स्वास्थ्य विमा आणि गुंतवणूक हे समीकरण कुठे तरी खटकते. ज्या ठिकाणी परतावा नाही ती गुंतवणूक कशी काय होऊ शकते? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. खरे तर ही एक वेगळ्या प्रकारची ोुंतवणूक आहे आणि आजघडीला फार कमी लोकांना त्याची कल्पना आहे.  
आपल्या देशात फक्त १२ टक्के जनता कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्वास्थ्य विम्यामध्ये पसे गुंतविते. प्रगत देशांच्या तुलनेत ही टक्केवारी फारच कमी आहे. याचे प्रमुख कारण आहे बहुतांशी लोकांची मानसिकता. प्युअर टर्म विमा पॉलिसीच्या बाबतीत विमा इच्छुकांना असे वाटत असते की, मी पॉलिसीची पूर्ण टर्म तरून जाणार आहे. त्यामुळे प्रीमियमपोटी भरणा केलेली पूर्ण रक्कम वाया जाणार आहे. तोच प्रकार स्वास्थ्य विमा (मेडिक्लेमच्या) बाबतीतही आढळतो. प्रत्येकाला वाटत असते की मी सुदृढ आहे (प्रत्यक्षात- ‘मला काय धाड भरली आहे?’) त्यामुळे कोणताही आजार माझ्या जवळपासही फिरकणार नाही आणि क्लेम करण्याजोगी परिस्थिती न उद्भवल्यामुळे साहजिकच प्रीमियमपोटी जमा केलेले पसे वाया जाणार आहेत. काही लोकांना वाटते की, प्रीमियमचे पसे वाचवून त्याची योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर हॉस्पिटलची बिले आपसूकच भरता येतील. काही प्रमाणात ते रास्तही आहे. परंतु किती वेळा? हा विचार केला जात नाही. समजा पुढल्याच वर्षी हॉस्पिटलची गरज पडली तर काय? कोणताही आजार अपॉइन्टमेंट घेऊन येत नाही आणि तो बरा होण्यास जास्त काळ लोटला तर पूर्ण घराची अर्थव्यवस्था कोलमडून पडते. वरचेवर क्लेम केले तर विमा कंपनी पॉलिसीचे नूतनीकरण करीत नाही अशा भ्रमातही काही जण असतात. ‘आयआरडीए’च्या नियमानुसार कोणतीही विमा कंपनी अशा प्रकारची मनमानी करू शकत नाही.
स्वास्थ्य विम्यामध्ये थेट परतावा हा प्रकार नसल्याने अनेक जण त्याबाबतीत चालढकल करीत असतात. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर मेडिक्लेम ही पॉलिसी हा गुंतवणुकीचा पर्याय नाही. परंतु भविष्यात (जवळपास नक्कीच) उद्भवणाऱ्या स्वत:च्या किंवा कुटुंबीयांच्या आजारपणाच्या खर्चाचा सामना करण्यासाठी हे एक मोलाचे अस्त्र आहे. सध्याची जीवनशैली अशी झाली आहे की कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या तब्येतीविषयक समस्या सुरू असतातच. आयुष्याची गती वाढली आहे, समस्या वाढल्या आहेत, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. पोळी-भाजीची जागा पिझ्झा आणि बर्गरने घेतली आहे. व्यायामासारख्या बोअिरग प्रकारात वेळ घालविण्यापेक्षा तरुण वर्ग मोबाइलवरचे गेम्स खेळणे जास्त पसंत करू लागला आहे. त्यामुळे चाळिशी उलटली की प्रकृतीच्या छोटय़ा-मोठय़ा तक्रारी सुरू होतात. त्यावर तात्पुरते उपचार केले जातात, परंतु लाइफस्टाइल बदलली जात नाही. परिणामत: ४५ ते ५०च्या दरम्यान गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवण्याची शक्यता वाढते.

इंग्लंडमधील मॅकमिलन या संस्थेमधील आकडेवारीनुसार त्या देशात दरवर्षी सुमारे ३ लाख लोकांना कॅन्सर होतो. त्यापकी ७५ टक्के हे साठीच्या वरचे आणि १० टक्के २५ ते ४९ दरम्यानच्या वयांमधील असतात. त्यांच्या अंदाजानुसार सुमारे ३३ टक्के जनतेला आयुष्यात कधी ना कधी कॅन्सर होण्याची शक्यता आहे. सुमारे २५ टक्के जनतेला साठीच्या अगोदर हृदयविकार होण्याची शक्यता आहे आणि सुमारे पाच टक् के लोकांना सत्तरी अगोदर अर्धागवायू संभावतो.
हॉस्पिटलच्या खर्चामधील भाववाढ ही सामान्य माणसाच्या आकलनापलीकडची आहे. (शस्त्रक्रियेच्या बाबतचा आजचा खर्च आणि भविष्यातील अंदाजे खर्च सोबतच्या तक्त्यामध्ये दिला आहे.)
एका सर्वसाधारण व्यक्तीबरोबर याबाबत चर्चा करताना एक अतिशय उद्बोधक अशी विचारसरणी ध्यानात आली. गेली २० वष्रे ती व्यक्ती स्वास्थ्य विम्याचे पसे भरते आहे आणि आजवर एक दमडीचाही ‘क्लेम’ तिने केलेला नाही. तिच्या म्हणण्याप्रमाणे ‘‘माझे पसे कोणाच्या तरी कामास येतात त्याच्या आशीर्वादामुळे माझ्या कुटुंबाला आजारपणातून मुक्ती मिळते.’’ आयुर्विम्याच्या बाबतीत जो फंडा आहे – ‘समाजातील काही व्यक्तींच्या आपत्कालीन मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेकांनी (विमाधारकांनी) एकत्रितपणे केलेले अंशदान,’  तोच इथे लागू पडतो. फक्त संकटाचा प्रकार वेगळा आहे.
भविष्यातील अनपेक्षित खर्चाची आगाऊ तरतूद करायची असेल तर स्वास्थ्य विम्याला पर्याय नाही.
(लेखातील तपशील विमा कंपन्यांच्या वेबस्थळांवर उपलब्ध माहितीच्या आधारे)