वर्षे कशी सरतात ते कळत नाही. गुंतवणुकीशी संबंधित क्षेत्रात काम करायला लागल्याला आणखी दोन महिन्यांनी २५ वर्षे होतील. या २५ वर्षांत बाजाराचे अनेक चढ-उतार पाहिले तसे गुंतवणूकदरांची बदलती मानसिकतासुद्धा अनुभवली. शेअर गुंतवणुकीला सट्टा समजण्यापासून ते समृद्धीच्या मार्गावरचा एकमेव साथीदार इथपर्यंतचा मानसिक बदल अनुभवला. तरीही गुंतवणूकदार त्याच त्याच चुका परत परत करीत असल्याचे जाणवले. कष्ट करून आयुष्यभर कमावलेला पैसा गुंतवताना काळजी न घेणारेच अधिक आढळतात. त्याच त्याच होणाऱ्या चुका टाळल्या तर एक यशस्वी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार होणे सहज शक्य आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नेहमीच वर्धिष्णू असते

नव्याने गुंतवणूक करू लागलेला गुंतवणूकदाराचा असा समज असतो की म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नेहमीच वाढणारी असते. बँकांच्या मुदत ठेवी, मनी बॅक, एंडोमेंटसारखी विमा उत्पादने यामध्ये मुदतपूर्तीनंतर नेमकी किती रक्कम मिळणार हे गुंतवणूक करताना निश्चित असते. तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ठरावीक वर्षांने नेमकी किती मिळेल हे गुंतवणूक करताना सांगता येत नाही. म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या या वैशिष्टय़ाला बाजाराची जोखीम असे म्हणतात. दीर्घ मुदतीत शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीचा परतावा अन्य गुंतवणूक साधनांच्या परताव्यापेक्षा अधिक असला तरी नजीकच्या काळात बाजाराच्या चढ-उतारांचा पराताव्यावर परिणाम होत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ताजे उदाहरण घेतल्यास, मागील वर्षभरात बाजाराचा प्रवास वरच्या दिशेनेच होत आहे असे नाही. बाजारातील शेअर्सच्या किमती खालीसुद्धा जातात आणि पर्यायाने बाजाराशी संबंधित परतावा कमी किंवा अपवादात्मक बाबतीत नकारात्मकही असू शकतो.

वित्तीय नियोजनाबाबत अज्ञानी असणे

वित्तीय नियोजन अर्थात फायनान्शियल प्लानिंग हा आर्थिक नियोजनाचा पाया आहे. प्रत्येक कमावत्या व्यक्तीने आपले नियोजन करून घेतले पाहिजे. नियोजन आणि नियोजनाची अंमलबजावणी केली पाहिजे. टर्म प्लान, मेडिक्लेम हे वित्तीय नियोजनाचा पाया आहेत. टर्म प्लानमध्ये पैसे परत मिळत नाहीत हा सर्वात मोठा गैरसमज आहे. विमा हप्त्याच्या किती तरी पट मिळणारे विमा छत्र हा टर्म प्लानचा सर्वात मोठा फायदा आहे.

गुंतवणूक आणि वित्तीय ध्येये यांची सांगड न घालणे

ज्याप्रमाणे घरातून निघताना आपल्याला कोणत्या ठिकाणी पोहोचायचे आहे हे नक्की ठरलेले असते त्याचप्रमाणे गुंतवणूक करण्यापूर्वी, ही गुंतवणूक मी का करणार आहे आणि माझ्या कोणत्या वित्तीय ध्येयाशी ही गुंतवणूक निगडित आहे हे निश्चित असणे गरजेचे आहे. ध्येयनिश्चितीशिवाय कलेली गुंतवणूक म्हणजे होकायंत्राशिवाय किनारा सोडलेले गलबत. तेव्हा वित्तीय ध्येय आणि फंडातील गुंतवणूक यांची सांगड घालणे गरजेचे आहे.

गुंतवणुकीचा कालावधी आणि फंड प्रकार यांच्यातील विसंगती

प्रत्येक प्रकारचा फंड हा विशिष्ट गुंतवणुकीच्या गरजांसाठी असून जोखीम प्रकार आणि गुंतवणुकीचा कालावधी यांच्यात विसंगती असते. जितका कालावधी अधिक तितका गुंतवणुकीवरील नफा अधिक असला तरी बहुसंख्य इक्विटी फंडांनी मागील एका वर्षांत दिलेला परतावा गृहीत धरून पुढील एका वर्षांत इतके पैसे मिळतील असे समजणे हे चूकच आहे. दीर्घ कालावधीची समभाग गुंतवणूक अव्वल परतावा देते. कमी कालावधीसाठी डेट फंड हे साधन असून, दीर्घ कालावधीसाठी समभाग गुंतवणूक कधीही चांगली. मोठय़ा नफ्याच्या हव्यासाने केलेली कमी कालावधीची समभाग गुंतवणूक आणि धोका पत्करण्याची तयारी नसल्याने दीर्घ कालावधीसाठी केलेली स्थिर उत्पन्न देणारी गुंतवणूक ही वित्तीय नियोजनाच्या दृष्टीने विसंगत म्हणायला हवी.

डेट फंडांकडून इक्विटी फंडांइतक्या परताव्याची अपेक्षा

फंडांचा प्रकार आणि परतावा यांचे निश्चित नाते असते. फंड प्रकार जितका धाडसी, तितका गुंतवणुकीवर परतावा अधिक असे हे समीकरण आहे. लिक्विड फंडाचा परतावा रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या रेपो दरापेक्षा थोडा अधिक पण मुद्दलाची खात्री देणारा हा फंड प्रकार आहे. त्या उलट मिड कॅप गुंतवणुकीचा परतावा सर्वाधिक पण गुंतवणूक धाडसी, म्हणून नजीकच्या काळात मुद्दल काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असलेला हा फंड प्रकार आहे. गुंतवणुकीचा, कालावधी गुंतवणुकीतील जोखीम यांबाबत मिड कॅप फंडांची तुलना लार्ज कॅप किंवा हायब्रीड फंडाशी करणे अयोग्य आहे. तसेच डेट फंड गटात लिक्विड फंडाच्या परताव्याची तुलना क्रेडिट अपॉच्र्युनिटी फंडाच्या परताव्याशी करणे हेसुद्धा चुकीचे. दोन तुल्यबळाची तुलना होते. फंडाची तुलना करताना फंड गट विसरता कामा नये.

‘सिप’ अकस्मात थांबवणे

नियोजनबद्ध गुंतवणूक हा वित्तीय नियोजनाचा पाया आहे. सामान्यत: बाजार निर्देशांकांचा खालच्या दिशेने प्रवास असताना गुंतवणुकीवर नुकसान दिसू लागताच सुरू असलेल्या नियोजनबद्ध गुंतवणुकीची ‘सिप’ बंद केली जाते. तसेच सध्याच्या परिस्थितीत निर्देशांक सर्वोच्च पातळीवर असताना गुंतवणूक थांबविली जाते. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. ‘सिप’ करण्यामागचा फायदा हा ‘रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’ हा असतो. म्युच्युअल फंडाच्या युनिट्सचे भाव अधिक असताना कमी युनिट्सची खरेदी आणि कमी असताना अधिक युनिट्सची खरेदी झाल्याने युनिटच्या खरेदीचा सरसरी भाव राखला जातो. ‘सिप’ ही दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक असल्याने बाजार वर-खाली झाला तरी गुंतवणुकीत सातत्य राखणे गरजेचे असते.

बॅलंस्ड फंडाच्या लाभांशाला नियमित उत्पन्न समजणे

बँकांच्या मुदत ठेवींचे दर कमी होण्यास सुरुवात झाल्यापासून मासिक लाभांश देणाऱ्या बॅलंस्ड फंडातील गुंतवणुकीला भरती आली आहे. ‘सेबी’च्या नियमानुसार लाभांशाचे वाटप हे गुंतवणुकीवर वसूल केलेल्या नफ्यातून करायचे असल्याने फंडाच्या गुंतवणुकीवर नफा झाला तरच स्वाभाविकपणे लाभांश मिळू शकेल. आणि नफा किंवा तोटा होणे हे बाजारावर अवलंबून असल्याने बॅलंस्ड फंडात लाभांशाच्या मोहाने गुंतवणूक करणे चुकीचे आहे. गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात, ६५ टक्कय़ांहून अधिक समभाग गुंतवणूक अससेल्या फंडाच्या लाभांशावर १० टक्के लाभांश वितरण कर लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावासहित अर्थसंकल्प मंजूर झाल्यास लाभांशाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॅलंस्ड फंडातील गुंतवणूक नियमित उत्पन्न स्त्रोतासाठी न करता मध्यम जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांनी महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूक करावी.

सल्लागाराशिवाय ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक

म्युच्युअल फंडांचे डायरेक्ट प्लान हे जाणत्या गुंतवणूकदारांसाठी आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी फंड प्रकार, गुंतवणुकीतील जोखीम, निधी व्यवस्थापकाचा अनुभव, तो निधी व्यवस्थापक असलेल्या अन्य फंडांची कामगिरी गुंतवणूकदाराने सध्या गुंतवणूक केलेले फंड इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक असते. एखादा निधी व्यवस्थापक नोकरी सोडून दुसऱ्या फंड घराण्यात गेल्यास आपल्या गुंतवणुकीचे नेमके काय करायचे, येत्या काही दिवसांत ‘सेबी’च्या नवीन नियमानुसार फंडांचे विलीनीकरण होणार आहे. या संभाव्य विलीनीकरणानंतर आपल्या गुंतवणुकीचे नेमके भवितव्य काय, असे अनेक प्रश्न सल्लागार सोडवीत असतो. ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक म्हणजे लर्निग लायसेन्स काढून मार्गदर्शकाशिवाय गाडी थेट रस्त्यवर चालविणे. म्हणून सल्लागाराशिवाय गुंतवणूक करू नये.

फंड गुरू

arthmanas@expressindia.com

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.