मिरॅ असेट हेल्थकेअर फंड आजपासून गुंतवणुकीस खुला होत आहे. या फंडाच्या ‘एनएफओ’मध्ये २६ जून २०१८ पर्यंत गुंतवणूक करता येईल. दहा दिवसानंतर हा फंड नियमित गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा फंड औषध निर्माण, रोग निदानपूर्व चाचण्या, रुग्णालये, आरोग्य विमा, वैद्यकीय उपकरणे निर्माते आणि पुरवठादार (आयातदार) यांच्याशी संबंधित व्यवसायातून गुंतवणूक करेल. या उद्योगांपैकी औषधनिर्मिती उद्योगाची वार्षिक १ लाख कोटींची उलाढाल आहे. रुग्णालये २.५ लाख कोटी, निदानपूर्व चाचण्या ४३ हजार कोटी, आरोग्यविमा उद्योगाच्या विमा हप्ता २२ हजार कोटी आणि वैद्यकीय उपकरणे आयात आणि निर्माती ही ५३ हजार कोटींची बाजारपेठ आहे. आरोग्य निगा क्षेत्र हा नियंत्रित उद्योग असल्याने, नव्याने पदार्पण करण्यास अत्यंत कठीण उद्योग क्षेत्र मानले जात असले तरी या आरोग्य निगा क्षेत्राच्या काही घटकांच्या नफ्याचे प्रमाण उत्तम आहे.

रुग्णालये हा व्यवसाय भारतात अत्यंत किफायतशीर आहे. रुग्णालय चालविणे हा व्यवसाय अंबानी बंधूंपासून ते मागील आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील टाइम हॉस्पिटलचे प्रवर्तक खासदार नारायण राणे यांच्यासारख्या राजकारण्यांना हा व्यवसाय प्रिय आहे. फोर्टिस हेल्थकेअरच्या अधिग्रहणाच्या निमित्ताने पंचतारांकित रुग्णालयाच्या प्रति खाट असलेल्या नफ्याचे पुढे आलेले प्रमाणही हा व्यवसाय सर्वाना का प्रिय आहे ते स्पष्ट करते. रुग्णसेवा वगैरे सर्व झूट आहे. रुग्ण सेवेच्या बुरख्याखाली या व्यवसायातील भरघोस नफ्याचे प्रमाण हे भारतात तारांकित रुग्णालयाची उभारणी करण्यास अनेक मंडळींना उद्युक्त करीत आहे. भारतात प्रति एक हजार लोकसंख्येमागे ०.७ खाट हे प्रमाण असून जागतिक सरासरी प्रति हजारी ३० खाटा असे आहे. आरोग्य विम्याबाबत येत असलेली सजगता आणि प्रस्तावित ‘आयुष्मान भारत’सारखी सामाजिक आरोग्य विमा योजनेमुळे आजपर्यंत आवाक्याबाहेर असलेले वैद्यकीय उपचार जनसामन्यांच्या आवाक्यात येत आहेत. भारतात ७० टक्के वाटा खासगी मालकीच्या रुग्णालयांचा असून या रुग्णालयालातील उपलब्ध खाटांचे प्रमाण ६३ टक्के आहे.

डॉ. लाल पॅथलॅब, थायरोकेअर सारख्या निदानपूर्व चाचण्यांच्या व्यवसायात असलेल्या कंपन्यांचा वृद्धीदर अचंबित करणारा आहे. अल्ट्रा सोनोग्राफी, रक्तचाचणी, ब्लड काऊंट, कोलोनोस्कोपी, लिव्हर फंक्शन टेस्ट, टोमोग्राफी यासारख्या निदानपूर्व आणि निदाननिश्चिती करणाऱ्या उपचारांचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. या व्यवसायातील ८५ टक्के बाजारपेठ ही असंघटित क्षेत्राकडे असून व्यवसाय विस्तारासाठी व्यवसायिकांना संघटित क्षेत्रामार्फत व्यवसाय करणे भाग आहे.

भारतातील औषधनिर्मिती क्षेत्रासाठी मागील आठवडय़ातील घडामोडी काही सांगावा घेऊन आल्या. याचे पडसाद औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या बाजारभावात उमटताना दिसले. यूएसएफडीएने (अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन) सन फार्माच्या गुजरात राज्यातील हलोल प्रकल्पाचा दर्जा व्हीएआय (व्हॉलंटरी अ‍ॅक्शन इंडिकेटेड) असा निश्चित केला. याचा अर्थ प्रकल्पाचा औषधनिर्मिती दर्जा समाधानकारक असून या प्रकल्पात तयार झालेली औषधे अमेरिकेत निर्यातक्षम आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये या प्रकल्पाला यूएसएफडीएने ‘ओएआय’ (ऑफिशियली अ‍ॅक्शन इंडिकेटेड) ही नोटीस दिली होती. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या औषधांची अमेरिकेला बंद असलेली निर्यात व्हीएआयमुळे काही औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रुजू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे केवळ सन फार्माच्या बाबतीत घडले असे नाही तर येत्या कालावधीत किमान १० ते १५ कंपन्यांची बंद झालेली निर्यात सुकर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील चार वर्षांत औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झाली आहे. निफ्टीमध्ये आरोग्य निगा क्षेत्राचा प्रभाव ७ टक्के आहे. सर्वसाधारणपणे ज्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडाचा निर्देशांक निफ्टी आहे असे फंड ७ ते १० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक आरोग्य निगा क्षेत्रात करतात. प्रत्यक्षात आज निफ्टीतील आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांचे निफ्टीतील बाजारमूल्य २ टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. परिणामी आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची किंमत नवीन गुंतवणुकीसाठी आकर्षक पातळीवर आली आहे. तीन ते पाच वर्षांसाठी या फंडात गुंतवणूक कंल्यास आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जोखिमांकाचा विचार करून या फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय करावा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)