21 November 2019

News Flash

व्यावसायिक वाढीचा सुस्पष्ट भविष्यपट

मेट्रोपोलीस हेल्थकेअर लि. (बीएसई कोड - ५४२६५०)

|| अजय वाळिंबे

मेट्रोपोलीस हेल्थकेअर लि. (बीएसई कोड – ५४२६५०)

यंदाच्या नवीन आर्थिक वर्षांतील एक गुंतवणूकयोग्य ‘आयपीओ’ म्हणून मेट्रोपोलीस हेल्थकेअरचे नाव घ्यावे लागेल. अर्थात अपेक्षेप्रमाणे या ‘आयपीओ’ला उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु ८८० रुपयांना दिलेला हा शेअर गुंतवणूकदारांना विशेष फायद्याचा ठरला नाही. कारण हा शेअर बाजारात सूचिबद्ध होऊन दोन महिने झाले तरीही बाजारभाव मात्र हजार रुपयांच्या आसपास राहिला आहे. कदाचित ‘आयपीओ’मधील चढे किंमत निर्धारण (अग्रेसिव्ह प्राईसिंग) याला करणीभूत असावे.

डॉ. सुशील शाह यांनी १९८१ मध्ये मेट्रोपोलीसची स्थापना केली. गेल्या २८ वर्षांत ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची डायग्नोस्टिक कंपनी झाली आहे. भारतातील १८ राज्यातील २१० शहरांत कंपनीचे जाळे विस्तारले असून ११९ प्रयोगशाळा असलेल्या या कंपनीकडे सध्या २०१ डॉक्टर्स आणि २,२२८ कुशल कर्मचारी कार्यरत आहेत.

कंपंनीने आखलेल्या स्ट्रॅटजीप्रमाणे, आठ प्रमुख शहरातून कंपनी ‘बी२सी’ व्यवसाय करते तर एकूण उत्पन्नाच्या सुमारे ५८.६१ टक्के उत्पन्न हे मुंबई, पुणे, सूरत, चेन्नई आणि बंगळुरू या पांच शहरातून येते. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीचे प्रति रुग्ण चाचणी उत्पन्न ४०२ रुपयांवरून ४४७ रुपयांवर गेले आहे. कंपनीने मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी ५८१.२१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०१.४६ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. व्यवस्थापनाच्या अंदाजाप्रमाणे आगामी तीन वर्षांच्या कालावधीत व्यवसायात वार्षकि २० टक्के वाढ अपेक्षित असून कंपनी हे उद्दिष्ट सहज साध्य करेल. सध्या ९०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून फायद्याचा ठरू शकतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on June 17, 2019 12:06 am

Web Title: metropolis healthcare ltd bse code 542650
Just Now!
X