सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षांच्या जॅक्सन होल परिषदेतील भाषणातून, अर्थप्रोत्साहनात तूर्तास कपात न करता व्याजदर वाढविण्याबाबत सबुरीने पावले उचलण्याचा त्यांचा विचार दिसला. त्यांच्या या दिलासादायक भाष्याची सकारात्मक प्रतिक्रिया जगातील सर्वच बाजारांत उमटली. त्यामुळे गेल्या सप्ताहात भारतीय बाजाराची सुरुवात मोठी उसळी घेऊन झाली. या दिलासादायक बातमीला जोड मिळाली भारताच्या विकासदरात पहिल्या तिमाहीतील २०.१ टक्के वाढीच्या बातमीची. परिणामी पहिल्या दोन दिवसांत बाजाराचे प्रमुख निर्देशांक अडीच टक्क्य़ांनी वधारले होते. बुधवारच्या विश्रांतीनंतर बाजाराने परत एकदा विक्रमी दौड करत सेन्सेक्सने ५८ हजार तर निफ्टीने १७,३०० चा पल्ला वेगाने पार केला. एका सप्ताहात हे निर्देशांक साडेतीन टक्क्य़ांनी तर मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे पाच व चार टक्क्य़ांनी वर गेले.

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अमेरिका नवी योजना आणत आहे. ज्यामुळे मोठय़ा ट्रकच्या व बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांच्या मागणीत वाढ होऊन त्याचा फायदा भारत फोर्जला होईल. कंपनी अवजड वाहनांना लागणारे फोर्जिंगचे भाग बनविते. कंपनीच्या जूनअखेरच्या तिमाहीतील निर्यातीत २५ टक्के वाढ झाली होती. नव्याने बाजारात येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना लागणारे हलक्या वजनाचे फोर्जिंगचे भाग बनविण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग गेले सात आठवडे सतत वर जात असल्यामुळे त्यामध्ये खरेदीची संधी मिळत नाही. पण या आठवडय़ात जर थोडी घसरण आली तर त्यातील माइंड ट्रीसारखे समभाग खरेदी करण्यासाठी उत्तम संधी आहे. कंपनीच्या हातात मजबूत कंत्राटे आहेत. घरून काम करण्यामुळे व्यवस्थापन खर्चही आटोक्यात आहे. लार्सन अँड टुब्रोच्या अधिपत्यामुळे व्यावसायिक व्यवस्थापकीय पाठबळ आहे. २०२१ सालात आतापर्यंत दुप्पट झालेला समभाग अजूनही घसरणीच्या दिवशी खरेदीसाठी पात्र आहे.

एचडीएफसी लाईफने एक्साइडचा जीवन विमा व्यवसाय विकत घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ६,६८७ कोटी रुपये मूल्य कंपनी देणार आहे. त्यामधे फक्त १२ टक्के रोख व बाकी नवीन समभागाच्या स्वरूपात द्यायचे आहेत. एक्साइड लाइफचे १० लाख ग्राहक व दक्षिण भारतातील व दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील शहरांचा व्यवसाय एचडीएफसी लाईफला मिळेल. एचडीएफसी लाईफसाठी हा लाभदायक व्यवहार आहे.

टाळेबंदीमधे शिथिलता आल्यावर बर्गर किंगची सर्व दुकाने पूर्ववत सुरू झाली आहेतच पण पुढील दोन वर्षांत दुकानांची संख्या २६५ वरून ४७० पर्यंत नेण्याच्या योजनेला वेग आला आहे. कंपनी स्वत:चे अ‍ॅप लोकप्रिय करीत आहे. बर्गर किंगने याच व्यवसायातील इंडोनेशियामधील कंपनी विकत घेतली आहे. त्यामुळे आणखी एका मोठय़ा लोकसंख्येच्या देशात बर्गर किंगचा व्यवसाय सुरू होईल जेथे ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील वयाची आहे. या अधिग्रहणानंतर कंपनीच्या दुकानांची संख्या जवळपास दुप्पट होईल व त्यासाठी लागणारे भांडवल सध्याच्या २५ टक्केच असेल. मागील वर्षी प्राथमिक भागविक्रीनंतर सूचिबद्ध झाल्यापासून कंपनीचे समभाग २५ टक्के खाली आले आहेत. पुढील दोन वर्षांच्या मुदतीसाठी ही गुंतवणुकीची चांगली संधी आहे.

मिंडा कॉर्पोरेशन ही वाहनांचे विविध सुटे भाग बनविणारी कंपनी आहे. वाहनांच्या सुरक्षा प्रणालीशी संबंधित अनेक इलेक्ट्रॉनिक व प्लास्टिकचे भाग कंपनी तयार करते. दुचाकी, तीनचाकी व अवजड वाहनांसाठी लागणाऱ्या भागांची ही कंपनी मोठी पुरवठादार आहे. विक्रीत निर्यातीचा हिस्सा २० टक्के आहे. कंपनीच्या जूनअखेरच्या तिमाहीत विक्रीत २०० टक्के तर नफ्यात १०० टक्के वाढ झाली होती. सध्याच्या भावातील गुंतवणूक एक दोन वर्षांत चांगला फायदा मिळवून देईल अशी अपेक्षा आहे.

जुलै महिन्यात जीएसटी संकलन पुन्हा एकदा एक लाख कोटींवर गेले आहे. ई-वे बिलांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारच्या तिजोरीवरील भार त्यामुळे काहीसा कमी होईल. बाजाराच्या नजीकच्या वाटचालीसाठी ही चांगली बातमी आहे. फेडरल रिझव्‍‌र्ह टप्प्याटप्प्याने रोखे खरेदी कमी करेल पण व्याजाचे दर काही काळानंतर वाढवेल. त्याबाबत पुरेशी पूर्वसूचना बाजाराला मिळाली आहे. २०१३ मध्ये अशा परिस्थितीत विकसनशील देशांतून परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा जोर वाढला, त्या देशांच्या चलनाच्या किमती घसरल्या व बाजार मोठय़ा पडझडीला सामोरा गेला. यावेळी भारताची अर्थव्यवस्था जास्त मजबूत आहे. जुलै महिन्यापर्यंत वित्तीय तुटीचे प्रमाण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या केवळ २१.३ टक्के आहे. परकीय चलनाची गंगाजळी भरभक्कम आहे. त्यामुळे बाजारावर अचानक आपत्तीजनक परिस्थिती येणार नाही. बाजारावर परिणाम करणारी बरीचशी आकडेवारी आता जाहीर झाली आहे. गेली पाच वर्षे सरासरीने सप्टेंबर महिना बाजारासाठी नरमाईचा ठरला आहे. त्याचीच पुनरावृत्ती झाली तर खरेदीची संधी येईल.