शेअर बाजारातील सध्याचे चैतन्य आणि अर्थातच विदेशी वित्तसंस्थांनी आजवर टिकवून ठेवलेल्या डॉलर-पौंडाच्या ओघाला पुढे जाऊन धो-धो बरसातीचे रूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिणामी आणि जोडीला संसदेत सादर होणाऱ्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पाची अनुकूलता पाहता रुपया/डॉलर दर ५२ या पातळीवर मार्चपर्यंत स्थिरावलेला दिसणे अभिप्रेत आहे.
चलनातील चंचलतेचे आणखी एक वर्ष सरले. भारतीय चलन रुपयाने २०१२ सालात वध-घटीचा नवा विक्रमच नोंदविला. रुपया/डॉलर विनिमयाची वर्षांची संथ सुरुवात प्रारंभीच्या तीन महिन्यात डॉलरमागे ४९ अशा स्तरापर्यंत गेली होती. मार्च २०१२ नंतर मात्र दुक्कलीतले अंतर वाढत गेले आणि जून २०१२ पर्यंत ५७.५२ ऐतिहासिक नीचांकापर्यंत ते रोडावले. जुलै ते सप्टेंबर दरम्यान सारी गमावलेली रया कमावत रुपयाने ऑक्टोबरमध्ये पुन्हा डॉलरमागे ५१.५०ची पातळी गाठली. पण ही धमकदेखील अल्पजीवीच ठरली. वर्ष सरतासरता रुपया परत दुबळा बनत गेला.
रुपयाचे हे दुबळेपण कसे असा प्रश्न स्वाभाविकच जनसामान्यांना पडतो. देशात अडखळलेला आर्थिक-औद्योगिक विकास, भरीला सरकारचे धोरणपंगुत्व हे रुपयाला जडलेल्या पंडुरोगाचे मूळ आहे असे निश्चितच म्हणता येईल. किंबहुना अर्थव्यवस्थेपुढील समस्या हे रुपयाच्या कमजोरीचेच लक्षण असल्याचे सांगत सरकारकडून त्यालाच ढाल बनवून पुढे  केले गेले. दशकातील नीचांकापर्यंत घसरलेला तिमाही आर्थिक विकास आणि सरकारी पातळीवरही यंदा ८ टक्क्यांचे स्वप्न विसरा, जेमतेम ६ टक्क्यांचा विकासदर गाठता आले तरी कमावले अशा खालावलेल्या सूराचे चलन बाजारावरील नकारात्मक परिणाम यापेक्षा आणखी वेगळे काय असणार? दुसरीकडे तुटीच्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याचे सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे असे भासविते तर त्याचवेळी अनुदान खर्च आणखी वाढेल अशा घोषणांचा सपाटाही सुरूच आहे. निर्यातीत वाढ नाही करता आली तरी निदान आयात वाढू नये अशा उपाययोजनांचाही अभावच दिसतो. सप्टेंबरनंतर (खरे तर उशिरानेच!) सुरू झालेला सुधारणांचा झपाटा हा केवळ ‘फिच’ आणि ‘एस अ‍ॅण्ड पी’ यांच्याकडून भयसूचक पतझडीचा वार येऊ नये म्हणून त्यांना चुचकारण्याचा एक प्रयत्न होता. तरी त्यातून रुपयाला तात्पुरते बळ जरूर मिळाले. परंतु केल्या गेलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीची वाट राजकीय हेवेदाव्यांनी अडखळली आहे हे पाहून पुन्हा घसरणीचा क्रम सुरू झाला. वर्ष सरता सरता सरकारने काहीशी राजकीय धमक दाखवत, किराणा व्यापारात थेट विदेशी गुंतवणूक, भूसंपादनाचा कायदा, पेन्शन फंडांमध्ये विदेशी गुंतवणूक आणि बँकिंग सुधारणा या सारख्या काही वादग्रस्त म्हणण्यापेक्षा प्रदीर्घ रखडलेल्या धोरणांना वाट मोकळी करून दिली. यातून अर्थव्यवस्थेत भांडवली बाजारात का होईना विदेशी वित्ताचा ओघ सुरू झाला. ढासळत्या रुपयाला तो निश्चितच आधार देणारा ठरला.
सरलेल्या २०१२ सालात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने जरी ६००० अंशांच्या उंबरठय़ावर वर्ष सांगता केली असली तरी ४७७० अंशांचा तळ त्याने दाखविला होता. जगाच्या विकसित कप्प्यातील मध्यवर्ती बँकांचे उदार धोरण, त्यातून आलेल्या रोकडतरलता आपल्या बाजाराला तारणारी ठरली. पण त्याला देशातील मध्यवर्ती बँक- रिझव्‍‌र्ह बँकेकडून कडवेपणा त्यागणाऱ्या अपेक्षित प्रतिसादाची जोड मात्र मिळू शकली नाही. डॉलर विक्रीचा सपाटा, ईईएफसी नियमनात फेरबदल आणि रेपो दर तसेच रोख राखीव प्रमाणात कपातीसारखे उपाय योजून चलन बाजारात रुपयाची पडझड रोखणारा रिझव्‍‌र्ह बँकेकडून वर्षांच्या पूर्वार्धात दिसलेले सक्रिय हस्तक्षेपाचे अवसान उत्तरोत्तर थंडावत गेल्याचे दिसून आले. मूक प्रेक्षकासारखी मध्यवर्ती बँकेने ‘महागाईदरा’चा बागुलबुवा पुढे करीत जैसे थे धोरणाची री ओढली. यातून तिने सरकारला आणि बाजारालाही पुरते निराश केले. रुपयाच्या कमजोरीचा हा पैलूही दुर्लक्षिता येत नाही.
भविष्यातील शक्याशक्यता
चालू वर्षांसाठी वर उल्लेखिलेल्या दोन्ही मुख्य घटकांकडून आश्वासक प्रतिसादाची अपेक्षा मात्र करता येईल. पतधोरणाच्या निदान शेवटच्या तिमाहीतील आढाव्यात (२९ जानेवारीला) दरकपातीच्या उपायाचे संकेत रिझव्‍‌र्ह बँकेकडून या आधीच मिळाले आहेत. तर निवडणुकीआधीचे हे शेवटचे वर्ष असल्याने ‘रिफॉम्र्स’ची संथावलेल्या चाकांना सरकारकडून वेग दिला जाणे अंदाजता येईल. याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात चैतन्य निर्माण होणे स्वाभाविकच आहे. निर्देशांकांच्या मुसंडी म्हणजे अर्थातच विदेशी वित्तसंस्थांनी आजवर टिकवून ठेवलेल्या डॉलर-पौंडाच्या ओघाला धो-धो बरसातीचे रूप प्राप्त होईल. हा परिणाम आणि जोडीला संसदेत सादर होणाऱ्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पाची अनुकूलता पाहता रुपया/डॉलर दर ५२ या पातळीवर मार्चपर्यंत स्थिरावलेला दिसणे अभिप्रेत आहे. पण सुगीच्या काळात वाढणारी डॉलरची मागणी लक्षात घेतल्यास वर्ष २०१३ साठी ही दुक्कलीची सरासरी पातळी ५३ अशी असेल. पुढे जाऊन २०१४ च्या निवडणुकीचा कौल त्रिशंकू आल्यास हे प्रमाण ६० ते ६२ अशी विपरीत पातळही गाठू शकते. पण त्या दिशेने कलाटणीचा टप्पा ५६.५० हा स्तर असू शकेल. काहीही झाले तरी एका डॉलरच्या तुलनेत ५२-५० पातळीपर्यंत रुपयाची सशक्त बनताना दिसून येत नाही.
आम्हाला कळवा :
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेख-वृत्तांसंबंधी मत-प्रतिक्रिया पाठवा : लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.ई-मेल : arthmanas@expressindia.com

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?