|| अजय वाळिंबे

मॅरिको लिमिटेड

मंदीच्या काळात तारणारे शेअर्स म्हणजे एफएमसीजी आणि फार्मा कंपन्यांचे शेअर्स. गेली अनेक वर्षे सातत्याने भारतीय जीवनशैली आणि राहणीमान ज्याप्रमाणे उंचावत गेली आहे त्याचप्रमाणे एफएमसीजी कंपन्यांची कामगिरी उत्तरोत्तर सुधारत गेली आहे. परदेशी कंपन्यांप्रमाणेच भारतीय कंपन्यादेखील यात मागे नाहीत. आज सुचविलेली मॅरिको इंडस्ट्रीज लिमिटेड ही अशीच एक आघाडीची भारतीय एफएमसीजी कंपनी आहे. सौंदर्य आणि आरोग्य अशा दोन महत्त्वाच्या क्षेत्रात मॅरिको आघाडीवर असून कंपनीने अनेक ब्रँड विकसित केले आहेत. भारतीय बाजारपेठेत केस, त्वचा, आरोग्य, खाद्यतेल अशा अनेक उपयोगी क्षेत्रात कंपनीने आपले पाय घट्ट रोवले आहेत. आज पॅराशूट, पॅराशूट अ‍ॅडव्हान्स, सफोला, हेअर अँड केयर, निहार, निहार नॅचरल, सफोला मसाला ओट्स, मेडिकेयर, रिवाईव्ह, वेट सेट इत्यादी अनेक ब्रँड भारतीय ग्राहकांच्या मनात घर करून बसले आहेत. या खेरीज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही जवळपास २५ देशांत कंपनीची उत्पादने उपलब्ध असून यात प्रामुख्याने पॅराशूट, हक्र्युलीस, ब्लॅक चिक, कोड १०, एक्स मेन, आयसोप्लस, थूआन फॅट इ. ब्रॅँड्सचा समावेश करता येईल. सफोला मसाला ओट्सने भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक ७५ टक्के हिस्सा काबीज केला असून कंपनीने नुकतेच सफोला परफेक्ट नाश्ता नावाने रेडी टू इट पाकिटे बाजारपेठेत आणली आहेत. भारतीय बाजारपेठेतील कंपनीचे ब्रँड व तिच्या उत्पादनांचे स्थान पाहता आगामी कालावधीतही कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी आशा आहे. मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने १,२९० कोटी रुपये (७% वाढ) रुपयांच्या उलाढालीवर ४३० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तर सध्याच्या मंदीच्या वातावरणातदेखील कंपनीने जून २०१९ साठीच्या पहिल्या तिमाहीत २,१९४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३१५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत तो २६ टक्क्यांनी जास्त आहे. आगामी कालावधीतदेखील कंपनीची कामगिरी समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे.

सध्याची शेअर बाजाराची परिस्थिती पाहता गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली हा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यामुळे या स्तंभातून सुचविलेले शेअर्स कदाचित अजूनही स्वस्तात मिळू शकतात हे ध्यानात ठेवून मगच गुंतवणुकीचा विचार करावा. तांत्रिक विश्लेषणदेखील खरेदीची योग्य वेळ शोधायला मदत करू शकते.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.