभियांत्रिकी ज्ञानावर खटपटी सुरू केल्या. जवळ फारसे भांडवल नव्हते. कुटुंबीयांकडून नुसताच पाठिंबा होता, देण्यासाठी भांडवल नव्हते. काय करायचे हे ठरले नव्हते. खिशातील दीड हजार रुपये ‘व्हिजिटिंग कार्ड’ आणि ‘लेटर हेड’ छपाईत खर्च झाले. घराच्या व्हरांडय़ात संगणक जोडणी, स्टॅबिलायझर विक्री यातून सुरुवात झाली. बँकेत रोखपालाच्या खिडकीबाहेर टोकन क्रमांक दाखवणारा फलक असतो. तो बनविण्याचे काम हाती घेण्यात आले. तीन-चार वर्षे हे उद्योग करताना आपले इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योगांनी वापरायला हवे, हा विचार बळावत होता. ‘इलेक्ट्रॉनिक गॅजेट’ तयार करताना एक गोष्ट लक्षात आली होती. ती म्हणजे त्यांचे उत्पादन करायचे झाल्यास प्रभावी रचना, तपासणी यंत्रणा हवी. त्यामुळे उद्योगांना लागणाऱ्या चांगल्या कंपन्यांच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून त्यांची विक्री सुरू करण्यात आली. या माध्यमातून १९९७-९८ मध्ये औद्योगिक क्षेत्रात खऱ्या अर्थाने काम सुरू झाले. ‘एबीबी’चे वितरक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन) हे क्षेत्र कामासाठी निश्चित करण्यात आले.

प्रारंभी विनातारण कर्ज मिळावे म्हणून सहकारी बँकेची मदत घ्यावी लागली होती. महाराष्ट्र बँकेच्या शाखेत हे मित्र एकदा टोकन फलक दुरुस्तीसाठी गेले होते. कामाची धडपड पाहून तत्कालीन बँक व्यवस्थापकांनी स्वत:हून पतपुरवठा केला. त्याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात जागा घेताना झाला. ठरावीक टप्प्यावर नीलेश आणि अमर यांनी लहान-सहान कामांऐवजी मोठीच कामे करण्याचे ठरवले. कारण तशा कामात विशेष कौशल्य लागते. तशी कामे देखील मिळाली, पण ती झेपली नाहीत. प्रत्येक मागणी नवीन अन् वेगळी असायची. ग्राहकाने उत्पादन लवकर घेतले नाही तर पैसे अडकून पडायचे. त्याचा फटका २०१०-१२ या तीन वर्षांत बसला. टेक्नोक्रॅट्स अडचणीत आली. तब्बल अडीच कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. या काळात उद्योग सुरळीत ठेवण्यासाठी बँकेने सहकार्य केले. घर गहाण ठेवून वैयक्तिक कर्ज काढावे लागले. मित्र, नातेवाईक आणि इतकेच नव्हे, तर कारखान्यातील काही कर्मचारी मदतीसाठी पुढे आले. कठीण काळात टेक्नोक्रॅट्सला अन्य व्यवसायांतून रसद मिळाली. नामांकित कंपन्यांच्या उत्पादनाची विक्री सुरू होती. अभियंते, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्वयंचलित यंत्रणेचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्राचे काम सुरळीत होते. त्यातून उद्योगाला हातभार लागला. टेक्नोक्रॅट्सच्या प्रशिक्षण केंद्रातून आजवर अडीच ते तीन हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन औद्योगिक क्षेत्रात काम करत आहेत.

या धक्क्य़ानंतर टेक्नोक्रॅट्सने उत्पादनाची दिशा बदलली. एकदा स्वयंचलित यंत्रणेची रचना केली तर त्यातून पुढील काही वर्षे उत्पन्न मिळायला हवे, हा विचार करून नव्याने काम सुरू झाले. त्यातून केएसबी, एपी रॉक, सिमेन्स आदींची कामे मिळून स्थिरता आणली गेली. स्वयंचलित यंत्रणा सर्वव्यापी आहे. कुठेही ती प्रभावी ठरते. देशातील सिंचनासाठी पहिली स्वयंचलित यंत्रणेची रचना टेक्नोक्रॅट्सने तयार केली. कर्नाटकातील ३०० किलोमीटर लांबीच्या कालव्यातून स्वयंचलित पद्धतीने पाणी पुरविण्याची ही संकल्पना आहे. टेक्नोक्रॅट्सने ऊर्जा अंकेक्षण क्षेत्रातही प्रवेश केला. त्या अंतर्गत ऊर्जा बचत, संवर्धनाचे काम सुरू आहे. टाटा स्टील, जिंदाल, गोदरेज, महिंद्र असे मोठे उद्योग त्यांचे ग्राहक आहेत. उद्योग उभारणीत शासकीय धोरण अनेकदा अडसर ठरते. नीलेश आणि अमर यांनी औद्योगिक वसाहतीत डबघाईस आलेला कारखाना लिलावात घेतला होता. या प्रक्रियेनंतर आधीच्या उद्योगाची कर थकबाकी टेक्नोक्रॅट्सने भरावी, असे उद्योग विभागाचे म्हणणे होते. ती रक्कम त्या जागेच्या ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक होती. या जागेवर नवीन उद्योग सुरू होणे गरजेचे आहे हे विभागास पटवून दिले. परंतु, शासकीय धोरणामुळे तो व्यवहार रद्द करावा लागला. लिलावात भरलेली रक्कम परत मिळाली. नंतर सातपूर औद्योगिक वसाहतीत तुलनेत अधिक मोठी, पुरेशी जागा मिळाली. या ठिकाणी टेक्नोक्रॅट्सचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला. वार्षिक उलाढाल ४० कोटींच्या टप्प्याकडे मार्गस्थ होत आहे. सध्या कारखान्यात ११० कर्मचारी काम करतात. विश्वासाच्या नात्यावर शालेय मित्रांनी भागीदारीतील उद्योग वेगळ्याच उंचीवर नेला आहे.

नीलेश साळगांवकर, अमर वैद्य

टेक्नोक्रॅट्स कंट्रोल सिस्टीम (इं) प्रा. लि.

* व्यवसाय : इलेक्ट्रॉनिक्स / पंप नियंत्रण यंत्रणा, ऑटोमेशन, ऊर्जा अंकेक्षण/संवर्धन उपकरणांचे उत्पादन, नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरक

* कार्यान्वयन : १९९३ साली

* प्राथमिक गुंतवणूक : दीड हजार रुपये

* सध्याची वार्षिक उलाढाल : ३८ कोटी रुपये

* रोजगार निर्मिती : ११० कामगार

* वित्त-साहाय्य :  बँक ऑफ  महाराष्ट्र,  एचडीएफसी बँक

* संकेतस्थळ : www.teknocrats.com

लेखक ‘लोकसत्ता’चे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.