|| वसंत कुलकर्णी

दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक परतावा देणारे म्युच्युअल फंड आज सोन्याचा मुलामा गळून पडलेल्या कथिलासारखे वाटू लागले आहेत. अशा समयी गुंतवणूकदारांनी करायचे तर काय?

साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेदरम्यान फंडांची मागील महिन्यातील कामगिरी तपासणे हा अनेक वर्षांचा प्रघात आहे. जून महिन्याची आकडेवारी तपासताना काहीशी अपेक्षित तरीही धक्कादायक आकडेवारी समोर आली.

तब्बल ७,००० कोटींपेक्षा (एक अब्ज अमेरिकी डॉलर) अधिक मालमत्ता असणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या मालमत्ता मूल्यात (एनएव्ही) जून महिन्यात १.६७ टक्के ते २.५८ टक्के घसरण झाल्याचे आकडेवारी सांगते. कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप, एचडीएफसी इक्विटी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचीप, एचडीएफसी टॉप १००, मिरॅ असेट लार्जकॅप हे सर्वाधिक मालमत्ता असणारे समभाग गुंतवणूक करणारे फंड आहेत. या फंडांची  मालमत्ता १३ ते २५ हजार कोटी या दरम्यान आहे. या फंडांपकी मिरॅ असेट लार्जकॅप (०.०५ टक्के वाढ) वगळता पहिल्या सर्वाधिक मालमत्ता असणाऱ्या फंडांनी जून महिन्यात एनएव्हीमध्ये घसरण नोंदविली आहे. आघाडीच्या १० पकी आठ फंडांनी मालमत्ता मूल्यातसुद्धा घसरण नोंदविली आहे. जून महिन्यात यातील बहुसंख्य फंडांचा मानदंड असलेल्या ‘सेन्सेक्स’मध्ये १.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे; परंतु सेन्सेक्समधील ३० पकी १८ समभागांच्या किमतीत जून महिन्यात घसरण झाली. फंड विश्लेषणाचा परीघ थोडा मोठा केल्यास, एचडीएफसी स्मॉल कॅप (-३.१३%), सुंदरम रुरल (-२.४०%), कॅनरा रोबेको इमìजग इक्विटीज (-२.२५%) हे जून महिन्यात सर्वाधिक घसरण नोंदविणारे फंड ठरले. महिन्याभरात सर्वाधिक घसरण झालेले हे फंड दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक परतावा देणारे फंड होते. मागील रविवारी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार म्हणून कोणा एकाला निवडायचे झाले तर नि:संशय बेन स्टोक्सचे नाव घ्यावे लागेल. हाच बेन स्टोक्स वर्षभरापूर्वी बारमध्ये दारू पिऊन केलेल्या दंगामस्तीमुळे संघाबाहेर होता. या सामन्यानंतर क्रिकेटरसिकांची स्टोक्ससाठीची भावना ‘मला मदन भासे हा मोही मना’ अशी होती. दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक परतावा देणारे फंड सोन्याचा मुलामा गळून पडलेल्या कथिलासारखे वाटू लागले आहेत.

म्युच्युअल फंडांचे निधी व्यवस्थापक हे फंडांच्या गुंतवणुकीच्या निकषात बसणाऱ्या समभागांची निवड करून त्यांचा गुंतवणुकीत समावेश करतात. म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक गुंतवणूक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, एचडीएफसी या समभागांत केली आहे. ‘सेन्सेक्स’मधील मोजक्याच समभागांच्या किमती वाढल्याने सेंसेक्स जरी वर गेलेला दिसला तरी विस्तृत रूपात समभागांची घसरण झालेली आहे. जून महिन्यात सेन्सेक्समधील १२ समभागांच्या किमती वधारल्या, तर १८ समभागांच्या किमती घटल्या. कुठलाही फंड विस्तृत बाजाराच्या परताव्यापेक्षा अधिक परतावा देत नसतो. केवळ सेन्सेक्स आणि निफ्टीवरून आपल्या गुंतवणुकीवरील नफ्याचा अंदाज आणि अपेक्षा ठेवणे चूकच. शुक्रवारी सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. तरीसुद्धा गुरुवारच्या तुलनेत काही फंडांच्या एनएव्हीत वाढ झाली. लक्षणीय घटना घडलेली नसल्यास या ११ निर्देशांकांपकी आज (सोमवारी) कोणता निर्देशांक वाढेल आणि कुठला घटेल हे बाजार उघडण्यापूर्वी कोण सांगू शकेल काय? असे आठवडय़ाच्या पाच दिवसांपकी तीन दिवस व्यक्त केलेल्या अंदाजानुसार घडण्याची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे किंवा कसे हे पडताळून पाहावे. म्हणजे बाजार किती अनिश्चिततेचा खेळ आहे हे अनुभवता येईल. अशा अनिश्चिततेत आपली (किंवा वितरकाची) फंड निवड चुकली असे मानणे गरच.

एका बाजूला म्युच्युअल फंडांत होणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीचा ओघ नवे उच्चांक प्रस्थापित करत असतानाच फंडाच्या गुंतवणुकीवर समाधानकारक परतावा मिळत नसल्याने फंडातील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढल्याचे आकडेवारी सांगत आहे. नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांच्या तुलनेत पसे काढून घेणाऱ्यांचे प्रमाण अल्प असले तरी गुंतवणूक काढून घेणाऱ्यांच्या संख्येत रोज नव्याने भर पडत आहे. ‘बँक एफडी’इतकाही परतावा मिळत नसल्याने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेऊन बँकांच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, मुदत ठेवी आणि समभाग गुंतवणूक हे वेगवेगळे मालमत्ता प्रकार आहेत. त्यांच्या प्रकृती भिन्न आहेत. मुदत ठेवी नियमित उत्पन्नाचे साधन आहे, तर समभाग गुंतवणूक भांडवली लाभासाठी करतात. म्युच्युअल फंड किंवा समभाग गुंतवणुकीतून नियमित उत्पन्नाची अपेक्षा करत ‘बँक एफडी’एवढा परतावा मिळण्याची अपेक्षासुद्धा चूकच. म्युच्युअल फंड वितरकाला, पहिल्या भेटीत मला दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे, असे म्हणणारा गुंतवणूकदार सध्याचा परतावा पाहून एका वर्षांच्या आतच ‘गोल बेस्ड एसआयपी’ बंद करण्याच्या गोष्टी करायला लागतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ नेहमीच भावनिक आणि वेगवेगळ्या गोष्टींशी निगडित असतो. जसे की आधी सार्वत्रिक निवडणुका, नंतर अर्थसंकल्प इत्यादी.

मागील दोन वर्षांत गुंतवणूकदार नक्कीच एक धडा शिकले असतील अशी आशा आहे. योग्य फंड निवडणे म्हणजे सर्वाधिक परतावा देणाऱ्या फंडाची निवड करणे नव्हे. एकाच फंड गटातील दोन फंड घराण्यांच्या फंडाच्या परताव्यात जमीन-अस्मानाइतका फरक असू शकतो. वर उल्लेख असलेले आणि मागील महिन्याभरात सर्वाधिक घसरण झालेले फंड दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक परतावा देणारे फंड होते. तेव्हा फंड निवडीसाठी परताव्या पलीकडे बघायला शिकणे गरजेचे असते हा पहिला धडा. फंड व्यवस्थापकाचे व्यापार चक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांत निधी व्यवस्थापनाचे कौशल्य अभ्यासणे, आपल्या मालमत्ता वैविध्याच्या चौकटीत बसत असल्यास फंडाची निवड करणे आणि जर फंड आपल्या जोखमिकांच्या परिघात न बसणारा असेल तर कितीही आकर्षक परतावा असला तरी  गुंतवणूक टाळणे हा दुसरा धडा होय. हे करण्यास वेळ आणि कौशल्य नसेल तर फंड वितरकाचा शोध घेणे श्रेयस्कर. अलीकडील एका अभ्यासात बँका आपल्या ग्राहकाचे हित जपण्याऐवजी बँकांनी प्रवíतत केलेल्या फंड घराण्यांचे हित जपत असल्याचे आढळले आहे. बँकांनी फंड घराण्यांचे हित जपण्यासाठी धाडसी/जोखीमयुक्त योजनांची शिफारस ग्राहकांना केल्याचे आढळले आहे. वितरकाची निवड करताना हे विसरून चालणार नाही.

क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने सामना गमावला तरी इंग्लंडबरोबरच्या लढाईत तो संघ तसूभरही कमी पडला नाही. २४२ धावांच्या मर्यादित धावसंख्येचे रक्षण करताना न्यूझीलंड क्रिकेट संघाने जो खेळ केला त्याला तोड नाही. तरीही मागे वळून पाहताना त्यांना दोन चुका कधी विसरता येणार नाहीत. पहिली चूक मार्टनि गप्तिलची चेंडूफेक आणि झेल घेताना ट्रेंड बोल्टचा सीमारेषेला लागलेला पाय. कदाचित या चुका झाल्या तेव्हा त्यांचे गांभीर्य लक्षात आले नसेल, पण सामना हरल्यावर या चुका अक्षम्य वाटू लागल्या.

संसदेच्या गत अधिवेशनात केलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आणि यंदा अर्थसंकल्पात भारताची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर करण्याचा मनोदय व्यक्त केला गेला आहे. समभाग गुंतवणूक केली तरच या संभाव्य ५ अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेची फळे चाखता येतील. सध्याचा काळ हा जशी गुंतवणूकदारांची परीक्षा पाहणारा काळ आहे तसा बाजार सध्या समभाग संचयाच्या टप्प्यात आहे. ही वेळ गुंतवणूक काढून घेण्याची नक्कीच नाही. या चुकीचा परिणाम पाच वर्षांनी मोठय़ा भांडवली लाभाला मुकण्यात  होऊ शकेल. थोडा मनोनिग्रह आणि कणखरपणा न दाखवल्यास ही भविष्यात ही चूक मार्टनि गप्तिल आणि ट्रेंड बोल्टच्या त्या क्षणी क्षुल्लक भासलेल्या परंतु नंतर गंभीर ठरलेल्या चुकीप्रमाणे वाटू शकेल.

shreeyachebaba@gmail.com