वसंत माधव कुळकर्णी

‘लोकसत्ता अर्थवृत्तांत’च्या २० जुलैला प्रसिद्ध झालेल्या ‘कर्त्यां’च्या यादीत या फंडाने प्रथम स्थान मिळविले. एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत सर्वच निर्देशांकांनी मार्च महिन्यातील २५ आठवडय़ाचा तळापासून सुधारणा दाखविण्यास सुरुवात केली होती. साहजिकच जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत मागील पाच वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना, ‘अपसाइड कॅप्चर रेशो’चा विचार करून मिडकॅप गटातील सर्वाधिक संपत्ती निर्मिती करणारे जे फंड असतील त्या संभाव्य फंडात हा फंड होता. पीजीआयएम मिडकॅप अपॉच्र्युनिटिज फंडाच्या कामगिरीनुसार सर्वमान्य ‘क्रिसिल रँकिंग’मध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या फंडांना टॉप क्वारटाइलमध्ये स्थान मिळते. कर्त्यांच्या यादीत एखादा अपवाद वगळता सर्वच फंड ‘टॉप क्वारटाइल’मध्ये असतात. मागील पाच वर्षांत मिडकॅप फंड गटातील सर्वाधिक संपत्ती निर्मिती करणाऱ्या फंडांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला हा फंड कर्त्यांच्या यादीत ‘एसआयपी’ परतावा कामगिरी लक्षात घेता सहाव्या स्थानावर आहे. फंड गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी रुपये ‘टॉप क्वारटाइल’ आणि ‘अपर मिडल क्वारटाइल’व्यतिरिक्त फंडात असल्याने ‘म्युच्युअल फंड सही हैं, लेकिन रिटर्न नहीं है’ अशी कोल्हेकुई ऐकायला मिळते. हा दोष झापड लावून पारंपरिक धाटणीच्या, मागील परताव्याच्या निकषांवर शिफारस सुचविणाऱ्यांचा आहे. ‘कर्त्यां’साठी फंड निवड करताना कठोर निकष निश्चित करून उपलब्ध आधार बिंदूंचा वापर करून फंड निवड केल्यास ‘म्युच्युअल फंड सही है’ असेच म्हणावे लागेल.

(समाप्त)

shreeyachebaba@gmail.com