वसंत कुलकर्णी

नारायण निवर्तल्याला पंचवीसहून अधिक वर्षे झाली. लग्नातल्या पंगतीतले श्लोक कधीच इतिहासजमा झाले. मग पंगतीच्या जागी बुफे आले. हल्ली तर लग्नाचा इव्हेंट झाला आहे. ज्यांच्या लग्नात नारायण राबला, त्या जुन्याजाणत्या मंडळींना आपल्या नातवंडांच्या लग्नाच्या दिवशी नारायणाची आठवण हटकून होतेच.

गणेश उत्सवाच्या निमित्ताने पुण्यात जाणे झाले होते. गणपतीच्या दिवसांत पुण्यात असण्यासारखे सुख नाही. कुटुंबाने रात्री गणपतीचे देखावे बघण्याचा बेत केला होता. नेमके कोणते गणपती बघायचे इथे गाडी अडली आणि आमच्या कुटुंबाने पूर्वी त्यांच्या वाडय़ात राहणाऱ्या विवेक गोडसे नामक व्यक्तीला बोलावले. शिडशिडीत बांध्याचा आणि घाऱ्या डोळ्यांचा पंचविशीचा एक तरुण हजर झाला.

‘‘हा विवेक, पुलंच्या नारायण काकांचा नातू. मागील वर्षी सीए झाला आहे’’, आमच्या कुटुंबाने रीतसर ओळख करून दिली.

मी आपला रीतसर नमस्कार वगैरे केला. मग त्याचा आणि आमच्या कुटुंबाचा लडिवाळ संवाद सुरू झाला. कोणत्या गणपतीला कोणती आरास आहे, कुठे गर्दी जास्त असते, हा त्या त्यांच्या गप्पांचा विषय होता. रात्री आमच्याबरोबर वाटाडय़ा म्हणून विवेक आला होता. मानाच्या पाच गणपतींव्यतिरिक्त, देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दगडूशेठपासून ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीपर्यंत आणि हिराबाग, खजिना विहीर, खडकमाळ, हुतात्मा बाबू गेनू मित्रमंडळाच्या गणपतींचे डोळ्यांचे पारणे फेडणारे सजावटीचे देखावे विवेकमुळे पाहता आले.

विवेक एका बहुराष्ट्रीय बँकेच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागात विश्लेषक म्हणून नोकरी करतो. लोकांना एखाद्याला ज्योतिष कळते असे कळल्यावर आपली पत्रिका दाखविण्याचा मोह होतो तसा विवेक म्युच्युअल फंड विश्लेषक असल्याने माझा पोर्टफोलिओ विवेकला दाखविण्याचा मला मोह झाला. चार पैसे खात्यात पडून असल्याने मी मागील अनेक दिवस चांगल्या सल्लागाराच्या शोधात होतो. अनायासे विवेक भेटल्यामुळे त्याला कोणत्या फंडात एकरकमी पैसे गुंतवू असा प्रश्न विचारला.

‘‘काका, मागील आठवडय़ात उपलब्ध झालेल्या ‘अ‍ॅम्फी’च्या आकडेवारीत सजग गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती मल्टिकॅप फंडांना लाभल्याचे आढळते. कोणाच्याही पोर्टफोलिओत योग्य मल्टिकॅप फंड संपत्ती निर्मिती करतो,’’ विवेक म्हणाला.

‘‘मागील वर्षभरातील गुंतवणुकीचे मुद्दल शाबूत ठेवणारे जे मोजके फंड आहेत त्यामध्ये यूटीआय इक्विटी फंडाचा समावेश होतो. एका वर्षांपूर्वी एकरकमी केलेल्या गुंतवणुकीवर ३.५६ टक्के तर एका वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘एसआयपी’चा वार्षिक परतावा ०.८७ टक्के आहे. फंडाचा अभ्यास करताना, ‘एस अँड पी बीएसई २०० टीआरआय’ हा एकच मानदंड असलेल्या अन्य फंडांच्या तुलनेत कामगिरी तपासली असता, यूटीआय इक्विटी फंडाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. ज्या काळात बहुसंख्य फंड आपल्या मानदंडापेक्षा खराब कामगिरी करत असताना भांडवल शाबूत ठेवणाऱ्या या फंडात मी तुम्हाला गुंतवणुकीची शिफारस करीत आहे,’’ विवेक म्हणाला.

‘‘काका, यूटीआय इक्विटी फंड हा लार्जकॅप केंद्रित मल्टीकॅप फंड असून आमच्या विश्लेषणानुसार अन्य प्रमाणित विचलनाची तुलना केली असता, अन्य मल्टीकॅप फंडांपेक्षा तुलनेने स्थिर फंड आहे. यूटीआय इक्विटी फंडाचा जोखिमांक आणि परताव्याचा अंदाज बऱ्यापैकी बांधता येतो. फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या कंपन्यांपैकी ६० टक्के कंपन्यांचे बाजारमूल्य १२,००० कोटींपेक्षा अधिक आहे. ‘सेबी’च्या प्रमाणीकरणाच्या निर्देशनानंतर यूटीआय इक्विटी, यूटीआय मल्टीकॅप, यूटीआय फ्लेक्झिकॅप, यूटीआय अपॉर्च्युनिटीज व अन्य तीन फंडांच्या विलीनीकरणातून, ३ मे २०१८ रोजी या फंडाची निर्मिती झाली. गुंतवणुकीसाठी उपलब्ध मल्टीकॅप फंड गटातील,  एचडीएफसी इक्विटी, फ्रँकलिन इंडिया इक्विटी, कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप आणि आयसीआयसीआय प्रु. मल्टीकॅप फंडांच्या तुलनेत जोखीम, नफ्याचे यूटीआय इक्विटी फंडाचे गुणोत्तर अधिक वाजवी आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ इक्विटी यासारख्या इतर मल्टीकॅप फंडांपेक्षा हा फंडा अधिक आक्रमक पण स्थिर आहे. यापूर्वी हा निधी मूल्य-आधारित रणनीती वापरत असे. सिमेंट, बांधकाम, वीज, दूरसंचार, खाण आणि पेट्रोलियम यासारख्या उद्योगांतील कंपन्यांनी पोर्टफोलिओचा एक मोठा हिस्सा व्यापलेला असे. निधी व्यवस्थापकात झालेल्या बदलानंतर जानेवारी २०१६ पासून समभाग निवडण्याचे धोरण मूल्य-आधारितपासून वृद्धी-आधारित कंपन्यांकडे कलले. कंपन्यांची रोख नफाक्षमता, दीर्घ कालावधीत उत्सर्जनातील वाढ भांडवलावरील परतावा, स्थिर व्यवस्थापन, उच्च गुणवत्ता इत्यादी निकषांना निधी व्यवस्थापकांनी अधिक महत्त्व दिले गेले. फंड व्यवस्थापकांनी व्यापारचक्राशी निगडित समभागांचा त्याग करून त्या त्या उद्योगाच्या सरासरीहून अधिक वृद्धीदर राखणाऱ्या समभागांचा अंतर्भाव केला. फंडाच्या गुंतवणुकीतून रॅम्को सिमेंट्स, अल्ट्रा टेक सिमेंट, आयआरबी इन्फ्रा, जेएसडब्ल्यू स्टील, केईसी इंटरनॅशनल, भारती एअरटेल, वॅबको, कोल इंडिया आणि एनसीसीसारख्या कंपन्या नवीन निधी व्यवस्थापकांनी विकून टाकल्या. तर झी एन्टरटेन्मेंट, बजाज ऑटो आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यासारख्या समभागात नफावसुली केली. ऊर्जा क्षेत्राला गुंतवणुकीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे तर नेस्ले, टायटन, लार्सन अँड टुब्रो, टीसीएस, कोटक मिहद्र बँक, बजाज फायनान्स, अ‍ॅस्ट्रा पॉलिटेक्निकसारख्या उत्सर्जनात उच्च वृद्धी राखणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले,’’ विवेकने एका दमात आपल्या शिफारशीचे समर्थन केले.

एकूण नारायणाला फक्त दुकानांची माहिती होती असे नाही. त्याला दुकानदारांची आर्थिक-कौटुंबिक परिस्थिती ठाऊक असायची. नातवाने नेमका आजोबांचा हा गुण उचलला आहे. त्याच्याकडे निधी व्यवस्थापक कुठे गुंतवतो, कुठले समभाग खरेदी करतो, कुठले विकतो याची जंत्री तयार असते. नकळत माझ्या मनाने नोंद केली.

‘‘काका, स्पर्धक फंडाच्या गुंतवणुकीतील सक्रिय व्यवस्थापनाच्या अभावामुळे व्यापारचक्राशी निगडित समभागांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असल्याने या समभागांच्या किमतीतील घसरणीचा फटका या फंडांना बसला. यूटीआय इक्विटी फंडाच्या मालमत्तेने ऑगस्ट महिन्यात नऊ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. फंडांच्या गुंतवणुकीतील कंपन्यांची संख्या सरासरी ५५ ते ५९ दरम्यान राहिली असून, सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या पहिल्या पाच कंपन्यांचा गुंतवणुकीतील हिस्सा २७ टक्क्यांच्या दरम्यान असतो.

अर्थव्यवस्थेची फेरउभारणी अद्याप दृष्टिीपथात नसल्याने, जेव्हा अर्थव्यवस्था उभारणी घेईल तेव्हा फंडांच्या गुंतवणुकीत असलेल्या सरासरीहून अधिक वृद्धीदर राखलेल्या कंपन्या सरस कामगिरी करतील. जानेवारी २०१६ नंतर फंडाच्या एक वर्ष चलत सरासरीने संदर्भ निर्देशांकांच्या चलत सरासरीपेक्षा ९८.६५ टक्के सरस कामगिरीची नोंद केली आहे. यूटीआय इक्विटी फंडाची पाच वर्षांची कामगिरी या फंड गटातील अधिक मालमत्ता असणाऱ्या कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप किंवा एचडीएफसी कॅपिटल बिल्डरसारख्या फंडांच्या तुलनेत डावी असली तरी ‘शार्प रेशो’नुसार यूटीआय इक्विटीचे जोखीम नफा गुणोत्तर नुकतेच सरासरीपेक्षा वर गेलेले आहे. मागील बारा महिन्यांच्या कालावधीत फंडाची एनएव्ही १२५.३१ ते १४७.५० दरम्यान राहिली असून समभाग निवडीच्या बदललेल्या रणनीतीने कठीण काळात भांडवल सुरक्षित राखण्यात निधी व्यवस्थापक अजय त्यागी यशस्वी झाले असल्याचे दिसते. मूल्य-आधारित व्यूहरचनेपेक्षा उच्च-वृद्धी दर आणि गुणवत्ता ही रणनीती फंडाची कामगिरी टिकवून ठेवण्यात यशस्वी झाल्याचे दिसते,’’ विवेकने गुंतवणुकीचे समर्थन केले.

विवेकचे हे बोलणे ऐकून मी मनोमन या फंडात एकरकमी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

shreeyachebaba@gmail.com