|| वसंत माधव कुळकर्णी

मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर फंड

शुद्ध विमा, ईएलएसएस फंड आणि अतिरिक्त ५० हजार रुपये ‘एनपीएस’मधील गुंतवणूक ही करबचतीची त्रिसूत्री आहे. आयकराच्या कलम ८० (सी) खाली उपलब्ध पर्यायांपैकी ईएलएसएस फंड या गुंतवणूक साधनाने सर्वाधिक परतावा दिला आहे.

मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर फंड हा ईएलएसएस फंड गटातील नवखा परंतु उत्तम परतावा असलेला फंड आहे. ज्या कोणी तीन वर्षांपूर्वी फंडाच्या पहिल्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.५ लाखाची गुंतवणूक केली असेल त्यांच्या गुंतवणुकीचे १९ डिसेंबर २०१८ च्या एनएव्हीनुसार २.५२ लाख रुपये झाले आहेत. येत्या शुक्रवारी २८ डिसेंबर रोजी तीन वर्षे पुरी करत आहे. फंडाने सुरुवातीपासून १६.९२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. नीलेश सुराणा हे फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या ३० नोव्हेंबरच्या ‘फॅक्टशीट’नुसार फंडाची मालमत्ता १,२०९ कोटी आहे. बँकेचे किंवा औद्योगिक घराण्याचे प्रवर्तन नसूनही फंडाला तीन वर्षे पुरी होण्याआधी फंडाने १ हजार कोटींच्या मालमत्तेचा टप्पा पार करणे हे विशेषच.

आयकराच्या कलम ८० (सी) खाली उपलब्ध पर्यायांपैकी ईएलएसएस फंड या गुंतवणूक साधनाने सर्वाधिक परतावा दिला आहे. मागील दहा वर्षांत ईएलएसएस फंडांनी करबचतीव्यतिरिक्त वार्षिक १८.३४ टक्के वृद्धी दर राखला आहे. ५ वर्षे मुदतीच्या कर-कपातप्राप्त मुदत ठेवींनी वार्षिक परतावा ५.३२ टक्के, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणुकीतून वार्षिक परतावा ८.७८ टक्के, तर पारंपरिक विमा पॉलिसीतील गुंतवणुकीतून विमाछत्राव्यतिरिक्त वार्षिक परतावा ५.३२ टक्के मिळाला आहे. कर बचतीव्यतिरिक्त संपत्तीची निर्मिती करण्यासाठी ईएलएसएस फंडाव्यतिरिक्त अन्य गुंतवणूक साधने बिनकामाची आहेत. शुद्ध विमा, ईएलएसएस फंड आणि अतिरिक्त ५० हजार रुपये ‘एनपीएस’मधील गुंतवणूक ही करबचतीची त्रिसूत्री आहे. कमावत्या वयात वर्षांला १२ हजार रुपये याप्रमाणे २५ वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने ईएलएसएस फंडात गुंतविल्यास आणि या गुंतवणुकीवर १२ टक्के चक्रवाढ परतावा मिळेल असे गृहीत धरल्यास ३६ लाखांच्या गुंतवणुकीचे २.२७ कोटी मिळविणे सहज शक्य आहे. बाजारातील चढ-उतारांना निर्धारपूर्वक सामोरे गेल्यास ईएलएसएस फंडाच्या गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्य आहे.

नीलेश सुराणा निधी हे मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर फंडासोबत मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंड, मिरॅ अ‍ॅसेट इमर्जिग ब्ल्यूचीप फंड आणि मिरॅ अ‍ॅसेट हायब्रीड इक्विटी फंड या फंडांचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या ३० नोव्हेंबरच्या ‘फॅक्टशीट’नुसार फंडाने सर्वाधिक ७३.५७ टक्के गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये २३.१५ टक्के गुंतवणूक मिड कॅपमध्ये, २.०९ टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप तर उर्वरित गुंतवणूक आभासी रोकड प्रकारात केली आहे. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्र बँक या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या पाच कंपन्या आहेत. पहिल्या पाच गुंतवणुका जास्त केंद्रित असल्या तरी उर्वरित गुंतवणुकांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.

वर्ष २००८ ते २०१८ या कालावधीत नीलेश सुराणा निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांची कामगिरी लखलखीत राहिलेली आहे. दर्जेदार उत्पादने असलेल्या कंपन्या, उत्तम व्यवस्थापन आणि आकर्षक मूल्यांकन ही निधी व्यवस्थापकांची यशाची त्रिसूत्री आहे. बँका आणि वित्तीय सेवा उद्योग मागील १२ तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक असणारे उद्योग क्षेत्र आहे. अन्य निधी व्यवस्थापक ‘सेक्टर रोटेशन’मुळे नफा कमावत असताना मिरॅ अ‍ॅसेटच्या सर्वच फंडांचा नफा हा योग्य मूल्यांकनात योग्य कंपनीचा गुंतवणुकीत समावेश झाल्याने मिळाला आहे. फंडाने पहिला लाभांश मार्च २०१७ मध्ये (०.५० टक्के) दुसरा मार्च २०१८ (१.२५ टक्के) तर तिसरा लाभांश डिसेंबर २०१८ (०.५५ टक्के) जाहीर केला आहे. सर्वसाधारणपणे फंडाने तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर मॉर्निग स्टार आणि व्हॅल्यू रिसर्च या संस्था फंडाचे रेटिंग जाहीर करतात. अनेक बँका त्यानंतर हे फंड आपल्या ग्राहकांना विकतात. साहजिकच फंडांना बँका मोठी गुंतवणूक मिळवून देतात. या फंडाला येत्या शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. पुढील आठवडय़ात या फंडाचे रेटिंग जाहीर होईल. फंडाची तीन वर्षांची कामगिरी पाहता या फंडाला किमान ‘फोर स्टार रेटिंग’ मिळेल अशी आशा बाळगायला वाव आहे. या गृहीतकावर हा फंड पुढील वर्ष-दोन वर्षांत पाच हजार कोटींचा टप्पा गाठेल. म्हणूनच या वर्षांतील शेवटची शिफारस म्हणून मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर फंडाची निवड केली.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)