30 May 2020

News Flash

अर्थ वल्लभ : आत्मनिर्भर करणारा फंड

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती  देणारे साप्ताहिक सदर

मिरॅ अ‍ॅसेट इमर्जिंग ब्लूचिप फंड

वसंत माधव कुळकर्णी

अस्तित्वात येऊन येत्या जुलै महिन्यात १० वर्षे पूर्ण करणारा मिरॅ अ‍ॅसेट इमर्जिंग ब्लूचिप फंड हा लार्ज अ‍ॅण्ड मिड कॅप फंड गटातील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या फंडांपैकी एक फंड आहे. मूळ मिड कॅप म्हणून हा फंड अस्तित्वात आला. मात्र सेबीच्या फंड सुसूत्रीकरणानंतर फंड घराण्याने या फंडाचा समावेश लार्ज आणि मिड कॅप फंड गटात केला.

फंडाच्या गुंतवणुकीच्या परिघात बाजारमूल्यानुसार पहिल्या १०० (लार्ज कॅप) आणि त्या नंतरच्या १५० (मिड कॅप) अशा २५० कंपन्यांचा समावेश असतो. निधी व्यवस्थापक गुंतवणूक परिघातील ५५ ते ६० म्हणजे एकूण गुंतवणूक परिघातील उपलब्ध कंपन्यांपैकी २० टक्के कंपन्यांची निवड करतात. ही निवड करत असताना एकू ण गुंतवणुकीच्या किमान ३५ टक्के समभाग लार्ज कॅप आणि किमान ३५ टक्के समभाग मिड कॅप प्रकारचे असतील हे निश्चित करतात. जानेवारीत फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ५५ टक्के गुंतवणूक मिड कॅप प्रकारात होती. मार्च – एप्रिल महिन्यात झालेल्या घसरणीनंतर एप्रिल अखेरीस उपलब्ध माहितीनुसार फंडाने लार्ज कॅप प्रकारच्या समभागात वाढवली आहे. एकप्रकारे गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन करणारा हा फंड आहे.

नीलेश सुराणा व अंकित जैन हे या फंडाचे व्यवस्थापक असून नीलेश सुराणा हे फंड अस्तित्वात आल्यापासून फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. नीलेश सुराणा फंड घराण्याच्या समभाग गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारीसुद्धा आहेत. अंकित जैन फंड घराण्याच्या समभाग गुंतवणूक करणाऱ्याा संघाचे २०१५पासून सदस्य असून त्यांची जानेवारी २०१९ पासून फंडाचे सहनिधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निधी व्यवस्थापकांना सहाय्य करण्यासाठी फंड घराण्याने समभाग संशोधकांचा एक चमू कार्यरत असून या चमूचे नेतृत्व हर्षद बोरावके करतात. निधी व्यवस्थापक गुंतवणुकीसाठी बॉटम्स अप अ‍ॅप्रोच रणनीतीचा अवलंब करतात. मूलभूत विश्लेषणातून उपलब्ध झालेल्या समभागातून सुदृढ ताळेबंद, उत्सर्जनातील वाढ (अर्निग ग्रोथ) आणि व्यवसायातून नफा होणाऱ्या कंपन्यांतून वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांची निवड केली जाते.

येत्या ९ जुलैला फंड अस्तित्वात आल्याला १० वर्षे पूर्ण होतील. मागील नऊ  वर्षांत फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत सातत्याने वाढ होत असून शेवटच्या उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाची मालमत्ता ८,८३८.९८ कोटी आहे. या फंड घराण्याच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत हा फंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. फंड अस्तित्वात आल्यापासून (९ जुलै २०१० ते १५ मे २०२०) लार्ज अ‍ॅण्ड मिड कॅप फंड गटात नियोजनबद्ध गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा दिलेला हा फंड आहे. उपरोक्त कालावधीत १,००० च्या मासिक नियोजनबद्ध गुंतवणुकीची वार्षिक वाढ १६.०७ टक्कय़ांनी वाढून १.१९ लाख रुपयांचे २.७१ लाख रुपये झाले आहेत. फंडाच्या सुरवातीला ९ जुलै २०१० रोजी १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे १५ मे २०२० रोजी ४.६७ लाख रुपये झाले असून वार्षिक वाढ १६.९३ टक्के आहे.

हा फंड ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीच्या प्रारंभापासून म्हणजे २०१४ पासूनचा भाग आहे. या फंडानेच खऱ्या अर्थाने मिरॅ अ‍ॅसेट या फंड घराण्याला ओळख मिळवून दिली. लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडांसाठी फंड निवड करत असताना जे निकष ठरविले होते त्यानुसार अस्थिरतेच्या काळात फंडांचा जोखीम – समायोजित परतावा हा त्या फंड गटाच्या सरासरी परताव्यापेक्षा अधिक असावा, हा प्रमुख निकष होता. मागील २० तिमाहीत फंडाने सातत्याने सरासरीपेक्षा सरस कामगिरी केली आहे. एका बाजूला फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वाढ होत असल्याने फंडाच्या व्यवस्थापन खर्चात (टीईआर) सातत्याने घट झाली आहे. मागील जोखीम – समायोजित परताव्याच्या तुलनेत भविष्यातील फंडाच्या कामगिरीवर अस्थिरतेचा वेगळा प्रभाव पडतो. परिणामी एक विश्लेषक म्हणून दावा करता येईल की, फंडाची अस्थिरतेची पातळी ही पोर्टफोलिओ व्यवस्थापन प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग असते. म्युच्युअल फंडांची निवड करताना गुंतवणूकदार फंडांचे एका वर्षांचा परतावा प्रमाण मानतात. फंडांच्या कामगिरीतील सातत्य तपासण्यासाठी फंडांचे तीन वर्ष आणि पाच वर्षांचा परतावा तपासणे आवश्यक असते. लोकसत्ता कर्ते म्युच्युअल यादीसाठी निवड करताना सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फंडांची त्यांच्या कामगिरीच्या बळावर निवड होत असते. एका वर्षांच्या कामगिरीच्या बळावर सर्वाधिक परतावा मिळविणाऱ्याा फंडांना कदाचित ‘फोर स्टार रेटिंग’ मिळविता आले असते परंतु मानांकन देताना फंडांच्या तीन वर्ष आणि पाच वर्षे कामगिरीचे मूल्यमापन होत असल्याने एका वर्षांत सर्वाधिक परतावा देणारे फंड या निकषामुळे मागे पडतात. क्रिसिल रॅकिंगमध्ये लार्ज अ‍ॅण्ड मिड कॅप गटातील २५ फंडांपैकी टॉप क्वोरटाईलमध्ये एलआयसी लार्ज अँण्ड मिड कॅप आणि मिरॅ अ‍ॅसेट इमर्जिंग ब्लूचिप या केवळ दोन फंडांना स्थान मिळाले आहे.

अनेक संपत्ती व्यवस्थापन करणाऱ्यांनी त्यांच्या आदर्श पोर्टफोलिओमध्ये या फंडाला स्थान दिल्याचे आढळते. मागील ९ वर्षे गुंतवणूकदारांच्या पदरात परताव्याचे भरघोस माप टाकणारा हा फंड आहे. भविष्यात अर्थव्यवस्थेला अनेक अडचणींवर मात करावी लागणार असल्याने गुंतवणुकीचा मार्ग खडतर असेल हे लक्षात ठेवून किमान पाच वर्षे गुंतवणूक राखण्याच्या उद्देशाने गुंतवणूक केल्यास हा फंड निराश करण्याची शक्यता कमी आहे. एका अर्थाने गुंतवणूकदारांना वित्तीय लक्ष्यापर्यंत नेत आत्मनिर्भर करणारा हा फंड आहे.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती  देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 6:05 am

Web Title: mutual fund investments article zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : घोडं का खंगलं..
2 बंदा रुपया : औद्योगिक यशाची ‘ज्ञानेश्वरी’
3 माझा पोर्टफोलियो : ‘लोकल ते ग्लोबल’ नमुना!
Just Now!
X