News Flash

बंदा रुपया : मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील

नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

ग्लॅडआयरिस टेक्नॉलॉजीजचे संस्थापक  १. मुख्याधिकारी अश्वनी राठोड आणि २. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी हर्षल इंगळे

सचिन रोहेकर

नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

नोव्हेंबर २०१६ चा तो निश्चलनीकरणाचा दिवस आठवतोय! होय, नोटाबंदी जाहीर केली गेली तो दिवस. तुमच्या घरातील, पाकिटातील पाचशे-हजार रुपयांच्या नोटा ‘कागज का टुकडा’ बनल्या. दूरचित्रवाणीवरील जनसंदेशात पंतप्रधानांनीच असे अगदी निर्विकारपणे कथन केले. अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या त्या निर्णयाची अनेकांनी पुढे मोठी किंमतही मोजली. रोखीतूनच व्यवहार करणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांसाठी तर तो निर्णय मरणकळाच ठरला; पण या संकटातच या मंडळींना व्यवसाय संधी दिसून आली. आज मुख्यत: रोकड व्यवहार करणाऱ्या पुणे-मुंबई, नागपूर-कोल्हापूरच्या १५ हजारांहून अधिक सूक्ष्म व लघू उद्योजकांसाठी त्यांच्याकडून विकसित ‘स्पायडरजी’ हे व्यवसाय सुलभतेचा मंत्र बनले आहे. सध्या करोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश घरात बंदिस्त असताना हेच ‘स्पायडरजी’ या छोटय़ा धंदेवाल्यांचे संचार व संपर्काचे प्रभावी साधन बनले आहे. पुण्यातील ग्लॅडआयरिस टेक्नॉलॉजीजच्या आणि तिच्या अश्वनी राठोड व हर्षल इंगळे या संस्थापकद्वयींच्या नवोन्मेषी सर्जनमंत्राची ही कहाणी..

वेगवेगळ्या तंत्रज्ञान कंपन्यांत जबाबदारीच्या पदावर उमेदवारी अशीच अश्वनी राठोड आणि हर्षल इंगळे या पुणेकर तरुणांची प्रारंभिक वाटचाल सुरू होती. साधारण २००५ सालच्या आसपास दोघांच्या करिअरची सुरुवात झाली. एकत्र येण्याआधी दोघांनीही त्यांच्या डोमेनमधील उद्यमी कसब अजमावले आणि त्यात यशही कमावले. गाठीशी असलेल्या या आठ-नऊ वर्षांच्या अनुभवाच्या शिदोरीवर २०१३ साली त्यांनी ग्लॅडआयरिस टेक्नॉलॉजीज् कंपनीची स्थापना केली. सुरुवात म्हणून त्यांनी बडय़ा कंपन्यांना ईआरपी अर्थात एंटरप्राइझ रिसोर्सेस प्लॅनिंग उपाययोजना पुरविण्यापासून केली. ईआरपी हे मूलभूतपणे व्यवसायात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा कसा वापर करावा त्याची आखणी करून देणारी प्रणाली आहे. व्यवसायांतर्गत संसाधने, माहिती आणि प्रक्रियेचे समन्वय साधण्यासाठी मदतकारक या प्रणालीतील सामान्य डेटा बेस जो त्या आस्थापनेमधील प्रत्येक विभागातील इंटरफेस आणि आकडेवारी गोळा करून, समर्पक निर्णयासाठी पृष्ठभूमी प्रदान करतो. यात बक्कळ पैसा असला तरी कामाचे समाधान नव्हते. मुळात भारतात यशस्वी म्हणून गणल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांची सुरुवात याच ईआरपी व्यवसायापासून झाली आहे. त्यामुळे वेगळेपणा नव्हता आणि अर्थात स्पर्धाही मोठी होती. उल्लेखनीय म्हणजे सुरुवातीला डझनभर कंपन्यांना अशा सेवा दिल्यानंतर, अश्वनी आणि हर्षल दोघांनीही वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला. आपल्या आसपासच्या छोटय़ा व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना तंत्रज्ञानसुलभ उत्तर सापडू शकेल काय, अशा प्रयत्नावर भर देण्याच्या निर्णयावर मग दोघांचे एकमत झाले.

जवळपास सहा महिन्यांपर्यंत कसून अभ्यास, संशोधन सुरू राहिले. देशातील सर्वाधिक जनसंपर्क आणि अमर्याद ग्राहक ओघ म्हणजे पर्यायाने अखंड रोकड प्रवाह सुरू असलेले व्यवसाय घटक हेच आपले लक्ष्य या ठावातूनच ‘स्पायडरजी’चा जन्म झाला. केबलवाला, इंटरनेट सेवा पुरविणारा, घरोघरी दूध पोहोचविणारा, वर्तमानपत्र वितरक अगदी दुकाने व कार्यालयात चहा अथवा जेवणाचे डबे पोहोचविणाऱ्यापासून रद्दीवाल्यापर्यंत छोटे व्यावसायिक हे ग्राहक संपर्काचे प्रचंड मोठे जाळे कोळ्यासारखे सांभाळत असतात. याच जाळ्यांचे प्रांत, प्रदेश, देश अशा सीमा लांघत विणले गेलेले जागतिक महाजाळे अशा अर्थाने ‘स्पायडरजी’ असे नामाभिधान निश्चित केले गेले. भिंतीवर सरपटणारा छोटासा कीटक असलेला कोळी दरवर्षी ८० कोटी टन वजनाच्या प्राणी कीटकांची शिकार करीत असतो. त्या छोटय़ाशा कोळ्याच्या ताकदीचा उच्चतम आविष्कार हेच स्पायडरजीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. पुढे निश्चलनीकरणानंतर किमान रोकडआधारित अर्थव्यवस्थेचा बोलबाला सुरू झाला. पाठोपाठ जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर छोटय़ा व्यवसायांना संघटित रूप क्रमप्राप्त ठरत गेले. अश्वनी सांगतात, ‘मोबाइल फोनचा वाढता वापर आणि स्वस्त दरात उपलब्ध मोबाइल डेटा या अनुकूलतांमुळे आम्हा मंडळींना पुन्हा मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही.’

स्पायडरजी हे लघुव्यावसायिकांसाठी उपलब्ध मोबाइल अ‍ॅपवर आधारित ई-इन्व्हॉइसिंग अर्थात महिनाभराचे बीजक ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर अदा करणारा मंच आहे. स्पायडरजी हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक वापरात आलेली इंटरनेटआधारित सॉफ्टवेअर अ‍ॅज अ सव्‍‌र्हिस ज्याचा संक्षेप ‘सास’ असा केला जातो, त्यावर बेतलेला व्यवसाय मंच आहे. किंबहुना सेवा म्हणून सॉफ्टवेअरचा हा प्रयोग बिझनेस टू कन्झ्युमर (बी२सी) अर्थात व्यावसायिक ते ग्राहक अशा धाटणीत संगणक तंत्रज्ञानाशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या व्यावसायिकांसाठी वापरात आणण्याचे धाडस अश्वनी आणि हर्षल हे पहिलेच. तेच त्यांचे वेगळेपण त्यांच्या यशाचे गमकही बनले.

सूक्ष्म, लघू व मध्यम ज्याला संक्षेपात आपण सूक्ष्म उद्योग म्हणू, हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. आर्थिक उलाढाल, व्यापार, रोजगारनिर्मिती आणि निर्यात अशा सर्वागाने त्यांचे अर्थव्यवस्थेला असलेले योगदान अतुलनीय आहे. अशा उद्योगांसाठी सेवा म्हणून सॉफ्टवेअर प्रणाली प्रदान करणाऱ्या ग्लॅडआयरिस टेक्नॉलॉजीजचा पहिला ग्राहक हा सुरुवातीच्या ईआरपी सेवा मिळविलेल्या कंपनीमार्फतच मिळाला, तर आर्थिक पाठबळ हे किर्लोस्कर न्यूमॅटिकचे राहुल किर्लोस्कर, संदीप घाटे आणि हर्षल मोदे या मराठी उद्योजकांनी गुंतविलेल्या बीज भांडवलातून उभे राहिले. पुढे या गुंतवणूकदारांच्या साखळीत ग्लेनकोअर ग्रेन इंडियाचे प्रवीण डोंगरे, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, ऑलसेक टेक्नॉलॉजीजचे आदि सर्वानन, आशीष नंदा, महेंद्र दोषी ही नावे जुळत गेली आणि ही नामावली वाढतच गेली.

उल्लेखनीय म्हणजे लघुव्यावसायिकांना स्पायडरजीची सेवा घेताना, आगाऊ एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. प्रत्येक व्यावसायिकाकडील एकाला ते पूर्णपणे मोफत दिले जाते. तर या व्यावसायिकांनी स्पायडरजीच्या आधारे वसुली केलेल्या दरमहा देयक मूल्याच्या १ टक्का इतके शुल्क कंपनी स्वत:कडे राखते आणि उर्वरित रक्कम व्यावसायिकाच्या खात्यात जमा करते. व्यावसायिकांच्या जाळ्यातील ग्राहकांना दरमहा ठरावीक तारखेला देयक सादर करणे, त्याची ऑनलाइन देयक भरणा करण्याच्या विविध पर्यायांद्वारे वसुली, गरज पडल्यास तीन वेळी स्मरण संदेश हे सारे ग्लॅडआयरिसकडूनच होते. असे अनेकांगी फायदे पाहता कंपनीची ही महसुली रचना छोटय़ा धंदेवाल्यांसाठी खूपच आकर्षक ठरली. ग्राहकांकडे महिन्याकाठी वारंवार वसुलीसाठी चकरा घालण्याची, त्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ खर्च करण्यापासून बचावासाठी मोजावी लागणारी किंमत खूपच मामुली आहे. अशा तऱ्हेने देशाच्या विविध १२ शहरांत (ज्यापैकी चार महाराष्ट्रांतील) पंधरा हजारांहून अधिक लघुव्यावसायिक आणि त्यांच्या ७ लाख ३३ हजार ग्राहकांचे जाळे स्पायडरजीने सध्या विणले आहे. महिन्याला साडेतीन ते चार लाख ई-बीजके स्पायडरजीद्वारे धाडली जातात आणि या उलाढालीचे सकल व्यापार मूल्य (जीएमव्ही) हे ६७ कोटी रुपये इतके आहे.

लघुव्यावसायिकांसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उलाढालीचे पहिले पाऊल ठरलेले स्पायडरजी आता त्यांच्यासाठी डिजिटल वित्तपुरवठय़ाचे व्यासपीठही बनले आहे. वेळेत वसुलीसह स्पायडरजीने लघुव्यावसायिकांच्या खेळत्या भांडवलाची चिंता संपुष्टात आणलीच आहे, तर पुढे जाऊन त्यांना व्यवसाय विस्तारासाठी लागणारे भांडवल तारणमुक्त कर्जरूपात मिळवून देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे, असे अश्वनी सांगतात. त्यासाठी जवळपास २० बँका आणि बँकेतर वित्तीय संस्थांशी बोलणी करून सामंजस्यही केले गेले. किंबहुना बँकांना स्पायडरजीमार्फत त्या व्यावसायिकांचा रोकडप्रवाह आणि आर्थिक पूर्वपीठिका आयती उपलब्ध करून दिली जाते. त्यांच्यासाठी कर्जवितरणाची प्रक्रिया व निर्णय गतिमान व सुलभ बनला आहे. इतकेच नव्हे तर या आपापले ग्राहक सांभाळून असलेल्या लघुव्यावसायिकांचे व्यापार ते व्यापार (बी टू बी) जाळे रचून या व्यावसायिकांचा सामाजिक अवकाश बनविण्याच्या शक्यताही अजमावून पाहिली जात आहे. अश्वनी सांगतात जसे, अँड्रॉइड किंवा फेसबुकसाठी विविध त्रयस्थ विकासक वेगवेगळे अ‍ॅप्स (अ‍ॅप्लिकेशन्स) तयार करून पुरवत असतात, तसेच स्पायडरजी व्यासपीठावर अन्य बडय़ा कंपन्या त्यावर कार्यरत व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून देऊ शकतील. प्रचंड मोठा ग्राहक आणि त्यांच्याशी दैनंदिन संपर्क ही या लघुव्यावसायिकांची मोठी ताकद असून तिचा वापर स्व-व्यवसायाव्यतिरिक्त अन्य अनेक प्रकारे करून त्याचा आर्थिक लाभही ते मिळवू शकतील, असे आपले व्यावसायिक गणित असल्याचे अश्वनी यांनी सांगितले.

आगामी वर्षभरात स्पायडरजीचे ५०,००० लघुव्यावसायिक ग्राहक, तर तीन वर्षांत हीच संख्या दीड लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट कंपनीने राखले आहे. पैसा हेच कोणत्याही कंपनीचे व्यावसायिक उद्दिष्ट असते. पण पैशापेक्षा अधिक काही मिळविण्याच्या ध्यासात, निरंतर नवनवीन माणसे जोडत जाण्याची ही उद्यम कर्तबगारी काही औरच आहे. ही माणसे हेच त्यांचे भांडवल आणि विशेष म्हणजे ती त्यांच्याबरोबर आहेत, नेहमीच असतील आणि उत्तरोत्तर वाढतही जाणार आहेत.

अश्वनी राठोड / हर्षल इंगळे

’ व्यवसाय -लघुव्यावसायिकांसाठी ई-बीजक अ‍ॅप

’ कार्यान्वयन : सन २०१५

’ मूळ गुंतवणूक  :  साधारण तीन कोटी रु.

’ सध्याची उलाढाल : सुमारे ६७  कोटी रु.

’ कर्मचारी संख्या  : २७  ’ कर्जभार : शून्य

’ डिजिटल अस्तित्व :  www.spiderg.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 1:01 am

Web Title: marathi udyogpati successful marathi industrialists zws 70
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलियोचा त्रमासिक आढावा
2 अर्थ वल्लभ : प्रचीतीविण अवघे व्यर्थ..
3 बंदा रुपया : देशाच्या सीमा ओलांडण्याची जिद्द!
Just Now!
X