क्वांटम टॅक्स सेव्हिंग फंड ही गुंतवणुकीसाठी कायम खुली असलेली योजना आहे. या फंडातील गुंतवणूक प्राप्तिकराच्या ८० सी कलमाखाली करवजावटीस पात्र आहे. या प्रकारची गुंतवणूक तीन वर्षांसाठी काढून घेता येत नाही वा अन्य फंडात गुंतविता येत नाही. फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. या फंडात केलेली गुंतवणूक तीन वष्रे ठेवावी लागत असल्याने या फंडाला निर्गमन शुल्क नाही. या फंडाच्या गुंतवणुकीत बजाज ऑटो, एचडीएफसी, इन्फोसिससारख्या निर्देशांकाच्या प्रभावी घटक असलेल्या कंपन्या पहिल्या तीन गुंतवणुका असल्याने फंडाला एक प्रकारचे स्थर्य प्राप्त झाले आहे. आघाडीच्या पाच गुंतवणुकांची बेरीज ३०.१९ असल्याने गुंतवणूक कुठल्याही एकाच उद्योगक्षेत्रांत किंवा एकाच कंपनीच्या समभागात केंद्रित नसणे व एकूण गुंतवणुकीपकी ७५ टक्के गुंतवणुका या लार्ज कॅप असणे हे जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टीने वाखाणण्यासारखे आहे.
क्वांटम म्युच्युअल फंड हे फंड घराणे एक शिस्तबद्ध, स्वत:ची खास गुंतवणूक पद्धती असलेले फंड घराणे म्हणून ओळखले जाते. एखाद्या समभागात गुंतवणूक करताच तो समभाग केव्हा विकायचा हे निश्चित ठरवून त्याप्रमाणे कृती करणारे अशी या फंड घराण्याची खासियत आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर तीन ते पाच वष्रे तो समभाग विकायचा नाही असे फंड व्यवस्थापनाचे धोरण असते. या धोरणाने आजपर्यंत चांगला परिणाम दिला असला तरी या धोरणाची दुसरी नकारात्मक बाजूही या फंडाने अनुभवली आहे. मागील वर्षभरात बाजार बराच वर गेला साहजिकच एखाद्या वर्षांतच या फंडाच्या गुंतवणूका असलेले समभाग आधी ठरलेल्या विक्रीच्या पातळीवर पोहोचल्याने फंडाच्या गुंतवणूकीत रोकडीचे प्रमाण वाढल्याने इतर फंडाच्या तुलनेत परताव्याचा दर कमी झाला. फंड व्यवस्थापनाने केवळ रोकडीचे प्रमाण कमी करायचे म्हणून गुंतवणूक करण्यापेक्षा योग्य संधीची वाट पाहणे पसंत केले. देशांत व विदेशातील घटनांचे पडसाद बाजारात उमटल्याने बाजार खाली आला असल्याने निधी व्यवस्थापकास योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे. पुढील सहा महिन्यांपर्यंत फंडाच्या गुंतवणुकीत रोकडीचे प्रमाण मूळ पातळीवर म्हणजे दोन तीन टक्के अथवा त्याहून कमी होण्याची आशा फंड व्यवस्थापकास वाटते. ‘व्हॅल्यू रिसर्च’ या म्युच्युअल फंडांच्या पतमापन करणाऱ्या संस्थेने या फंडाला ‘थ्री स्टार रेटिंग’ दिले आहे. जे कोणी गुंतवणूकदार फंड व्यवस्थापनाच्या या विचारधारेवर विश्वास ठेवणारे आहेत अशा गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणूक करावी. प्राप्तिकराच्या कलम ८०सी अंतर्गत जास्तीस जास्त दीड लाखाच्या गुंतवणुकीवर करातून सूट मिळविता येते. म्हणून वार्षकि दीड लाखापेक्षा अधिक गुंतवणूक या फंडात करणे हितावह नाही.
22

21