तृप्ती राणे

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक गृहस्थ गुंतवणूक सल्ला घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांचे सगळे पैसे मुदत ठेवीत होते आणि व्याज दर कमी होणार या भीतीने त्यांना पछाडलं होतं. नेहमीप्रमाणे मी त्यांना वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांची सांगड घालून कशा प्रकारे पोर्टफोलिओ तयार करता येईल हे समजावले. म्युच्युअल फंडाचे नाव ऐकल्यावर त्यांनी अतिशय त्रासिक चेहरा केला आणि मला विनवणी करत म्हणाले – मॅडम, ते म्युच्युअल फंड काही उपयोगाचे नाहीत. मला मागे खूप नुकसान सोसावं लागलं – आर्थिक आणि मानसिक! तेव्हा मी काही त्यांच्या फंदात पडणार नाही.

मी खोदून विचारलं तेव्हा त्यांनी त्यांचा गुंतवणूक इतिहास मला सांगितला.

त्यांनी साधारण २०१६ साली गुंतवणुकीला सुरुवात केली होती. सातत्याने खाली येणाऱ्या व्याजदरांमुळे तेव्हासुद्धा त्यांना असुरक्षित वाटायला लागलं होतं आणि आपले पैसे कमी पडतील या भीतीने ते ग्रस्त होते. त्यात शेअर बाजार कसा मस्त धावतोय आणि म्युच्युअल फंड किती छान परतावे देत आहेत हे त्यांच्या नजरेत आला दिवस येत होते. हे सर्व लक्षात घेऊन त्या वेळी त्यांनी त्यांच्या मुदत ठेवीमधील पैसे काढून चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने आयुष्यात पहिल्यांदा शेअर बाजारात उडी मारली होती. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुढील काही महिने बाजार वर चढत गेला आणि ते स्वत:च्या योग्य निर्णयाबद्दल खूश होत अजून गुंतवणूक करत गेले. २०१८ सालाच्या सुरुवातीपासून मात्र त्यांना बेचन व्हायला लागलं. आपला निर्णय बरोबर होता कीनव्हता, ही साशंकता काही केल्या त्यांना सोडेनाशी झाली. शेवटी सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी त्यांचे पैसे काढायला सुरुवात केली आणि पुढील दोन-तीन महिन्यांत त्यांनी सगळे पैसे काढले. नुकसानाचे खापर शेअर बाजारावर फोडत त्यांनी कायमचा रामराम ठोकला.

त्यांची गोष्ट संपल्यावर ते पुन्हा काही वेळ त्या काळात गेले आणि गप्प झाले. त्यांना शून्यातून बाहेर आणायला मी एक प्रश्न विचारला – काका, मी मान्य करते की, शेअर बाजाराचा आणि म्युच्युअल फंडाचा तुम्हाला चांगला अनुभव नाही आला. म्हणून तुम्ही या गुंतवणूक पर्यायाकडे पूर्ण पाठ फिरवली आहे; पण मागच्या वेळेला ही गुंतवणूक करण्याआधी तुम्ही हा एक प्रश्न जर विचारला असता तर कदाचित तुम्ही वेगळा अनुभव घेतला असता.

त्यावर त्यांनी भानावर येत मला विचारलं – कोणता प्रश्न?

मी त्यावर शांतपणे उत्तर दिलं – या गुंतवणुकीतून मागील काळात नकारात्मक परतावे किती झाले आहेत? एखाद्या गुंतवणुकीतून किती फायदा होणार हे आपण जितक्या हव्यासाने बघतो त्याचबरोबर त्या गुंतवणुकीत याआधी किती नुकसान झालं आहे हे आपण का बघू नये!

उदाहरण म्हणून मी काही लोकप्रिय फंड घेतले आणि त्यांना खालील तक्ता दाखवला:

(खालील तक्ता पाहावा)

या उदाहरणामध्ये काही फंडांचा नकारात्मक परतावा हा २००८च्या आर्थिक संकटकाळातील आहे. हा नकारात्मक परतावा पाहिल्यानंतर आपल्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, की इतकं नुकसान सहन करायची ताकद आपल्यात आहे की नाही? आणि हे पाहूनसुद्धा जर आपण गुंतवणूक करायला तयार असू तर मग पुढे खडतर काळातही आपण डगमगत नाही. शिवाय गुंतवणूक करतेवेळी जर आपण व्यवस्थितपणे आर्थिक नियोजन केलेले असेल तर बऱ्याच प्रमाणात मानसिक स्थर्य लाभते.

हे ऐकल्यावर ते थोडे बुचकळ्यात पडले. आपल्या हव्यासापोटी आपण स्वत:चं नुकसान कसे करून घेतो ही जाणीव त्यांना झाली. यांच्यासारखे बरेच जण फक्त मागील परतावे बघून गुंतवणूक करतात आणि पुढे असेच परतावे मिळतील या खुळ्या अपेक्षेने पैसे गुंतवतात. तेव्हा गुंतवणूकदारांनो, वेळीच सावध व्हा! शेअर बाजारातील गुंतवणूक ही दुधारी तलवार आहे. चांगल्या बाजूने महागाई कापेल आणि चुकीच्या बाजूने आपला खिसा आणि अपेक्षा..

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

trupti_vrane@yahoo.com