03 March 2021

News Flash

कोणत्याही कालस्थितीतील ‘लार्ज कॅप’ सोबती!

मॅरिको लिमिटेड (बीएसई कोड - ५३१६४२)

|| अजय वाळिंबे

मॅरिको लिमिटेड (बीएसई कोड – ५३१६४२)

सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करायची का असा साहजिक प्रश्न कुणालाही पडला असणार? आणि हिय्या करून गुंतवणूक करायची तर नक्की कुठल्या क्षेत्रात आणि कधी करावी हा दुसरा प्रश्न. परंतु जे जुने जाणकार गुंतवणूकदार असतील त्यांना अशा अनेक चढ-उतारांची सवय असेलच आणि २००८ ची वेळ तर नक्कीच आठवत असेल. त्या वेळी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली त्यांना प्रचंड फायदा झाला. अर्थात निर्देशांक अजून किती खाली जाणार याचा अंदाज जितका कठीण आहे तितकेच शेअर बाजाराचा तळ शोधणे कठीण आहे. म्हणूनच गेल्या काही लेखांत सातत्याने सांगितल्याप्रमाणे सर्व खरेदी एकाच वेळी न करता काही टप्प्यांत करावी. पडत्या बाजारात संयमच तुम्हाला तरू शकतो.

कुठल्याही मंदीच्या काळात तारणारे शेअर्स म्हणजे एफएमसीजी आणि फार्मा कंपन्यांचे शेअर्स. गेली अनेक वर्षे सातत्याने भारतीय जीवनशैली आणि राहणीमान ज्याप्रमाणे उंचावत गेली आहे त्याचप्रमाणे एफएमसीजी कंपन्यांची कामगिरी उत्तरोत्तर सुधारत गेली आहे. परदेशी कंपन्यांप्रमाणेच भारतीय कंपन्यादेखील यात मागे नाहीत. आज सुचविलेली मॅरिको इंडस्ट्रीज लिमिटेड ही अशीच एक आघाडीची भारतीय एफएमसीजी कंपनी आहे. सौंदर्य आणि आरोग्य अशा दोन महत्त्वाच्या क्षेत्रात मॅरिको आघाडीवर असून कंपनीने अनेक ब्रॅण्ड विकसित केले आहेत. भारतीय बाजारपेठेत केस, त्वचा, आरोग्य, खाद्यतेल अशा अनेक उपयोगी क्षेत्रात कंपनीने आपले पाय घट्ट रोवले आहेत. आज पॅराशूट, पॅराशूट अ‍ॅडव्हान्स, सफोला, हेअर अँड केअर, निहार, निहार नॅचरल, सफोला मसाला ओट्स, मेडीकेअर, रिव्हाइव्ह, वेट सेट, इ. अनेक ब्रॅण्ड भारतीय ग्राहकांच्या मनात घर करून बसले आहेत. याखेरीज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही जवळपास २५ देशांत कंपनीची उत्पादने उपलब्ध असून यांत प्रामुख्याने पॅराशूट, हक्र्युलस, ब्लॅक चिक, कोड १०, एक्स मेन, आयसोप्लस, थूआन फॅट, इ. ब्रॅण्डचा समावेश करता येईल. नोटबंदी आणि जीएसटी यांचे नकारात्मक परिणाम आता ओसरू लागले असून कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत उलाढालीत १२.४ टक्के वाढ साध्य केली आहे. सफोला मसाला ओट्सने भारतीय बाजारपेठेतील ६९ टक्के हिस्सा काबीज केला असून केश तेल आणि पुरुष सौंदर्य प्रसाधनांची मोठी बाजारपेठ कंपनी लवकरच ताब्यात घेईल. भारतीय बाजारपेठेतील कंपनीचे ब्रॅण्ड व तिच्या उत्पादनांचे स्थान पाहता आगामी कालावधीतही कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी आशा आहे. जून २०१८ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने १,६८४.६१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २१४.९२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत तो ९ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे सप्टेंबर २०१८ तिमाहीचे निकाल असेच असतील अशी अपेक्षा आहे. सातत्याने उत्तम कामगिरी करून बोनस तसेच घसघशीत लाभांश देणारी ही कंपनी कुठल्याही काळात तुमच्या पोर्टफोलिओला तरू शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 12:53 am

Web Title: marico limited bse code 531642
Next Stories
1 चढ-उताराच्या छायेत
2 मंदी किती दाहक..
3 कापूस घसरला हमीभावाखाली!
Just Now!
X