मावळत्या २०१२ सालाची सुरुवात आपण कशी केली ते आठवून पाहा. शेअर बाजारातील वातावरण अत्यंत निरुत्साही होते. २०११ ची अखेर सेन्सेक्स व निफ्टीने त्या सालातील नीचांक स्तरावर केली असल्याने २०१२ सालातील प्रवासाबद्दल अनेक विश्लेषक साशंकता व्यक्त करीत होते. अशातच २ जानेवारी २०१२चा दिवस उजाडला. शेअर बाजाराच्या वर्षांतील पहिल्या व्यवहार सत्राची सुरुवात निफ्टी निर्देशांकाने ४६४० अंशांवर केली. पण ताबडतोबीने निर्देशांकाने ४६०० ची पातळीही तोडल्याने बाजारात थरकाप निर्माण केला. तथापि दुपारची ३.३० ची अखेरची घंटा होण्यापूर्वी निर्देशांक सावरला. तांत्रिक आलेखावर मात्र त्याने लांब पायांची ‘दोजी’ मेणबत्ती रचना तयार केली. परिणामी लगेच दुसऱ्या दिवशी निर्देशांकाने ‘मोरूबोझू’ हरित मेणबत्ती रचना दाखवून २०१२ साल तेजीला हात देणारा असल्याचा संकेत दिला. प्रत्यक्षात मावळत्या वर्षांत जानेवारीमध्ये ४६४० पासून निफ्टीच्या प्रवास डिसेंबरमध्ये ५९६५ चा चढ सर करणारा दिसून आला. तब्बल १३०० हून अधिक अंशांची ही चढण म्हणजे घसघशीत २५ टक्क्यांचा परतावा ठरतो. या प्रवासात जरी अनेक चढ-उतार दिसून आले असले तरी प्रामुख्याने वर्षांच्या उत्तरार्धात सुदृढ दुरुस्ती आणि सशक्त तेजीसह निर्देशांकाच्या दमदार वाटचालीचा राहिला. मावळत्या वर्षांच्या चांगल्या स्मृतींसह आपण भविष्याबाबत मोठय़ा अपेक्षांसह २०१३ सालात प्रवेश करीत आहोत. २०१२ च्या नेमकी उलट स्थिती आज बाजाराची आहे. तरी सार्वत्रिक मनोदशेनुसार मत बनविण्यापेक्षा थोडे व्यवहारीक अंगाने म्हणजे ऐतिहासिक भाव गतीच्या दृष्टीने आपण स्थितीकडे पाहू या. निफ्टी निर्देशांक दमदार तेजीच्या दिशेने अग्रेसर असे आज नि:संशय म्हणता येईल. तरीही ५९०० ते ६००० हा टप्पा बाजाराचा आगामी कलनिश्चितीसाठी महत्त्वाचा आणि अवघड टप्पा राहील. तांत्रिक विश्लेषण हे गुंतागुंतीचे शास्त्र आहे आणि त्यामुळेच ते बऱ्याचदा बोजड बनते. हे लक्षात घेऊन वाचक मला क्षमा करतील. या वर्षांतील विरामाच्या स्तंभात म्हणूनच ‘फिस्कल क्लिफ’, मनमोहनसिंग सरकारची आर्थिक सुधारणांची कास वगैरे गोष्टी मुद्दामहून बाजूला ठेऊन, केवळ ऐतिहासिक भाव गती या मुद्दय़ाभोवती लक्ष केंद्रीत करावेसे वाटते.
सोबत दिलेल्या आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास, नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे निफ्टी निर्देशांकाने सप्टेंबर २००९ ते सप्टेंबर २०१० या दरम्यान तांत्रिक आलेखाने आखून दिलेल्या नेमक्या प्रवाह रेषेत वाटचाल केली. सप्टेंबर २०१० मात्र त्याने ही अडथळा रेषा पार करून तेजीकडे निर्णायक कूच केली. पण पूर्वीचीच अडथळा रेषा ही पुढे जाऊन आधार रेषा बनल्याचे नोव्हेंबर २०१० मध्ये निर्देशांक कोसळला तेव्हा दाखवून दिले. त्यामुळे निर्देशांकाला मग ६,३३६ या सार्वकालिक उच्चांकापर्यंत मजल मारणे शक्य झाले. त्यानंतर पुन्हा एप्रिल २०११ मध्ये तीच प्रवाह रेषा निर्देशांकासाठी मोठा अडसर बनून गेली. संपूर्ण २०११-१२ वर्षांत ही २००९-१० मधील आधार रेषा निर्देशांकासाठी कमालीचा अडथळा बनून गेल्याचे आपण पाहिले. २०१२ सालाच्या प्रारंभी निफ्टी निर्देशांकाने निसरडय़ा प्रवाहाला भेदून ५२०० च्या पल्याड मजल मारली. पण फेब्रुवारी २०१२ मध्ये पुन्हा ती आधीची आधार रेषा पर्वत बनून आडवी आली. तर जून २०१२ मध्ये निर्देशांकाच्या दुरुस्ती टप्प्यात ही निसरडय़ा प्रवाहाची अडसर रेषाच जीवनदायी आधार बनून गेली. अशा ऐतिहासिक भाव गतीच्या आधार जर प्रमाण मानायचा तर निफ्टी निर्देशांक पुढे जाऊन ५९४० ते ६००० अंशांदरम्यान गंटागळ्या खाताना दिसेल असे आज बेधडक सांगता येईल. डिसेंबर २०१२ मध्येच त्याचा प्रत्ययही त्याने दिला आहे. त्यामुळे सध्याच्या तेजीच्या अखंड प्रवासासाठी ५९४० ते ६००० हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. निर्देशांकाने ५९४० पल्याड जाऊन तेथे काही काळ तग धरल्यास तेजी अविरत असल्याचे म्हणता येईल. ही ५९४० पातळी म्हणजे नजीकच्या इतिहासातील निफ्टीच्या ६३३६ ते ४५३१ पर्यंत घसरणीच्या ‘फिबोनाकी रिट्रेसमेंट’ पातळीचा ७६.४ टक्के टप्पा ठरतो. इतिहास साक्ष देतो की, र्रिटेसमेंटचा ७६.४ टक्के टप्पा हा कलाटणीचा टप्पा असतो. त्यात जर अपयश आले तर मात्र पुन्हा निसरडय़ा प्रवाहात घुटमळणे आणि ५४५० पर्यंत गंटागळ्या खाणे क्रमप्राप्तच दिसते. ५४५० पातळीपासून मग काहीशी ऊर्जा मिळवून उसळीची प्रतीक्षा करणे गुंतवणूकदारांच्या हाती राहील. जाता जाता एक सावध इशारा हा ही की, बहुतांश तज्ज्ञ विश्लेषक २०१३ साल हे नवीन उच्चांकाचे राहील असा कयास व्यक्त करीत आहेत. पण शेअर बाजाराच्या बहुतांशाच्या मतप्रणालीला चुकीचे ठरविणारा चकवा दिल्याचे अनेक दाखले इतिहासात दिले आहेत, हेही विसरून चालणार नाही. २०१३ साल अपवादाचे ठरावे असा आशावाद मात्र असू द्यावा.