|| अजय वाळिंबे

निवडणूक निकालांबाबत.. सरली काय?

‘माझा पोर्टफोलिओ’ने कॅलेंडर वर्षांच्या पहिल्या तिमाहीत केलेली कामगिरी ही केवळ तीन महिन्यांची असल्याने त्याबद्दल आताच काही भाष्य करणे योग्य नाही. मात्र आपल्या पोर्टफोलिओचा पहिल्या तिमाहीचा ‘आयआरआर’ ५०.६३ टक्के आहे हे निश्चित लक्षणीय! वाचकांनी सुचविल्याप्रमाणे यंदा तक्त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या शेअर्सबद्दल शिफारसदेखील दिलेली आहे. अर्थात गुंतवणूकदारांनी आपले उद्दिष्ट स्वत: ठरवून त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षांत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात भरपूर चढ-उतार बघितले. वर्षांतील बहुतांशी काळ मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सने टेन्शन दिले असले तरीही गेल्या महिन्याभरात मात्र मुख्यत्वे बालाकोट हवाई हल्ल्यानंतर शेअर बाजाराने भरारी घेतली. आगामी निवडणुकीत कुणाला सत्ता मिळणार याची भीती आता बाजाराला वाटत नाही.

मंदीच्या वातावरणात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकातील वाढ दिलासा देणारी आहे.  सेन्सेक्सने ५,७०४ अंकांची किंवा १७ टक्के कमाई केली आणि एनएसई निफ्टी ५० निर्देशांकात १,५१० अंकांनी वाढ झाली किंवा १५ टक्के वाढ झाली आहे. तथापि, बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांकडून दीर्घावधीच्या अस्थिरतेवर मात केली गेली. ऑगस्टमध्ये आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या भानगडीने सुरू झालेली रोकड तरलतेविषयक चिंता नंतर काही ना काही कारणांनी वाढतच गेली. अजूनही बहुतांशी सरकारी बँकांना अनुत्पादित कर्जाची समस्या भेडसावत असली तरीही आगामी काळात दिवाळखोरी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे तसेच बँकांच्या भांडवलातील पुनर्बाधणी आणि लहान बँकांचे मोठय़ा सशक्त बँकेतील विलिनीकरण यामुळे त्यांच्या स्थितीत सुधारणा अपेक्षित आहे. वाढत्या चलनपुरवठय़ामुळे बाजारातील द्रवणीयतादेखील वाढू लागल्याने आता गृह वित्त कंपन्या आणि बिगरबँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) यांच्याही कामकाजात सुधारणा अपेक्षित आहे. जागतिक बाजारपेठेत मंदीची भीती व्यक्त केली जात असली तरीही भारतीय बाजारपेठेत मात्र परदेशी वित्तीय संस्थांचे आकर्षण कायम आहे.

नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होईल. बाजाराला नेहमीप्रमाणे ०.२५ टक्के व्याजदर कपातीची अपेक्षा आहे. सध्याचे उत्साहाचे वातावरण निवडणुकांचे अपेक्षित निकाल लागल्यावर अजून बहरेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा उत्साहाने शेअर बाजारात गुंतवणुकीला सुरुवात करावी. अर्थात ‘माझा पोर्टफोलिओ’ हा दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी असल्याने गुंतवणुकीत सातत्य आवश्यक आहेच. नवीन आर्थिक वर्ष सर्व वाचकांना भरभराटीचे आणि संपन्नतेचे जावो ही सदिच्छा..

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.