अतुल कोतकर

‘लोकसत्ता’तील ‘कुतूहल’ या सदरात सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या आलेखांबद्दल माहिती दिली जात आहे. या सदराच्या लेखिका निशा पाटील यांनी आलेखांचे निर्णय प्रक्रियेत महत्त्व सांगितले आहे. उपलब्ध आधारसामग्री अर्थपूर्णरीत्या सादर करून वेगवेगळ्या आलेखांमध्ये दृश्यरूपात मांडून निष्कर्षांप्रत येता येते. आलेखांच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी विकीर्णतालेख (स्कॅटर प्लॉट) हा आलेख विशिष्ट फंड गटातील फंडांची मानदंडसापेक्ष कामगिरी तपासण्यासाठी वापरला जातो. स्मॉलकॅप निर्देशांकांचा (एस अँण्ड पी बीएसई स्मॉलकॅप) कल लक्षात घेतल्यास स्मॉलकॅप फंड नजीकच्या काळात अव्वल कामगिरी करतील असे संकेत आहेत. उदाहरणार्थ १७ जानेवारी २०२० रोजी विक्रमी शिखरावरून निर्देशांकात २५ टक्के घसरण झाली. परंतु नऊ  महिन्यांत ही २५ टक्के घसरण भरून काढत निर्देशांकाने पुन्हा एप्रिल महिन्यात नवीन उच्चांक प्रस्थापित केला. जगातील यशस्वी गुंतवणूकदार व निधी व्यवस्थापक हे उत्तम मानसशास्त्रज्ञ असतात आणि सोबतीला संख्याशास्त्राशी नेहमीच संगत ठेवून असतात. महामारीग्रस्त कालावधीतील विकीर्णता लेखानुसार सर्वात चमकदार कामगिरी केलेले जे मोजके स्मॉलकॅप फंड आहेत त्या फंडात युनियन स्मॉल कॅप फंडाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. पोर्टफोलिओच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करणाऱ्या स्मॉलकॅप फंडांचा धांडोळा घेतला असता युनियन स्मॉलकॅप फंड एक प्रमुख दावेदार म्हणून समोर आला आहे.

एप्रिल २०१८ मध्ये विद्यमान निधी व्यवस्थापक विनय पहारिया यांची फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. ते फंड घराण्याचे मुख्य समभाग गुंतवणूक अधिकारीसुद्धा आहेत. विनय पहारिया यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून केवळ या नव्हे तर सर्वच फंडांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. परिणामी, परतावा क्रमवारीत तळाच्या (बॉटम क्वारटाइल) गचाळ कामगिरी असलेल्या फंडातून या फंड घराण्याच्या फंडाच्या कामगिरीत मोठी सुधारणा होताना दिसत आहे. विनय पहारिया व्यवस्थापित करीत असलेल्या फंडांपैकी युनियन स्मॉलकॅप, युनियन फ्लेक्झीकॅप आणि युनियन बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड यांची विशेष दखल गुंतवणूकदारांनी घेणे गरजेचे आहे.

चलत परताव्यानुसार फंडाच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. एप्रिल २०१९ पासून फंडाने स्पष्टपणे सुधारणेचे संकेत दिले आहेत. एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत ५४ टक्के आणि एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२० या कालावधीत ७२ टक्क्य़ांच्या तुलनेत एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२१ या कालावधीतील एक वर्षांचा चलत परतावा ९२ टक्के आधार बिंदू सरासरीपेक्षा अधिक देत असल्याचे दर्शवत आहे. विनय पहारिया यांच्या कालावधीतील पोर्टफोलिओ मंथन ९२ टक्के असून हे सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ (विनय पहारिया यांची नेमणूक होण्यापूर्वीचे सहा महिने) या कालावधीत ४८ टक्के होते. पोर्टफोलिओत बदल करताना विद्यमान निधी व्यवस्थापकांनी मूल्यांकनापेक्षा गुणवत्ता आणि वृद्धीक्षम कंपन्यांचा समावेश केला आहे. साहजिकच जानेवारी-मार्च २०२१ या कालावधीत एका वर्षांच्या चलत सरासरीनुसार स्पर्धक फंडांच्या तुलनेत हा फंड एसबीआय स्मॉलकॅप आणि अ‍ॅक्सिस स्मॉलकॅपनंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेला फंड आहे. एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत सरासरी सापेक्ष कमी परताव्यास कारण ठरलेल्या समभागांना वगळणे फंड कामगिरीच्या पथ्यावर पडले आहे. स्मॉलकॅप गटातील एचडीएफसी स्मॉलकॅप (११,५७४ कोटी) डीएसपी स्मॉलकॅप (७,२५१ कोटी) यांच्या तुलनेत ४७८ कोटींची मालमत्ता असलेल्या फंडाची कामगिरी या दिग्गजांपेक्षा कांकणभर सरस आहे.

देशातील सर्व म्युच्युअल फंडांची फेब्रुवारी २०२० मधील २७.२ लाख कोटींची मालमत्ता मार्च २०२० मध्ये २२.३ लाख कोटींवर घसरली आणि मार्च २०२१ मध्ये पुन्हा उसळी घेत ३१.४ लाख कोटींच्या शिखरावर पोहचली. हा कालावधी कोणत्याही फंडाच्या कामगिरीची चाचणी घेण्यास एक आदर्श कालावधी होता. या कालावधीतील फंडाच्या गुंतवणुकीचा वेध घेतल्यास निधी व्यवस्थापकांनी जून-सप्टेंबर २०२० या कालवधीत अनेक समभागांची गुंतवणूक दुपटीने वाढविल्याचे निदर्शनास आले. फंडाच्या गुंतवणुकीत इंडियामार्ट इंटरमेश (३.९%), लॉरस लॅब्ज (३.८%), पीआय इंडस्ट्रीज (३.८%), फाइन ऑरगॅनिक (३.७%), निओजेन केमिकल्स (३.६%), टीमलीज सव्‍‌र्हिसेस (३.६%), इप्का लॅबोरेटरीज (२.९%), केएनआर कन्स्ट्रक्शन्स (२.९%), सिंजिन इंटरनॅशनल (२.९%), नेस्को (२.८%) या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. अ‍ॅलेम्बिक फार्मास्युटिकल्स, आयपीसीए लॅबोरेटरीज आणि लॉरस लॅब्ज, जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स, पीआय इंडस्ट्रीजसारख्या औषध आणि रासायनिक कंपन्या तसेच इंडियामार्ट इंटरमेश, बिर्लासॉफ्ट किंवा टाटा एलेक्सीसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांनी उत्सर्जनात भरघोस वाढ केल्याचे दिसते. निधी व्यवस्थापकांनी याच काळात आयपीओच्या रूपात उपलब्ध होणाऱ्या संधींचा फायदा घेतल्याचे दिसून येते.

युनियन स्मॉलकॅप फंडाचे निधी व्यवस्थापक रोकडसुलभतेचे योग्य व्यवस्थापन करीत असल्याचे दिसते. निप्पॉन स्मॉलकॅपसाठी १३ दिवस, अॉक्सिस स्मॉलकॅपसाठी २५ दिवस, एचडीएफसी स्मॉलकॅपसाठी ३९ दिवसांच्या तुलनेत युनियन स्मॉलकॅप फंड आपला संपूर्ण पोर्टफोलिओ तांत्रिकदृष्टय़ा २.२ दिवसांत मोकळा करू शकतो. संपत्ती निर्मितीचे एक   प्रबळ दावेदार असले तरी स्मॉलकॅप फंडांची क्रमवारी वेगाने बदलत असते. यासाठी फंडांचा नियमित मागोवा घेणे आवश्यक असते. अनेकदा फंडांच्या कामगिरीत सुधारणा झाली की स्मॉलकॅप फंडांच्या गुंतवणुकीवर निर्बंध येतात. स्मॉलकॅप फंडांना दोन प्रकारच्या आव्हानांचा – मूल्यांकन आणि दर्जा यांचा अभाव आणि गुंतवणुकीतील सातत्य यांचा -सामना करावा लागतो. या आव्हानांचा विचार करून सद्यपरिस्थितीत युनियन स्मॉलकॅप फंड हा एक आदर्श दावेदार आहे.

युनियन स्मॉल कॅप फंड

* फंड गट      स्मॉलकॅप फंड

* फंडाची सुरुवात १० जून २०१४

* फंड मालमत्ता ४७८ कोटी (३१ मे २०२१ रोजी)

* मानदंड  निफ्टी स्मॉल कॅप १०० टीआरआय

उत्पादनाची गुणवत्ता, दर्जेदार व्यवस्थापन, योग्य मूल्यांकनावर उपलब्ध असलेल्या आणि उत्सर्जनांत वाढ करू शकणाऱ्या कंपन्यांची निवड आम्ही आमच्या फंडासाठी करीत आलो आहोत. स्मॉलकॅप कंपन्यांतील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. परंतु दीर्घावधीत उच्चतम परतावा देणारी असते.

’ विनय पहारिया,

मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग), युनियन म्युच्युअल फंड