News Flash

नावात काय : एमपीसी – वाढलेल्या उत्पन्नाच्या विनियोगाचे सूत्र

एमपीसी ही संकल्पना विख्यात अर्थतज्ज्ञ लॉर्ड केन्स यांनी मांडलेल्या सिद्धांतांमध्ये महत्त्वाची समजली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

एखाद्या व्यक्तीला पैसे मिळाल्यावर त्या पैशाचे तो काय करतो? याचे गणित मांडल्यास दोन प्रकारे त्या पैशाचा विनियोग होतो. त्यातील पहिला मार्ग म्हणजे, ती व्यक्ती पैसे खर्च करेल आणि दुसरा मार्ग पैसे खर्च न करता पैशाची बचत करेल. म्हणजेच उत्पन्न = खर्च + बचत असे सूत्र तयार होते. आता अशी कल्पना करा की, एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न वाढले तर तो वाढलेल्या उत्पन्नातून नक्की काय करेल? म्हणजेच वाढलेले उत्पन्न ती खर्च करण्यासाठी वापरेल? की बचतीसाठी वापरेल? याचा अंदाज लागल्यास आपल्याला लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती मोजता येते.

सोपे उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न १०,००० रुपये आहे आणि त्यातून ती व्यक्ती काही पैसे बचतीसाठी बाजूला काढून ठेवून उरलेले पैसे खर्चासाठी वापरते.

जर त्या व्यक्तीचे उत्पन्न वाढून १२,००० रुपये झाले तर वाढीव दोन हजार रुपयाचे ती व्यक्ती काय करेल? खर्च करेल? की बचत करेल?  यालाच अर्थशास्त्रीय परिभाषेत मार्जिनल प्रोपेंसिटी टू कन्झ्युम (Marginal Propensity to Consume) अर्थात एमपीसी म्हटले जाते, यात मार्जिनल म्हणजे वाढीव उत्पन्न, प्रोपेंसिटी म्हणजे क्षमता!
पुढील सूत्र एमपीसी कसे मोजतात हे दर्शवते –   

येथे  म्हणजे बदललेला खर्च आणि  म्हणजे वाढलेले उत्पन्न.

एमपीसी ही संकल्पना विख्यात अर्थतज्ज्ञ लॉर्ड केन्स यांनी मांडलेल्या सिद्धांतांमध्ये महत्त्वाची समजली जाते. अर्थव्यवस्थेचे चक्र जोमदारपणे फिरायचे असेल तर लोकांची खरेदी शक्ती हीच महत्त्वाची ऊर्जा ठरते हे यातून स्पष्ट होते. लोकांनी अधिकाधिक पैसे मिळवले आणि ते पैसे खर्च केले तर एकाचा खर्च म्हणजेच दुसऱ्याचे उत्पन्न या सोप्या सूत्रानुसार अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहतो. जर लोकांनी पैशाची बचत करण्याला प्राधान्य दिले तर तोच पैसा वित्तसंस्थांच्या मार्फत पुन्हा नवीन उद्योगांमध्ये गुंतवणुकीला उपलब्ध होतो.

सामान्यत: असे लक्षात येते की सधन राष्ट्रांमध्ये एमपीसीचा दर कमी असतो. म्हणजेच सधन व्यक्ती मिळालेल्या ज्यादा रकमेचा बचतीसाठी उपयोग करतात आणि ज्यांचे उत्पन्न मुळातच कमी असते त्यांचे उत्पन्न वाढल्यावर त्या वाढीव उत्पन्नातून ते आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच त्यांचा कल अधिक पैसे खर्च करण्याकडे असतो.

एमपीसीवर पुढील घटकांचा प्रभाव पडतो :उत्पन्नाची पातळी : जर एखाद्या देशातील लोकांची उत्पन्न पातळी सतत वाढती राहिली तर ते नेमके कोणत्या गोष्टीवर खर्च करतात, याचे गणित बदलते. म्हणजेच एकदा नित्य व्यवहारातील वस्तू विकत घेतल्या गेल्या की पुन्हा अधिक पैसे हाती आले तर थोडय़ाशा चैनीच्या वस्तू विकत घेण्याकडे लोकांचा ओढा वाढतो. या उलट सतत ज्या देशात उत्पन्न घटत असते तेथे लोकांची खरेदीची क्षमता व इच्छा दोन्ही प्रभावित होते.

अचानक वाढलेले उत्पन्न/ हाती आलेला पैसा : नोकरदार मंडळींकडे बोनसच्या रूपाने पैसे हाती आले तर खर्च करण्याची प्रवृत्ती दिसते. जर असे धनलाभ नियमितपणे होत राहिले तर लोकांना त्यांच्या खरेदीची आखणी करणेसुद्धा सोपे होते.

व्याजदर : जर गुंतवणुकीवरील व्याजदर आकर्षक असेल तर वाढलेल्या पैशातून खर्च न करता पैसे गुंतवण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसतो.

भविष्यकालीन अंदाज आणि विश्वास : आपल्याला मिळणारे उत्पन्न हे सतत मिळत राहणार आहे याबाबत खात्री नसेल तर मिळालेल्या पैशातून खर्च न करता चार पैसे गाठीला असावेत म्हणून बचत करण्याकडेसुद्धा ओढा दिसतो.

एमपीसी आणि धोरणे

जेव्हा अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली असते, अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी लोकांनी खर्च करणे आवश्यक असते. जेव्हा लोकांच्या हातात पैसा खेळता राहत नाही तेव्हा उत्पन्न व खर्च आणि खर्चातून पुन्हा उत्पन्न हे चक्र सुरू होत नाही, अशा वेळी सरकारला कंबर कसून भूमिका घ्यावी लागते, पावले उचलावी लागतात. सरकारी खर्च वाढवून जास्तीत जास्त पैसे लोकांपर्यंत कसे पोहोचतील आणि क्रयशक्ती कशी वाढेल अशी धोरणे शासनाकडून राबवली जाणे आवश्यक असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:01 am

Web Title: marginal propensity to consume zws 70
Next Stories
1 अर्थ वल्लभ : अस्थिरतेची धोक्याची घंटा
2 थेंबे थेंबे  तळे साचे : मल्टिकॅप फंड : प्रस्तावित बदलांच्या अनुषंगाने..
3 बंदा रुपया : ‘कधीही, कुठूनही’च्या सार्वत्रिकतेची गोष्ट!
Just Now!
X